रेसबोर्डमध्ये कात्याला रौप्य, आरएसःएक्समध्ये डेनला कांस्य

>> अखिल भारत बोर्ड सेलिंग चॅम्पियनशिप

गोवा यॉटिंग असोसिएशनने आयोजित केलेल्या अखिल भारत बोर्ड सेलिंग चॅम्पियनशिप २०१९ स्पर्धेत गोव्याच्या कात्या कुयेल्होने रेसबोर्ड खुल्या गटात रौप्यपदक प्राप्त केले. तर आरएसःएक्स गटात डेन कुयेल्होला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
काल स्पर्धेच्या चौथ्या व शेवटच्या दिवशी ११व्या शर्यतीअंती आरएसःएक्स गटात गोव्याच्या तिसरे स्थान मिळाले. जेरॉनने सुवर्ण तर एव्हायएन मुंबईच्या मनप्रीत सिंगने रौप्यपदक प्राप्त केले.

आरएसःएक्स यूथ विभागात ईएमईएसी भोपाळच्या केदारनाथ तिवारीने सुवर्णपदक मिळविले. टीएनएस तामिळनाडूच्या ईश्वरिया गणेशने रौप्य तर गोवा यॉटिंग असोसिएशनच्या कीओना राजानीला कांस्यपदक प्राप्त झाले. टेक्नो २९३ यूथ क्लास विभागात गोवा यॉटिंग असोसिएनच्या कीओना राजानीला सुवर्ण तर गोव्याच्याच आवेलिनो फर्नांडिसने रौप्यपदक मिळविले.

रेसबोर्ड ग्रँडमास्टर विभागात गोवा यॉटिंग असोसिएशनच्या गोपाल अमिनने सुवर्ण, आयएनडब्लूटीसी कोचीच्या मधुलाल शर्माला रौप्य तर हरिश पात्रोला कांस्यपदक प्राप्त झाले. ग्रँडमास्टर विभागात बीएसएससी उत्तराखंडच्या घनःश्यामला सुवर्णपदक मिळाले. रेसबोर्ड पुरुष विभागात ईएमईएसीच्या कमलापती व माने यांना सुवर्ण व रौप्य तर आयएडब्लूटीसी विझागच्या इमित्जुलू याला कांस्यपदक मिळाले. रेसबोर्ड खुल्या विभागात कमलापतीला सुवर्ण तर गोवा यॉटिंग असोसिएशनच्या कात्या कुयेल्होला रौप्य तर मानेला तृतीय स्थान प्राप्त झाले. बक्षीस वितरण सोहळ्याला भारतीय यॉटिंग असोसिएशनचे संयुक्त मानद सरचिटणीस कॅप्टन जितेंद्र दिक्षित यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते कॅप्टन दिलीप धोंडे, सेसार फर्नांडिस, डेरिक मिनेझीस आणि पन्निरसेल्वम मूक्केन यांच्या उपस्थितीत विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.