रेषा तुटली…

चौकटीचे जाकीट आणि धोतर अशा वेशातला, गांधी चष्मा लावणारा आणि डोक्यावर मोजकेच केस असलेला ‘कॉमन मॅन’ नेहमी मूकच असे, पण आता तो कायमचाच मूक झाला आहे. ‘मी त्याला शोधले नाही, त्यानेच मला शोधले’ असे सांगणारा आर. के. लक्ष्मण नावाचा त्याचा निर्माता काळाच्या पडद्याआड गेला आहे. भारताच्या राजकीय, सामाजिक इतिहासाचा एक मार्मिक, मिष्कील भाष्यकार निवर्तला आहे. लक्ष्मण यांनी अर्धशतकाहून अधिक काळ या देशातील विविध क्षेत्रांतील विसंगतींवर बोट ठेवले, भ्रष्ट राजकारण्यांच्या सुहास्य मुखवट्यांखालच्या विद्रुप चेहर्‍यांना बोचकारले, सामान्यांच्या हिताआड येणार्‍या गोष्टींवर आपल्या कुंचल्याचे प्रहार केले. ही अखंड वाहती रेषा आता तुटली आहे. एक तीव्र आणि तीक्ष्ण विनोदबुद्धी असलेला महान व्यंगचित्रकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. लोभस रेषांतली आणि बारीकसारीक तपशिलानिशी येणारी त्यांची व्यंगचित्रे यापुढे साकारणार नाहीत. खरे तर त्यांची डावी बाजू लुळी पडली, तेव्हाच त्यांच्या रेखाटनांवर बंधने आली होती. चार वर्षांपूर्वी दुसर्‍या झटक्यात वाणी गेली, परंतु ‘चित्रे काढण्याखेरीज आयुष्यात दुसरी महत्त्वाकांक्षा नव्हती’ म्हणणारा हा अवलिया व्यंगचित्रकार आपली ती विनोदबुद्धी शेवटपर्यंत राखून होता. म्हैसूरसारख्या शांत, निवांत, सुंदर शहरामध्ये जन्मलेले रासिपुरम कृष्णास्वामी लक्ष्मण मुंबईच्या मायानगरीत स्थिरावले. फ्री प्रेस जर्नलमार्गे टाइम्स ऑफ इंडिया समूहात प्रवेशले. १९५१ साली तेथे त्यांच्या ‘यू सेड इट’ मालिकेचा प्रारंभ झाला आणि पुढे घडले तो सारा तर इतिहास आहे. अवतीभवतीच्या घटना – घडामोडींवरचे नेमके, मर्मभेदी भाष्य, पण तेही एक विशिष्ट लक्ष्मणरेषा सांभाळून ते करीत राहिले आणि बघता बघता कोट्यवधी भारतीयांना हा आपलाच आवाज वाटू लागला. देशातील एक सर्वश्रेष्ठ व्यंगचित्रकार ठरलेल्या याच लक्ष्मण यांना जेजे स्कूल ऑफ आर्टने एकेकाळी प्रवेश नाकारला होता हे सांगितले तर आज आश्चर्य वाटेल. ‘‘देशातील राजकारण्यांनी जनतेची काळजी घेतली नाही, पण माझी मात्र घेतली’’ असे लक्ष्मण मिश्कीलपणे सांगायचे, कारण या राजकारण्यांनीच त्यांना नित्य विषय पुरवले. व्यंगचित्राची ती चौकट कधीच कोरी राहू दिली नाही. तीक्ष्ण नाकाच्या इंदिरा असोत, मोठ्‌ठ्या ओठांचे नरसिंहराव असोत, गुबगुबीत गालांचे अटलबिहारी असोत, नेहमीच संत्रस्त दिसणारे मनमोहनसिंग असोत, या सार्‍या व्यक्ती लक्ष्मण यांनी आपल्या व्यंगचित्रांतून बारकाव्यांनिशी चितारल्या. नेहरूंसारख्या देखण्या पुरूषाचे कोणते व्यंग दाखवायचे हा प्रश्न त्यांना पडला होता, पण बिनटोपीचे नेहरू काढून त्यांनी तो सोडवला! त्यांची रेषा तर पक्की होतीच, पण त्याहीपेक्षा खालच्या ओळीतले त्यांचे भाष्य मार्मिक असे. त्यातून विनोदनिर्मिती होत असली, तरी एक जळजळीत सामाजिक वास्तवच ते आपल्या त्या व्यंगचित्रातून प्रकट करीत असत. या देशातील राजकारण एवढे वाईट आहे की मी व्यंगचित्रकार नसतो, तर कदाचित आत्महत्याच केली असती, असे ते एकदा उद्वेगाने उद्गारले होते. सर्वसामान्यांच्या व्यथा – वेदनांशी, सुख दुःखाशी त्यांनी नाते जोडले होते. आपले व्यंगचित्र हे त्याच्यासाठी आहे असे ते मानत. त्यामुळेच त्यांनी या सामान्य माणसालाच आपल्या व्यंगचित्रामध्ये मानाचे स्थान दिले. एकदा हा ‘कॉमन मॅन’ काढायला ते विसरले तर देशभरातून संतप्त पत्रांचा पाऊस पडला होता. एकदा त्यांनी कॉमन मॅन विमानात दाखवला, तर तुमच्या सामान्य माणसाला विमान प्रवास कसा परवडतो असा संतप्त सवालही वाचकांनी केला होता. या कॉमन मॅनच्या चेहर्‍यावरचे भाबडे, अगतिक, संभ्रमित असे विविध भावही प्रेक्षणीय असत. घटना प्रसंगांवर लक्ष्मण यांनी केवळ मार्मिक भाष्यच केले असे नव्हे, तर त्यांची व्यंगचित्रे एक कलाकृती म्हणूनही श्रेष्ठ आहेत. आपल्या व्यंगचित्रामध्ये सर्व तपशील ते काटेकोरपणे भरत. फर्निचरच्या पायांवरचे कोरीवकाम असो किंवा भिंतीवरचे चित्र असो, खिडकीबाहेरचे दृश्य असो किंवा खालच्या गालिच्यावरची नक्षी असो, तो सगळा तपशील बारकाव्यांनिशी काढण्यावर त्यांचा कटाक्ष असे. त्यामुळे त्यांचे व्यंगचित्र कधी मोकळे वाटत नसे. तीक्ष्ण विनोदबुद्धीचा आणि निर्विष वृत्तीचा एक भला गृहस्थ आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. मागे उरला आहे, तो त्यांच्या चिरतरूण व्यंगचित्रांचा खजिना.