रिचर्डस्‌सारखा खेळतो विराट

>> सुनील गावसकर यांनी केले कोहलीचे कौतुक

लिट्ल मास्टर सुनील गावसकर यांनी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याची तुलना माजी कॅरेबियन फलंदाज सर व्हिवियन रिचर्डस् यांच्याशी केली आहे. गावसकर म्हणाले की, विराट कोहली हा अव्वल क्रमांकाचा फलंदाज मानला जातो कारण तो व्हिव रिचर्डस् यांच्यासारखा फलंदाजी करतो. स्टार स्पोर्टस् वाहिनीवरील ‘विनिंग दी कप १९८३’ या कार्यक्रमात त्यांनी कोहली व रिचर्डस् यांच्यातील साधर्म्य सांगितले.

विराटपूर्वी गुंडप्पा विश्‍वनाथ व व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यात ‘व्हिव’ यांची झलक दिसायची, असेही गावसकर म्हणाले.
विराट कोहली सध्या जागतिक क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. बर्‍याचवेळा अनेक दिग्गज खेळाडू त्याची दुसर्‍या एखाद्या खेळाडूशी तुलनादेखील करतात. गावसकर यांनादेखील हा मोह आवरता आलेला नाही. त्यांनी विराटची तुलना रिचर्डस् यांच्याशी केली आहे.

गावसकर म्हणाले की, जेव्हा रिचर्डस् क्रीझवर असायचा तेव्हा गोलंदाजांना त्याला रोखणे म्हणजे डोेकेदुखी असायची आणि आज विराट कोहलीदेखील अशीच फलंदाजी करतो आहे. विराट कोहलीचा जलवा अजूनही चालूच आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतके केली आहेत. एकदिवसीय सामन्यांत कोहलीने ४३ शतके आणि कसोटीत २७ शतके ठोकली आहेत. त्याच्या कामगिरीमधील सातत्य त्याच्यात असलेल्या गुणवत्तेमुळेच आहे.

गावसकर पुढे म्हणाले की, जर विराटची फलंदाजी पाहिली तर एका चेंडूला तो ‘बॉटम हँड’ने मिड – विकेट ते मिड -ऑनच्या दिशेने सीमारेषेपार पोहोचवू शकतो आणि अगदी त्याच चेंडूवर तो ‘टॉप हँड’चा वापर करून ‘एक्स्ट्रा कव्हर’च्या दिशेने चौकार लगावू शकतो. म्हणूनच तो जगातील फलंदाज आहे जो व्हिव रिचर्डस्‌प्रमाणे नेमकी फलंदाजी करतो.