राहुल नही सुधरेंगे

  • ल. त्र्यं. जोशी

राहुल गांधी मोदींचा सतत दुस्वास आणि द्वेषच करीत राहिले. लोकसभेत त्यांनी मोदींना मिठी मारण्याचा बालीश चाळा जरुर केला, त्यानंतर डोळा मारुन त्यातील उरलेसुरले गांभीर्यही घालवून टाकले. आजही जेव्हा राहुल आणि पवार मोदी द्वेषाचेच घोडे पुढे दामटण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यातून ‘हम नही सुधरेंगे’ हाच संकेत मिळतो!

केरळमधील वायनाड मतदारसंघातील दौर्‍यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर, राजीनामा दिलेले कॉंग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांनी भरपूर तोंडसुख घेऊन पुन्हा एकदा ‘हम नही सुधरेंगे’ हा संदेश उच्चरवाने दिला आहे. त्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक शरद पवार तर पराभवाने इतके बेभान झाले आहेत की, ते दररोज एक नवे आणि दुसरे जुन्याला छेद देणारे वक्तव्य देऊन लोकांची करमणूक आणि स्वत:ची फसवणूक करून घेत आहेत. राहुल किंवा पवार यांच्या भावना अर्थातच समजण्यासारख्या आहेत, कारण त्यांनी कल्पिलाही नव्हता एवढा प्रचंड पराभव २०१९ च्या लोकसभा निवडणुकीने त्यांच्या पदरात टाकला आहे. ते दोघेही उघडपणे नव्हे पण मनातल्या मनात पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहत होते.

विरोधकांपैकी कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या तर राहुल आणि कथित महागठबंधनाला मिळाल्या तर शरद पवार हे जवळपास ठरले होते. या पार्श्वभूमीवर त्या दोघांचाही अकल्पित पराभव झाल्यानंतर त्यातून वैफल्य आले नसते तर ते एक आश्चर्य ठरले असते. शेवटी राहुल, पवार काय किंवा मायावती, अखिलेश काय, ही माणसेच आहेत. फरक इतकाच आहे की, आतापर्यंत ते जमिनीच्या आपापल्या कल्पनेतील उंचीवरून चालत होते. आता त्यांचे पाय जमिनीवरही नव्हे, जमिनीच्या आत रुतले आहेत. आपलेही पाय मातीचेच आहेत याची त्यांना जाणीवही होत आहे. त्यामुळे ते अक्षरश: बावचळून गेले आहेत. काय बोलावे व काय बोलू नये याचे भानच त्यांना राहिलेले नाही. अर्थात हे अपेक्षित होतेच. निकालांपूर्वीच मोदींनी जाहीरपणे सांगितले होते की, ही मंडळी पराभवानंतर एकमेकांचे कपडे फाडायला लागतील. त्यांचा हा उद्वेग कपडे फाडण्यापेक्षा कमी गंभीर नाही.

पराभवानंतरच्या कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुलने कमलनाथ आणि अशोक गहलोत या दोन मुख्यमंत्र्यांवर पुत्रप्रेमाचा आरोप करणे, तावातावात आपला अध्यक्षपदाचा राजीनामा देणे, त्यावर ठाम असल्याचा देखावा निर्माण करणे हे कपडे फाडण्यासारखेच नाही काय? कमलनाथ, अशोक गहलोत यांच्यावर आरोप करण्यापूर्वी आपणही मातेच्या पुत्रप्रेमाचेच लाभार्थी आहोत याचा विचार तरी त्यांच्या मनात आला होता काय? राहुल आणि शरद पवारांपेक्षा मायावती आणि अखिलेश किती तरी पटींनी अधिक समंजस आहेत. पराभवाचा धक्का त्यांनाही बसला. सभ्यपणाने ते वेगवेगळेही झाले. परस्परांबद्दल कोणतीही कटुता निर्माण होऊ न देता. राहुल आणि शरद पवार यांच्यात तर तेवढीही दानत नाही. चंद्राबाबूही समंजसच म्हटले पाहिजेत. पराभवानंतर त्यांची वाचाच बंद झाली. ममताही बोलूनचालून वाघीणच. ती आपला संभाव्य पराभव टाळण्यासाठी जिवाच्या आकांताने लढायला निघाली आहे. राहुल आणि शरद पवार यांच्यात तेवढीही धमक राहिलेली नाही. राहुल नैराश्यातून पाय आपटत आहेत तर पवार नथीतून तीर मारण्यात मग्न आहेत. आपल्या या वागण्यातून भारतीय लोकशाहीचे हसे होत आहे आणि आपण टवाळीचे विषय बनत आहोत, याचे भानदेखील त्यांना राहिलेले नाही.

खरे तर पराभवाचा एवढा दणदणीत मार यावेळी त्यांनी प्रथमच खाल्ला असेल, पण यापूर्वीही कॉंग्रेस आणि पवार यांचे निवडणुकीत पराभव झाले नाहीत असे नाही. १९७७ मध्ये इंदिरा गांधींचा, १९८९ मध्ये राजीवचा, १९९६ मध्ये नरसिंहरावांचा, १९९९ मध्ये सोनियांचा पराभव झाला होता. १९८० नंतर पवारही पराभवाचे अनेक धक्के सहन करीत आहेतच, पण आजच्या इतके ते कधीही सैरभैर झाले नाहीत. कारण ‘२०१९ आपलेच’ या गुर्मीत ते वावरत होते. राहुल उद्दामपणे तर पवार छुप्या रुस्तुमासारखे.
वास्तविक भारतातील कॉंग्रेसेतर पक्ष १९५२ पासून सातत्याने पराभवच पचवित होते. इतके की, पराभवाची त्यांना सवयच झाली होती. याला भाजपा (पूर्वीचा जनसंघ), समाजवादी मग ते प्रसप असोत की, संसप असोत, लोहियावादी असोत की, एस.एम.जोशीवादी असोत, भाकपा, माकपा, रिपब्लिकन पार्टी, बसपा, मुस्लिम लीग यांच्यापैकी कुणीही असोत, काही अपवाद सोडले तर ते सतत पराभवच पचवत आले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे ५२ खासदार निवडून आले. कॉंग्रेसने ४४ वरुन ५२ वर जाणे आणि मोदींनी २८२ वरुन ३०२ वर जाणे याचे त्रैराशिक मांडून प्रमाण काढून पहा. कॉंग्रेसची कामगिरी उजवी ठरते, पण तरीही हा पराभव झोंबणाराच आहे. वरील विरोधी पक्ष तर कधीही अधिकृत विरोधी पक्ष बनण्याचीही आकांक्षा धरू शकत नव्हते. उमेदवारही ‘पडायचे आहे, डिपॉझिट वाचले तर नशीब’ असे आधीच सांगून निश्चित व्हायचे. पण त्यांनी कधीही पराभवाबद्दल एवढी आदळआपट केली नव्हती. आजही माकपा, भाकपा शांतच आहेत. पण या देशावर राज्य करणे हा जणू आपला जन्मसिध्द हक्क आहे, या भ्रमात वावरणारेच प्रक्षुब्ध होऊन होश गमावून बसले आहेत.

लोकसभेच्या १९५२ च्या पहिल्या निवडणुकीत त्यावेळच्या भारतीय जनसंघाला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. १९७७ पूर्वी त्याने कधीही ५० चा आकडा ओलांडला नाही. १९८४ मध्ये तर वाजपेयी, अडवाणी यांच्यासहीत भाजपाचे सर्व नेते पराभूत होऊन केवळ दोन खासदार लोकसभेत निवडून गेले होते. एक आंध्रप्रदेशातील जंगा रेड्डी आणि दुसरे गुजरातमधील ए.के.पटेल. दोघांची नावे देखील लोकांना माहित नव्हती. पन्नास वर्षांत प्रथमच भाजपाचे वाजपेयी तेरा दिवसांसाठी का होईना पंतप्रधानपदापर्यंत पोचले. पुढे तेरा महिने सरकार चालविण्याची संधी त्यांना मिळाली, पण सातत्याने पराभव होत असतांना त्यांनी कधी त्रागा केला नाही. उलट आपले कार्य चिकाटीने आणि निष्ठापूर्वक सुरूच ठेवले. आज त्यांना मिळत असलेले यश हा त्या सेवेचा परिणाम आहे. राहुल आणि शरद पवार यांच्या तर हे सारे समजण्याच्या पलीकडचे आहे, कारण ते सोन्याचे चमचे घेऊनच जन्माला आलेत. म्हणून ते मोदींच्या, इव्हीएमच्या, निवडणूक आयोगाच्या, सरकारी नोकरांच्या नावाने बोटे मोडण्यात धन्यता मानत आहेत.
दुर्दैव हे की, हा सिलसिला २०१४ पासूनच सुरु आहे. त्यावेळी मोदींना मिळालेले यश राहुलने कधीही मान्य केले नाही. त्या पाच वर्षांच्या काळात त्यांनी फक्त एकदा विरोधी पक्षाचा प्रतिनिधी या नात्याने पंतप्रधानांची अधिकृत भेट मागितली. मोदींनीही ती अतिशय तत्परतेने दिली. उत्तरप्रदेशातील उसउत्पादकांच्या समस्येच्या संदर्भात ती होती. त्यानंतर मात्र राहुल गांधी मोदींचा सतत दुस्वास आणि द्वेषच करीत राहिले. लोकसभेत त्यांनी मोदींना मिठी मारण्याचा बालीश चाळा जरुर केला, त्यानंतर डोळा मारुन त्यातील उरलेसुरले गांभीर्यही घालवून टाकले. आजही जेव्हा राहुल आणि पवार मोदी द्वेषाचेच घोडे पुढे दामटण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यातून ‘हम नही सुधरेंगे’ हाच संकेत मिळतो!