रासई, कुंकळ्ळी, बाळ्ळीत ३७ कोरोनाबाधित रुग्ण

काल गुरूवारी रासई, कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत व बाळ्ळी येथे ३७ कोरोनाबाधित सापडले. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत काम करणार्‍या दोन पॉझिटिव्ह कर्मचार्‍यांच्या कुटुंबीय व तेथील इतर कर्मचार्‍यांच्या लाळेची तपासणी केली असता एकंदर ७ जण पॉझिटिव्ह सापडले.

बाळ्ळी येथे काल चारजण पॉझिटिव्ह सापडले. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. यातील दोघेजण वेर्णा औद्योगिक वसाहतीत काम करीत होते. त्या दोघांना व त्यांचा संपर्क आलेले इतर दोघे कोरोनाबाधीत झाले. त्यांच्या कुटुंबियांची तपासणी करण्यात आली असून ही संख्या वाढण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. काही दिवसामागे या औद्योगिक वसाहतीत केपे येथील महिला काम करीत होती. तिलाही कोरोना बाधा झाली होती.

रासईत २६ बाधित
रासई – लोटली येथे पाच कुटुंबातील २६ जणांना कोरोनाची बाधा झाली. रासई पंचायतीचे माजी पंच वेर्णा औद्योगिक वसाहतीत काम करीत आहेत. त्यांनाही बाधा झाली. तसेच त्यांचा भाऊही काम करीत आहे त्या दोघांना व त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या कुटुंबियांची तपासणी करण्यात आली. यावेळी एकूण १२३ लोकांची तपासणी केली असता त्यात २६ जण पॉझिटिव्ह सापडले. त्यामुळे तो भाग क्वारंटाईन करण्याची तेथील नागरिक मागणी करीत आहेत.

कोविड इस्पितळातील
आयसिसू विभाग भरला
दरम्यान, कोविड इस्पितळातील इन्सेटिव केअर युनिट अतीदक्षता विभागामध्ये सहाच खाटा असून आता कोरोनाबांधितांची समस्या निर्माण झाली आहे. आता आणखी १२ खाटा वाढविण्याची तयारी सुरू झाली आहे. एका इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर हे करण्यात येणार असून त्यासाठी तयारी सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आज वा उद्या तेथे तो विभाग साधनसुविधांनी तयार केला जाणार असून युद्धपातळीवर काम सुरू झाले आहे.

लोटलीत नवीन २५ रुग्ण
सासष्टीमधील लोटली येथे नवीन २५ रुग्ण आढळून आले असून रुग्ण संख्या ३० झाली आहे. मडगाव येथे २ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

वेर्ण्यातील एक कंपनी
१४ दिवस बंद
वेर्णामधील औद्योगिक वसाहतीतील एक कारखाना १४ दिवस बंद ठेवण्याचा आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी दिला आहे. या कारखान्यात काम करणारे बरेच कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. तसेच त्यांच्याकडून त्यांच्या कुटुंबीय व शेजार्‍यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला असल्यामुळे एका लेखी आदेशाद्वारे हा कारखाना बंद ठेवण्याचा आदेश दिल्याचे दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. तसेच जिल्हाधिकार्‍यांनी या कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी यांना १४ दिवस होम क्वारंटाईन होण्याचे आदेशात म्हटले आहे. या कारखान्यात काम करणारे कर्मचारी राज्यभरातून दररोज येथे कामाला येत असत. त्यांचा संसर्ग त्यांच्या कुटुंबियांना व शेजार्‍यांनाही झाला. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी ३४ (सी) आपत्तकालीन सेवा कलमाखाली हा आदेश दिला.