राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा जानेवारीनंतर घ्या

>> आयओएला सरकारची सूचना

गोव्यात होऊ घातलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे जानेवारी महिन्यानंतरच आयोजन करण्यात यावे, अशी सूचना राज्य सरकारने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत दिली.
या स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्याची तयारी भारतीय ऑलिम्पिक संघटना करीत होती. मात्र, या स्पर्धांसाठीचे आयोजन करण्यास आम्हांला आणखी वेळ हवा आहे. नोव्हेंबर महिना उजाडण्यास फक्त तीन महिने शिल्लक आहेत. या तीन महिन्यांत आयोजनासाठीची तयारी करणे राज्य सरकारला शक्य नाही, असे आयओएला कळवले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, स्पर्धांच्या तारखा निश्‍चित झाल्यानंतर सगळी तयारी पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला किमान पाच महिन्यांचा अवधी हवा आहे. आम्ही या स्पर्धा मे महिन्यात घ्या अशी सूचना भारतीय ऑलिम्पिक संघटनेला केली होती. ते नोव्हेंबर महिन्यात घेऊ पाहत असून ते शक्य नसल्याचे सावंत म्हणाले. राज्यातील आपले क्रीडा संघही या स्पर्धेसाठी सज्ज झालेले नाहीत. त्यांच्यासाठी आम्हांला प्रशिक्षकांची नेमणूक करायची आहे. त्यानंतरच या संघांतील खेळाडूंचा सराव सुरू होणार असल्याचे सावंत म्हणाले.

काल प्रश्‍नोत्तराच्या तासाला आमदार विल्फ्रेड डिसा यांनी सदर प्रश्‍न विचारला होता. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी साधनसुविधा सरकारने उभारल्या आहेत काय, असा प्रश्‍न डिसा यांनी विचारला होता. त्यावर उत्तर देताना बाबू आजगावकर यांनी या क्रीडा स्पर्धेसाठी साधनसुविधा तयार आहेत. जे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत त्यांचे ऑगस्ट महिन्यात उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहितीही आजगावकर यांनी यावेळी दिली.

या स्पर्धांसाठी विविध राज्यांतून जे क्रीडापटू येणार आहेत त्यांच्यासाठी राहण्याची, वाहतुकीची, जेवणाची आदी सोय करावी लागणार आहे. त्यासाठीच्या निविदा क्रीडा स्पर्धांच्या तारखा निश्‍चित झाल्याशिवाय काढता येत नाहीत. या निविदा काढल्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान दोन महिन्यांचा अवधी लागत असल्याचेही आजगावकर यांनी यावेळी सांगितले.
या स्पर्धांसाठी केंद्राने आतापर्यंत राज्याला किती निधी दिला आहे, असा प्रश्‍न आमदार सुदिन ढवळीकर यांनी यावेळी केला. त्याचे उत्तर देताना ९७ कोटी ८० लाख रु. केंद्राने दिले असल्याची माहिती आजगावकर यांनी दिली.