राष्ट्रगीताचा मान राखलाच पाहिजे!

– दत्ता भि. नाईक

राष्ट्रधर्मापेक्षा दुसरा कोणताही धर्म नाही व राष्ट्रनिष्ठेपेक्षा श्रेष्ठ कोणतीही निष्ठा नाही. ज्याच्याकडे राष्ट्रनिष्ठा नाही त्याला जीवननिष्ठा नाही म्हणूनच तो भरकटत कुठेही जात असतो. राष्ट्रगीताचा मान राखणे हे केवळ कायद्याने आपले कर्तव्य ठरत नसून नैतिकदृष्ट्याही ते आपले कर्तव्य आहे, हे सर्वजणांनी ध्यानात ठेवले पाहिजे.

साधारणपणे तीस-पस्तीस वर्षांमागे सिनेमाघरात चित्रपट संपल्यानंतर पडद्यावर तिरंगा फडकावून राष्ट्रगीत सादर करण्याची पद्धत होती. अगदी शेवटी सिनेमाघरातून बाहेर पडण्याची घाई असल्यामुळे लोक थोडेसे नाराज असायचे, तरीही राष्ट्रगीत सुरू असल्यामुळे त्याचा मान राखणे गरजेचे आहे म्हणून लोक उभे राहत असत. त्यानंतर चित्रपट आटोपल्यानंतर प्रेक्षक राष्ट्रगीताचा मान राखण्याच्या मनःस्थितीत नसतात म्हणून अखेरीस सिनेमाघरातील राष्ट्रगीत बंद करण्यात आले होते. आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दि. ३० नोव्हेंबर रोजी दिलेल्या निकालामुळे हा विषय पुनः एकदा चर्चेत आलेला आहे. राष्ट्रगीताचा मान राखणे हाही विषय परत एकदा सगळीकडे वादाचा विषय बनेल की काय, अशी शक्यता उद्भवू लागली आहे.
जनहित याचिकेचा निकाल
सर्वोच्च न्यायालयाने कोणताही चित्रपट सुरू होण्यापूर्वी पडद्यावर तिरंगी ध्वजासह राष्ट्रगीत म्हटले पाहिजे असा निकाल देताना, प्रेक्षागृहातील सर्वजणांनी उभे राहून त्याचा सन्मान केला पाहिजे, असेही निकालात म्हटले आहे. हा निकाल जाहीर केल्यानंतर दहा दिवसांनी आदेश काढला जाईल असेही यावेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ज्यावेळी राष्ट्रगीत म्हटले वा वाजवले जाते तेव्हा त्याचा सन्मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. राष्ट्रीय ओळख, राष्ट्रीय एकात्मता आणि घटनात्मक देशभक्ती या गोष्टी देशाच्या शिष्टाचाराचा भाग असून, घटनात्मक देशभक्ती, देशभक्तीची बांधिलकी व त्याचबरोबर राष्ट्रभक्तीची जाणीव व्हावी हे या निर्णयात अपेक्षित आहे, असेही या निकालावरून सूचित होते.
श्यामनारायण नावाच्या एका इसमाने जनहित याचिका प्रस्तूत केल्याने न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे. राष्ट्रगीताचा मान राखण्यासाठी राष्ट्रगीत चालू असताना सिनेमाघराचे दरवाजे बंद ठावावे, ज्यामुळे लोकांची हालचाल व चुळबूळ आपोआपच बंद होईल व कुणीही राष्ट्रगीताचा अवमान करणार नाही, असेही या निकालात म्हटले आहे.
चेन्नईमधील घटना
आपल्या घटनेने धर्माचरणाचे व धर्मप्रचार व प्रसाराचे स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलेले आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे सेक्युलरिझमचा वापर करून, देशहिताची कोणतीही बाब स्वहितासाठी कशी राबवावी याबाबतीत अतिशय चतुर अशी मंडळी आपल्यामध्ये आहे. लोकांच्या नागरी हक्कांसाठी लढा देणार्‍या वा तसे भासवणार्‍या अनेक बिगर सरकारी संस्था म्हणजे एनजीओ आपल्याकडे भरपूर आहेत. यांतील बहुतेक संस्था देश वा राष्ट्र या संकल्पनांची खिल्ली उडवण्यात धन्यता मानण्यात वाकबगार आहेत. राष्ट्रगीत गायनाच्यावेळी उभे राहणे म्हणजेच देशभक्ती आहे काय? यासारखे हास्यास्पद प्रश्‍न ही मंडळी संधी मिळाली की उपस्थित करतात.
डिसेंबर ११ रोजी चेन्नई शहरात घडलेली घटना सर्वांचे डोळे उघडणारी आहे. शहरातील कासी सिनेमाघरात ‘चेन्नई-२८-११’ या नावाचा चित्रपट पाहण्यासाठी आलेले आठजण राष्ट्रगीत वादनाच्या वेळेस उभे राहिले नाहीत. हे कुणी अशिक्षित नव्हते. श्रीला नावाची महिला स्वतःला या गटाची प्रमुख म्हणवून घेते. आम्ही लोकहितासाठी वावरतो असे या महिलेचे म्हणणे आहे. आम्ही समाजकार्यकर्ते असून राष्ट्रगीत सुरू असताना आम्ही बसून राहिलो म्हणून काय झाले. देशभक्ती व्यक्त करण्याचा हा एकमेव मार्ग नाही, असे या विद्वान महिलेचे म्हणणे आहे. सिनेमाघरात उपस्थित असलेल्या काही तरुणांनी चित्रपटाच्या मध्यंतरानंतर या मंडळीला बदडून काढले असा या समाजकार्यकर्त्यांचा आरोप आहे. सुरुवातीला पोलीस भानगडीत पडायला तयार नव्हते. त्यानंतर जमलेल्या तरुणांनी दबाव आणल्यामुळे या समाजकार्यकर्त्यांवर राष्ट्रीय सन्मान १९७१ च्या कायद्याखाली कारवाई केली. एम.जी.आर. पोलीस स्टेशनवरील पोलिसांनी आम्हाला राष्ट्रभक्तीवर लांबलचक भाषण सुनावले असे त्यांच्या नेत्या श्रीलाबाईचे म्हणणे आहे.
म्हणजेच देशभक्ती आहे काय?
‘वंदे मातरम्’ हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे गीत सुरुवातीला स्वातंत्र्यलढ्याच्या काळात राष्ट्रगीत म्हणून जवळजवळ निश्‍चित झाले होते. रवींद्रनाथ टागोर यांचे ‘जन गण मन’ हे गीत इंग्लीश साम्राज्याचा सम्राट पंचम जॉर्ज याच्या गौरवार्थ लिहिले गेले असे बर्‍याच जणांचे म्हणणे आहे. भारत भाग्य विधाता कोण? याचे उत्तर कुठेही सापडत नाही, तरीही वंदे मातरम् या गीतात मूर्तिपूजा आहे म्हणून हे गीत नको असा सूर कॉंग्रेसमधील काही नेत्यांनी लावला व वंदे मातरम् हे गीत मागे पडले. स्वातंत्र्यानंतर बँडच्या तालावर वंदे मातरम् हे गीत गाता येत नाही एवढेच कारण सांगून रवींद्रनाथ टागोर रचित जन गण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणून घटना समितीने निवडले.
एकदा राष्ट्रगीत म्हणून मान्य झाल्यानंतर ते गीत कोणी कोणत्या कारणास्तव लिहिले याची चर्चा करणे रास्त होणार नाही. राष्ट्रगीताचा मान राखणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. लोकशाहीसारखी दुसरी व्यवस्था नाही. जगातील कोणत्याही देशाचे तेथील हुकूमशहाने भले केलेले नाही. मुस्कटदाबी हा हुकूमशहांचा एकमेव कार्यक्रम असतो. या लोकशाहीचा वापर करून काही विचारवंत मंडळी आपल्या देशाच्या काही सन्मान्य गोष्टींवर हल्ला चढवताना दिसतात. राष्ट्रगीत चालू असताना उभे राहणे म्हणजेच देशभक्ती आहे काय? यासारखे बालिश व निरर्थक प्रश्‍न या मंडळीकडून विचारले जातात.
राष्ट्रनिष्ठेची अभिव्यक्ती
आमच्या उपासनापंथात परमेश्‍वर सोडून कोणाचेही अभिवादन करण्यास परवानगी नाही असा विषय मांडणारे काही महाभागही या देशात आहेत. जेहोव्हा साक्षी नावाचा एक ख्रिस्ती पंथ सध्या आपल्या देशात घुसत आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे देव सोडून कोणत्याही कल्पनेवर आधारित प्रार्थना ते म्हणू शकत नाहीत. काही शाळांमधून या पंथाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहण्यास नकार दिला. ज्यावेळी त्यांना कायद्याचा बडगा दाखवला तेव्हा त्यानी आम्ही उभे राहू, पण सर्वांच्यासोबत राष्ट्रगीत म्हणणार नाही असाही युक्तिवाद केला. जेव्हा राष्ट्रभक्तीचा विषय येतो तेव्हा काही उपासना पंथ आमच्या ग्रंथात राष्ट्रप्रेमाला कसे प्रथम स्थान आहे याचे वर्णन करतात व प्रत्यक्ष जेव्हा त्यानुसार वागण्याचा प्रसंग येतो तेव्हा आमच्या उपासना पंथात या सर्व प्रतिकांना मान्यता कशी नाही याचे पुरावे देतात. अशावेळी आपल्या देशातील स्वतःला विचारवंत म्हणवून घेणारी मंडळी त्यांच्या समर्थनार्थ धावून येते.
चेन्नईच्या श्रीलाबाई या विचारवंताच्या प्रतिनिधी आहेत. राष्ट्रगीताचा अवमान करणारे म्हणून या लोकांची नीट चौकशी झाली पाहिजे. या मंडळीनी राष्ट्रगीताचा अवमान केला, इतकेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचीही एक प्रकारे खिल्ली उडवलेली आहे. ज्यांचा या देशातील संस्थाव्यवस्थांवर विश्‍वास नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मावोवादी व नक्षलवादी जेव्हा सामान्य माणसाच्या व जवानांच्या हत्या करतात तेव्हा हत्या करणार्‍यांच्या मानवाधिकारांसाठी हेच लोक हलकल्लोळ माजवतात.
राष्ट्रगीताचा मान म्हणजे राष्ट्रनिष्ठेची अभिव्यक्ती असते. गीत बनण्यापूर्वी ते साधे शब्द असतात. ते एका रचनेत बसवले की त्याचे सुंदर गीत बनते. त्याला राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली की त्या गीताला सर्वोच्च स्थान प्राप्त होते. राष्ट्रध्वजाचेही तसेच असते. तो बनतो तेव्हा ते एक फडके असते, परंतु त्याला मान्यता दिल्याने ते राष्ट्राचे सर्वोच्च प्रतीक बनते. हे समजूनही न समजण्यासारखे वागणारे लोक आपल्या देशात आहेत. कोणताही उपासना पंथ वा धर्म असो, त्याचे स्थान वैयक्तिक जीवनात आहे असे म्हणणारेच धर्माला देशाच्या विरोधात पेटवले जात असताना शांत बसतात. राष्ट्रधर्मापेक्षा दुसरा कोणताही धर्म नाही व राष्ट्रनिष्ठेपेक्षा श्रेष्ठ कोणतीही निष्ठा नाही. ज्याच्याकडे राष्ट्रनिष्ठा नाही त्याला जीवननिष्ठा नाही म्हणूनच तो भरकटत कुठेही जात असतो. राष्ट्रगीताचा मान राखणे हे केवळ कायद्याने आपले कर्तव्य ठरत नसून नैतिकदृष्ट्याही ते आपले कर्तव्य आहे, हे सर्वजणांनी ध्यानात ठेवले पाहिजे.