रायबंदरला गँगवॉर; चारजण जखमी

>> तलवार हल्ल्यात एकाचा हात तुटला

>> दोन्ही गटातील सर्व संशयित फरारी

नागाळी – ताळगाव आणि रायबंदर येथे रविवारी रात्री एका टोळक्याने पूर्व वैमनस्यातून तलवार, लोखंडी सळ्या आदींच्या साहाय्याने केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून कृष्णा कुर्टीकर (नागाळी, ताळगाव) याचा उजवा हात तलवारीच्या वार करून मनगटापासून तोडण्यात आला आहे. यासंबंधी ओल्ड गोवा पोलीस स्टेशन आणि पणजी पोलीस स्टेशनवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील चौघेही संशयित फरारी आहेत. दरम्यान, पणजी परिसरातील विविध भागात गुंडगिरीने पुन्हा डोके वर काढल्याची जोरदार चर्चा नागरिकांत सुरू झाली आहे.

या प्रकरणी जॅक (ताळगाव), कमलेश (ताळगाव), गौरीश (ताळगाव), मनीष (चोडण) यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ओल्ड गोवा पोलीस स्टेशनवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास संशयित जॅक, कमलेश, गौरीश, मनीष व अन्य चौघांनी पूर्ववैमनस्यातून तलवार, लोखंडी सळ्या यांच्या साहाय्याने नागाळी, ताळगाव येथे एकनाथ जानू गौंस आणि त्याचा शेजारी युवनाथ कुर्टीकर यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. युवनाथ कुर्टीकर यांच्या डोक्यावर तलवारीने हल्ला करण्यात आल्याने जबर जखम झाली आहे. यासंबंधी एकनाथ याने पणजी पोलीस स्टेशनवर तक्रार दाखल केली आहे.

एकनाथ आणि युवनाथ यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळताच त्यांचे मित्र दिलीप काणकोणकर आणि कृष्णा कुर्टीकर यांनी हल्लेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांची स्कूटर दृष्टीस पडल्यानंतर दोघांनी त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. रायबंदर जंक्शनजवळ हल्लेखोरांनी पाठलाग करणार्‍या दिलीप व कृष्णा यांच्यावर तलवार, दगडाच्या साहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यात दिलीप व कृष्णा जखमी झाले. कृष्णा याच्यावर तलवारीच्या साहाय्याने हल्ला करण्यात आल्याने त्याचा उजवा हात मनगटापासून वेगळा झाला. जखमी कृष्णा रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळी पडला होता. ओल्ड गोवा पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
ओल्ड गोवा पोलिसांनी दिलीप काणकोणकर याने दाखल केलेल्या तक्रारीवरून चार जणांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पणजी आणि ओल्ड गोवा पोलिसांनी संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. परंतु, उशिरापर्यंत संशयितांचा ठावठिकाण लागू शकला नव्हता. याप्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

पाठलाग केला अन् हात गमावून बसला
संशयित जॅक यांच्या साथीदारांनी नागाळी, ताळगाव येथे दिलीप काणकोणकर व कृष्णा कुर्टीकर यांच्या गँगचे एकनाथ व युवनाथ या दोघांवर हल्ला करून जखमी करून पळ काढला. दिलीप व कृष्णा या दोघांनी हल्लेखोरांचा पाठलाग केला. रायबंदरला दोन्ही गटात हाणामारी झाली. त्यावेळी कृष्णा कुर्टीकर याच्या उजव्या हातावर तलवारीचा वार केल्याने त्याचा हात मनगटापासून तुटला.