रात्री अकरानंतर मद्यालयांत मद्यप्राशन करणार्‍यांनी वाहन चालवल्यास कारवाई

कायदा करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
रात्री अकरानंतर मद्यालयात मद्यप्राशन करून परतणार्‍यांच्या वाहनांना अपघात होण्याचे प्रमाण मोठे आहे, असे प्रकार रोखण्यासाठी रात्री मद्यालयात मद्यप्राशन करण्यासाठी जाणार्‍यांना घेऊन जाणार्‍याने मद्यप्राशन करता कामा नये अशी पध्दत विदेशात आहे. गोव्यातही तसा कायदा करण्याचा व त्याचे पालन न झाल्यास संबंधित मद्यालयांविरुध्दही कारवाई करण्याचा सरकारचा विचार आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत सांगितले.
काही दिवसांपूर्वी कांपाल येथे रात्री १ वाजता मद्यप्राशन केलेल्या महिलेने केलेल्या अपघाताची नोंद पोलिसांनी केवळ वाहतूक अपघात म्हणून केला आहे. तो केवळ अपघात नाही. मद्यप्राशन करून महिलेने वाहन चालवल्याने तो अपघात घडला. या अपघाताची पूर्ण चौकशी करून अहवाल सादर करण्यास आपण पोलिसांना सांगितल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत डिचोलीचे आमदार नरेश सावळ यांच्या प्रश्‍नावर सांगितले.
सावळ यांनी राज्यातील अपघातप्रवण जागा शोधून काढल्या आहेत काय, असा त्यांनी सरकारला प्रश्‍न विचारला होता. त्या प्रश्‍नावरील चर्चेच्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली. रात्री अकरा वाजल्यानंतर मद्यालये चालू ठेवल्यामुळेच अपघातांचे प्रमाण वाढल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.
पंधरा ते सोळा वर्षांची मुले वाहने चालवितात. आई-वडिलांनीही त्याचा विचार करण्याची गरज आहे. हेल्मेट न वापरणारे दुचाकी स्वारांचे अपघातात बळी जाणार्‍यांची अधिक संख्य असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. मद्यप्राशन करून वाहने चालविणार्‍यांवर कडक कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Leave a Reply