राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी उल्हास फळदेसाई

गोवा राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी उल्हास फळदेसाई यांची काल निवड करण्यात आली आहे. या बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या संचालकांची बैठक सोमवारी घेण्यात आली. या बैठकीत उपाध्यक्षपदी पांडुरंग कुर्टीकर यांची निवड करण्यात आली.

या बँकेच्या निवडणुकीत आठ संचालक बिनविरोध निवडून आले होते. दोन जाग्यांसाठी २५ ऑगस्टला निवडणूक घेण्यात आली होती. राज्यातील सहकार क्षेत्रात शिखर बँक असलेली गोवा राज्य सहकारी बँक आर्थिक अडचणीत सापडल्यानंतर राज्य सरकारने या बँकेवर प्रशासकांची नियुक्ती केली होती. दोन वर्षे कारभार सांभाळून बँकेला पुन्हा सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.

बँकेच्या कारभारात पूर्ण पारदर्शकता ठेवली जाणार आहे. सरकारच्या सहकार्यातून बँकेला झालेले नुकसान भरून काढण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती नूतन अध्यक्ष फळदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
बँकेचा बहु राज्य दर्जा ३१ मार्च २०१६ रोजी रद्दबातल झाला आहे. त्यानंतर राज्य सहकारी बँक गोवा सहकार कायद्याखाली आली आहे. आरबीआयने बँकेच्या दमण आणि दीव शाखांच्या विभाजनाला मान्यता दिलेली नाही, असेही फळदेसाई यांनी सांगितले.