राज्यात सध्या कोरोनाचे १३१ रुग्ण

>> मांगूर हिलमध्ये एकूण १०० पॉझिटिव्ह

>> एकूण रुग्णसंख्या १९६

मांगूर हिल वास्को येथे आणखी २६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून मांगूर हिलमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०० झाली आहे. दुबईतून आलेले आणखी ४ खलाशी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे चाचणीत आढळून आले आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३१ झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

मांगूर हिल येथील दोन प्रभागांतील नागरिकांचे कोविड चाचणीसाठी स्वॅबचे नमुने घेण्याचे काम सुरू आहे. मांगूर हिलमध्ये आत्तापर्यंत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांतील केवळ १० टक्के रुग्णांमध्ये कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येत आहेत. तर, इतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. सौम्य लक्षणे असलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आठ दिवसांत बरे होतील. काहीजणांना आयझोलेशनमध्ये देखरेखाली ठेवण्यात आले आहे. राज्यातील आत्तापर्यंत आढळून आलेले अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

२५,५०० जणांची चाचणी
राज्यात आत्तापर्यंत सुमारे २५ हजार ५०० नागरिकांची चाचणी करण्यात आली आहे. राज्यात प्रवेश करणार्‍या नागरिकांची कोविड चाचणी केली जात आहे. प्रवेश करणार्‍या नागरिकांचे चाचणीसाठी स्वॅब घेतल्यानंतर क्वारंटाईन होण्याची सूचना केली जाते. सदर नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्यास त्वरित ताब्यात घेऊन त्यांना कोविड इस्पितळामध्ये दाखल केले जात आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी मनात कोणतीही भीती बाळगू नये. एखाद्या नागरिकाबाबत संशय येत असल्यास सरकारी यंत्रणेला माहिती द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.

दुबईहून आलेले ४ खलाशी पॉझिटिव्ह
दुबईतून खास विमानातून आलेल्या खलाशांपैकी आणखी चारजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे चाचणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दुबईतून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६ झाली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

कळंगुट येथे मुंबईतून आलेल्या महिलेची मानवी चुकीमुळे कोरोना चाचणी झाली नसल्याची कबुली मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये म्हणून तपासणी नाके असलेल्या पोलीस स्थानकाच्या अधिकार्‍यांना योग्य खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
मुंबईतून कळंगुट येथे आलेल्या या महिलेच्या संपर्कातील चार जणांची चाचणी करण्यात आली असून सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. या चारजणांना स्वयं क्वारंटाईऩ होण्याची सूचना करण्यात आली आहे. सदर महिला २ जूनला गोव्यात आली असून जास्त लोकांच्या संपर्कात आलेली नाही. सदर महिलेने गोव्यात प्रवेश केल्यानंतर कोविड चाचणी केलेली नाही. सरकारी यंत्रणेला चुकवून कळंगुट येथे पोहोचली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

आरोग्य खात्याचे कर्मचारी पॉझिटिव्ह
मांगूर हिल येथे कार्यरत असलेले आरोग्य खात्याचे काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत. मांगूर हिल भागात या कर्मचार्‍यांनी डेंग्यू, मलेरिया आदींचे सर्वेक्षण केले होते. कोविडसाठी कार्य करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना आवश्यक सुरक्षा सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. फ्रंट लाईन वर्कर म्हणून कार्य करणार्‍या आरोग्य खात्याच्या कर्मचार्‍यांची राहण्याची हॉटेलमध्ये सोय केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

तर पेडणे कॉलेजमध्ये
स्वॅब केंद्र नाही
पेडणे येथे स्वॅब केंद्र सुरू करण्यासाठी पर्यटन खात्याची इमारत उपलब्ध झाल्यास पेडणे सरकारी महाविद्यालयात स्वॅब केंद्र सुरू केले जाणार नाही. पत्रादेवी येथून प्रवेश करणार्‍या नागरिकांकडून म्हापसा येथील सरकारी इस्पितळामध्ये स्वॅब देण्यासाठी गर्दी केली जाते. ही गर्दी कमी करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून पेडणे सरकारी महाविद्यालयाच्या इमारतीचा विचार करण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

वास्कोत पूर्ण लॉकडाऊन नाही
वास्को शहरात पूर्ण लॉकडाऊनची गरज नाही. मांगूर हिल वास्को येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे वास्को शहरात लॉकडाऊन करण्याची मागणी करण्यात येत आहे. मांगूर हिल येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या एकंदर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. लॉकडाऊनचा काहीच फायदा होणार नाही. तेथील लोकांच्या स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी, होम क्वारंटाईनच्या माध्यमातून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली जात आहे. मांगूर हिल येथील पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या मांगूर हिलाबाहेरील ७५ जणांची कोविड चाचणी करण्यात आली असून सर्वांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आहेत. मांगूर हिल हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. या भागात कोरोना विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळून येत आहेत. या भागातील ३५० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे. नागरिकांना प्रतिकार शक्ती वाढविणार्‍या औषधांचे वितरण केले जात आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

८ रुग्ण कोरोनामुक्त
राज्यातील ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहे. राज्यात आत्तापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची १९६ एवढी झाली असून ६५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात १३१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर कोविड इस्पितळामध्ये उपचार सुरू आहेत. जीएमसीच्या खास कोरोना विभागात १९ कोरोना संशयित रुग्णांना काल दाखल करण्यात आले आहे. कोरोना आयझोलेशन वॉर्डात २३ कोरोना संशयितांवर उपचार सुरू आहेत. जीएमसीच्या कोरोना प्रयोगशाळेत मागील चोवीस तासात तपासण्यात आलेले १०२३ नमुने निगेटिव्ह आहेत. तर, ३० नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. जीएमसीच्या प्रयोगशाळेतील १११७ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.

महसुलात ८० टक्के घट ः मुख्यमंत्री
कोविड १९ च्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारच्या महसुलात ८० टक्के घट झाली आहे. सरकारी खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

सरकारी खर्च कपातीच्या सूचनांसाठी नियुक्त समितीने अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार सरकारी खर्चात कपात केली जाणार असून येत्या बुधवारपर्यंत आवश्यक आदेश जारी केले जाणार आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

आमदारांच्या गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ केली जाणार आहे. आमदारांच्या कर्जावर केवळ २ टक्के व्याज आकारले जात आहे. यापुढे आमदारांना कर्जासाठी बँकेने निर्धारित केलेल्या व्याजानुसार भरावे लागणार आहे. कोविड १९ च्या पार्श्‍वभूमीवर सरकारी कर्मचार्‍यांच्या गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आमदारांच्या कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यातील व्यावसायिकांची व्हॅट संदर्भातील प्रलंबित प्रकरणे निकालात काढण्यासाठी खास योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मागील सहा वर्षापासून अनेक व्यावसायिकांचे व्हॅट व इतर करांसंबंधीची प्रकरणी प्रलंबित आहे. सदर प्रकरणे निकालात काढण्यास राज्य सरकारला महसूल प्राप्त होणार आहे. राज्यातील जीएसटी, व्हॅटमध्ये मोठी घट झालेली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.