राज्यात मुसळधार पाऊस सुरूच

>> चोवीस तासांत ५.४० इंच वृष्टी

राज्यात दमदार पाऊस सुरूच असून मागील चोवीस तासात ५.४० इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात मागील सतरा दिवसांत २८.९७ इंच पावसाची नोंद झाली असून १७ पैकी ११ दिवस सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील पावसाचे आत्ताचे प्रमाण सरासरीपेक्षा ६६ टक्के जास्त आहे.

येथील हवामान विभागाने राज्यभरात गुरुवारपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्याला बुधवारी जोरदार पावसाने झोडपून काढले. या जोरदार पावसामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडलेल्या आहेत.

मागील चोवीस तासांत ओल्ड गोवा येथे सर्वाधिक ७.४६ इंच पावसाची नोंद झाली आहे. राजधानी पणजीत ५.७१ इंच, म्हापसा येथे ४.३३ इंच, पेडणे येथे ४.२२ इंच, साखळी येथे ६.६७ इंच, वाळपई येथे ४.९५ इंच, काणकोण येथे ५.६३ इंच, दाबोळी येथे ४.११ इंच, मडगाव येथे ५.५५ इंच, मुरगाव येथे ४.५८ इंच, केपे येथे ४.७२ इंच, सांगे येथे ५.६० इंच पावसाची नोंद झाली आहे. फोंडा येथील पावसाची माहिती उपलब्ध झाली नाही.

झाड कोसळून पणजीत चार वाहनांचे नुकसान
राजधानी पणजी शहरातील १८ जून मार्गावरील सुशिला बिल्डिंग जवळ एका झाडाची मोठी फांदी मोडून रस्त्यावर कोसळल्याने तेथे पार्क केलेली एक कार आणि तीन दुचाकी वाहनांची मोडतोड झाली आहे. येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावर पडलेले झाडाची फांदी कापून बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. ताळगाव पठारावरील मुख्य रस्त्यावर झाडाची फांदी मोडून पडली. सुदैवाने घटनेच्या वेळी रस्त्यावर वाहन नसल्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.