राज्यात नवे ४५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

>> कोरोना’चा विळखा गावागावांत : एकूण रुग्णसंख्या ९०९ वर

राज्यात नवीन ४५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७०२ आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ९०९ वर पोहोचली आहे. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह ५३ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २०५ झाली आहे. राज्यात पहिल्यांदाच नवीन कोरोना रुग्णांपेक्षा कोरोना पॉझिटिव्ह या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. राज्यात आत्तापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह २ रुग्णांचे निधन झाले आहे.

साखळी, गंगानगरात
आयसोलेटेड रुग्ण
राज्यात कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. साखळी, गंगानगर, म्हापसा येथे प्रत्येकी एक आयसोलेटेड रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी इंदिरानगर चिंबल, पर्वरी, बेती, आंबावली, वाडे आदी ठिकाणी आयसोलेटेड कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत. या आयसोलेटेड रुग्णांची लिंक शोधून काढण्यास आरोग्य यंत्रणेला अजूनपर्यंत यश प्राप्त झालेले नाही. मांगूर हिल नंतर राज्यभरात विविध भागात कोरोनाचा फैलाव सुरू आहे.

नावेली येथे १ आयसोलेटेड कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला होता. आता त्याठिकाणी आणखी २ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. कुडतरी येथे आणखी ३ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची एकूण संख्या २८ झाली आहे. राय येथे आणखी ४ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या ११ झाली आहे. सडा वास्को येथे नवीन ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सडा येथील रुग्णांची संख्या ५० वर पोहोचली आहे. वास्को येथील कस्टम खात्याचा एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. कस्टम कार्यालयाचा एक विभाग दोन दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे.

पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी शिरेत, चिंबल येथील कंटेन्मेंट क्षेत्राला काल भेट देऊन तेथील पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना मार्गदर्शन केले आहे. कटेंन्मेंट क्षेत्रातील कार्यरत पोलीस कर्मचार्‍यांना फेस शिल्ड प्रदान करण्यात आली आहेत. यावेळी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून यांची उपस्थिती होती. राज्यात आत्तापर्यंत ५४ हजार १०९ जणांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आलेली आहे. आरोग्य खात्याने सुमारे ५४ हजार ७८१ नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठविले आहेत. या नमुन्यांच्या तपासणीत ९०९ नमुने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहे. जीएमसीच्या खास कोरोना वॉर्डात २२ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत. आरोग्य खात्याने दिवसभरात १७३१ नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. प्रयोगशाळेतून १३१९ नमुन्यांची तपासणी करून अहवाल जाहीर करण्यात आले आहेत.

माजी आरोग्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर : मुख्यमंत्री

कोरोनाचा संसर्ग झाल्याने मडगाव येथील कोविड इस्पितळात उपचार घेणार्‍या माजी आरोग्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर असून लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. सोमवारी दोघां कोविड रुग्णांचा मृत्यू झालेला असला तरी कोविड इस्पितळात उपचार घेत असलेल्या अन्य सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सावंत म्हणाले.
कोविड इस्पितळात उपचार घेत असलेल्या माजी आरोग्य मंत्र्यांचे निधन झाल्याचे काल समाज माध्यमावरून जे वृत्त वायरल झाले ते खोटे व निराधार असल्याचा खुलासाही सावंत यांनी केला.

पोलीस महानिरीक्षकांनी घेतला सुरक्षेचा आढावा
दरम्यान गोवा राज्याचे पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी वास्को, मांगूर हिल, बायणा, मुरगाव सडा, कंटेनमेंट झोन भागाला भेट देऊन तेथे सुरक्षा देणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांची विचारपूस केली. तसेच त्यांचे मनोबल वाढवून त्यांना कोविड पासून कशी सुरक्षा राबवावी, याबद्दल माहिती दिली. नंतर त्यांनी सडा येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन येथील सुरक्षेची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत वास्कोचे पोलीस निरीक्षक नीलेश राणे व इतर पोलीस अधिकारी वर्ग उपस्थित होते.