राज्यात नवीन ७० कोरोनाबाधित

>> जुवारीनगरमध्ये नवे २४ तर राज्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ११९८

राज्यात काल नवीन ७० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून सध्याच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७१७ झाली आहे. दरम्यान, ५८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याने दिली.
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ११९८ वर पोहोचली असून त्यातील ४७८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत कोरोना विषाणूने ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

जुवारीनगरात २४ रुग्ण
वास्कोतील इतर भागानंतर आत्ता जुवारीनगर येथे २४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मांगूर हिलनंतर वास्कोतील बायणा, सडा, नवेवाडे या भागात मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. आता, राज्यातील मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणार्‍या जुवारीनगरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येऊ लागले आहेत.

साखळीत नवीन २ रुग्ण
देसाईनगर साखळी येथे नवीन २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. पोलिसांकडून देसाईनगर साखळी येथील भागातील प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. साखळी भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ वर पोहोचली आहे. साळ – डिचोली येथे ३, काणकोण येथे आत्तापर्यंत ५ तर गंगानगर म्हापसा येथे आत्तापर्यंत ६ रुग्ण आढळले आहेत.

चिंबलमध्ये आणखी २ रुग्ण
इंदिरानगर चिंबल येथे आणखी १ पॉझिटिव्ह रुग्ण सापडला असून येथील रुग्णसंख्या आता ५ झाली आहे. तसेच चिंबल येथे आणखी १ रुग्ण आढळला असून येथील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २६ झाली आहे.
मोर्लेत आणखी एक रुग्ण
मोर्ले-सत्तरीत आणखी एक रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या २२ झाली आहे. सास़ष्टीमधील मडगावात १४, कुडतरीत ३१, आंबावलीत ३१, लोटलीत ११, नावेलीत ६ रुग्ण आढळून आले आहेत. मांगूर हिलशी संबंधित नवीन १८ रुग्ण आढळून आले.

आकड्यांचा घोळ
राज्याच्या आरोग्य संचालनालयाच्या कोविड रुग्णांबाबत दैनंदिन माहिती देण्यासाठी जारी करण्यात येत असलेल्या पत्रकामध्ये आकडेवारीचा घोळ दिसून येत आहे. राज्यात रविवार २८ जूनला नवीन ७० रुग्ण आढळून आल्याची माहिती पत्रकातून देण्यात आली आहे. परंतु, हे नवीन ७० रुग्ण कुठल्या कुठल्या भागात आढळून आले आहेत याची सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. सरकारी पत्रकातून देण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये प्रवासी ६, साखळी २, मोर्ले, चिंबल, इंदिरानगर, नावेली, काणकोण येथे प्रत्येकी १ रूग्ण मिळून एकूण १३ रुग्णांची संख्या होते. तर, मांगूर हिलशी संबंधित नवीन १८ रुग्णांचा समावेश आहे. अशा प्रकारे नवीन ३१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांबाबत माहिती पत्रकातून मिळत आहे.

..तर म्हापशात
लॉकडाऊन ः मुख्यमंत्री
म्हापशात गरज भासल्यास लॉकडाऊन केले जाणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका कार्यक्रमात बोलताना काल दिली.

‘त्या’ महिलेवर अंत्यसंस्कार
कोरोनाचा बळी ठरलेल्या फातोर्डा येथील महिलेवर मडगाव येथील स्मशानभूमीत काल अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी मृत महिलेच्या कुटुंबीयांची उपस्थिती होती.

कुंकळ्ळीत उत्स्फूर्त बंद
कुंकळ्ळी परिसरात कोरोना रुग्ण सापडल्याने तेथील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. तेथील दुकानदारांनीही आपले सर्व व्यवहार बंद ठेवल्याने बाजारपेठेत सामसूम दिसत होती.

माजी आरोग्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर ः राणे
मडगावच्या कोविड इस्पितळात उपचार घेणार्‍या माजी आरोग्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर आहे, असा खुलासा आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी केला आहे. या माजी आरोग्यमंत्र्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती इस्पितळाकडून देण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच कुणीही विनाकारण अफवा पसरवू नये, असा आवाहन आरोग्यमंत्री राणे यांनी केले आहे.