राज्यात तीन नवीन कोविड केअर सेंटर

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्य प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. मडगाव येथे कोविड इस्पितळामधील २२० खाटा कमी पडत असल्याने राज्यात कोविड केअर सेंटर सुरू केली जात आहेत. राज्यात शिरोड्यानंतर केपे, वास्को आणि कोलवा येथे नवीन तीन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली आहेत.

दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनानेकेपे सरकारी महाविद्यालयाची इमारत आणि सभागृह ताब्यात घेतले आहेत. तसेच, कोलवा येथील गोवा पर्यटन विकास महामंडळाची रेसिडेन्सी ताब्यात घेतली आहे.

मुरगाव पत्तन न्यासचे इस्पितळ
वास्को (न. प्र.) : गोवा सरकारने मुरगाव सडा येथील मुरगाव पत्तन न्यासचे इस्पितळ कोविड -१९ साठी केंद्र म्हणून घोषित केले असून तसा अध्यादेश दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी जारी केला आहे. जिल्हाधिकारी श्री. रॉय यांनी दि. १३ जून रोजी इस्पितळ ताब्यात घेतले आहे.

वास्कोवासीयांचा तीव्र विरोध
कोविड -१९ इस्पितळ या भागात येणार असल्याची माहिती स्थानिकांना कळताच येथील नागरिकांनी त्याला हरकत घेत तीव्र विरोध दर्शवला आहे. तसेच मुरगाव बंदरातील दोन्ही कामगार संघटनांनीही विरोध दर्शवत या संदर्भाथ मुरगाव उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले आहे. दरम्यान, मुरगाव सडा प्रभागात एमपीटीचे इस्पितळ असल्याने येथील दाट लोकवस्तीत कोविड केंद्र करण्यास मुरगाव कॉंग्रेसचाही विरोध आहे.