राज्यात कोरोनाची लक्षणे फक्त २१ जणांत ः मुख्यमंत्री

राज्यात ९ जूनपर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेले ३५९ रुग्ण सापडले होते व त्यापैकी ६७ रुग्ण रोगमुक्त झाले असून सध्या राज्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही २९२ असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली. २९२ ऍक्टिव्ह रुग्णांपैकी केवळ २१ जणांमध्ये रोगाची बाह्य लक्षणे दिसत असल्याचे ते म्हणाले. आतापर्यंत एकही रुग्ण अत्यवस्थ झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

३५९ रुग्णांपैकी केवळ ३ रुग्ण हे राज्याबाहेरील होते. तर अन्य सर्व रुग्ण हे गोमंतकीय होते, असा खुलासाही सावंत यांनी यावेळी केला. ३५९ जणांपैकी १९४ रुग्ण हे मांगूर हिल येथील आहेत, तर मांगूर हिल येथील रुग्णांच्या संपर्कात आल्याने संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ही ५७ असल्याचे आढळून आल्याचे ते म्हणाले. त्यापैकी १९ जण हे आरोग्यसेवक असून अन्य ११ जण हे त्यांच्या नात्यातील आहेत. कोरानाचा संसर्ग झालेल्यांमध्ये कदंब महामंडळ व टपाल खात्याच्या प्रत्येकी ४ कर्मचार्‍यांचा समावेश असल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत सापडलेल्या ३५९ रुग्णांमध्ये विदेशांतून व परराज्यांतून आलेल्या १०८ गोमंतकीयांचा समावेश आहे.

दरम्यान, इस्पितळात असलेल्या २९२ ऍक्टिव्ह रुग्णांपैकी सुमारे १५० रुग्ण हे आठवडाभरात बरे होतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

कोरोना चाचण्यांत गोवा आघाडीवर
गोव्यात आतापर्यंत ३२१९४ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी केवळ १०९८ जणांचे अहवाल यायचे आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार अन्य राज्यांशी तुलना केल्यास गोव्यात झालेली चाचणी ही सर्वाधिक असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.