राज्यात कायदा – सुव्यवस्था बिघडल्याचा कॉंग्रेसचा आरोप

राज्यातील कायदा व सुव्यवस्था पार बिघडली असल्याचा आरोप काल विरोधी कॉंग्रेस पक्षाने पत्रकार परिषदेत केला. पक्षाचे प्रवक्ते उर्फान मुल्ला हे यासंबंधी बोलताना म्हणाले की, पणजी शहरात अशा प्रकारे गुंडांच्या दोन्ही टोळींत एकामेकांवर तलवारीने हल्ला करण्याच्या घटना कधीही घडल्या नव्हत्या. हा गंभीर स्वरुपाचा हिंसाचार असून गृहमंत्री ह्या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यात लक्ष घालून ह्या गुंडांचे कंबरडे मोडून टाकावे, अशी मागणी यावेळी केली.

केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर देशभरात ‘मॉब लिंचिंग’च्या घटना घडल्या. अल्पसंख्यांकांवरील हल्ले वाढले. त्यामुळे देशात लोकांना भीतीच्या छायेत वावरावे लागत असल्याचे ते म्हणाले. ही अशी परिस्थिती निर्माण झाली त्याला कोण जबाबदार आहे याचा विचार व्हायला हवा, असे ते म्हणाले. गोव्यात बेरोजगारी वाढली आहे. नोकर्‍या नसल्याने युवावर्ग भरकटू लागलेला असून गुन्हेगारीकडे वळू लागला आहे, असा दावा मुल्ला यांनी केला.

गँगवॉर टोळीतील गुंडांना अटक करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. पोलीस खात्यात ५ हजार पदे रिक्त असून ती भरण्याची मागणीही त्यानी यावेळी केली.