राज्यात एक हजार कोटी खर्चून वीज वहन – वितरण सुधारणार

राज्यातील विजेचे वहन व वितरण यात सुधारणा घडवून आणण्याचा वीज खात्याने निर्णय घेतलेला असून त्यासाठीच्या यंत्रणेत १ हजार कोटी रुपये खर्चुन सुधारणा घडवून आणण्यात येणार असल्याची माहिती काल खात्यातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. हे काम हाती घेण्यासाठी यापूर्वीच प्रशासकीय मान्यता मिळालेली असून लोकसभेसाठीची आचार संहिता मागे घेण्यात आल्यानंतर ह्या कामासाठीच्या निविदा काढण्यासाठीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

विजेसाठीच्या साधनसुविधेत सुधारणा व वाढ करण्याचे हे काम पुढील दोन वर्षांत पूर्ण होणार असल्याचे सदर अधिकार्‍याने स्पष्ट केले.
विजेसाठीच्या साधनसुविधेत एकदा सुधारणा घडवून आणली की वीज वहन व वितरण व्यवस्थित होत नसल्याने जे १८ टक्के एवढे नुकसान खात्याला सोसावे लागते आहे ते कमी होऊन ५ टक्क्यांवर येणार असल्याचे सदर अधिकार्‍याने सांगितले.
राज्यातील काही भागांत ३० वर्षांपूर्वी वीज वाहिन्या घालण्यात आल्या होत्या व त्या तत्काळ बदलण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
गोव्याचा स्वतःचा वीज निर्मिती प्रकल्प नसून राज्याला पश्‍चिम व दक्षिण ग्रीडवरून मिळणार्‍या विजेवर अवलंबून रहावे लागत आहे.

विजेसाठीच्या साधनसुविधेत सुधारणा घडवून आणताना जुने वीज कंडक्टर्स व ट्रान्स्फॉर्मर्स बदलण्यात येणार असून भू वीजवाहिन्या तसेच खांबांवरील वाहिन्या व खांबही बदलण्यात येणार आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर राज्यातील जनतेला अखंडित वीजपुरवठा होऊ शकेल.