राज्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती

>> पेडणे, डिचोली, बार्देशमध्ये सतर्कतेचा इशारा

राज्यात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. डिचोली तालुक्यातील बहुतेक नद्यांना पूर आल्यामुळे डिचोली तालुक्याला पुराचा धोका निर्माण झाला आहे. काणकोण तालुक्यातही मुसळधार पाऊस पडत असून तळपण नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शापोरा आणि तेरेखोल नदीच्या पाण्यात वाढ झाल्यामुळे पेडणे तालुक्यात धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
तिळारी धरणातील पाण्याने मर्यादित पातळी गाठल्यानंतर पाणी नदीच्या पात्रात सोडण्यास प्रारंभ झाल्याने पेडणे, डिचोली, बार्देश भागातील नदीकाठचे नागरिक आणि स्थानिक प्रशासनाला सतर्कतेची सूचना जलस्रोत खात्याने केली.

करासवाडा म्हापसा येथील जलस्रोत खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांनी पेडणे, बार्देश आणि डिचोली तालुक्यातील उपजिल्हाधिकार्‍यांना एक पत्र पाठवून तिळारी धरणात पाणी वाढल्याने पाणी नदीत सोडण्यात येत असल्याची माहिती दिली आहे.
तिळारी धरणाच्या मुख्य अभियंत्यांनी एका पत्राद्वारे तिलारी धरणातील पाण्याने मर्यादित पातळी गाठल्याची माहिती जलस्रोत खात्याला दिली आहे. तिळारी धरणातील पाणी नदीच्या पात्रातून वाहण्यास सुरुवात झाल्याने शापोरा नदीतील पाण्याची पातळी वाढू शकते, असे जलस्रोत खात्याने कळविले आहे.

आत्तापर्यंत ६० इंच पाऊस
राज्यात मागील चोवीस तासात दीड इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत सुमारे ५९.८९ इंच पावसाची नोंद झाली असून सरासरीपेक्षा प्रमाण २५ टक्के जास्त आहे.

साळावली धरण पूर्ण भरले
राज्यातील प्रमुख साळावली धरण काल पूर्ण भरले. गेल्या वर्षी हे धरण १७ जुलै रोजी भरले होते. यंदा मात्र ८ दिवस अगोदरच हे धरण भरले आहे. सत्तरी तालुक्यातील अंजुणे धरण ५५ टक्के भरले आहे. डिचोली तालुक्यातील आमठाणे धरण ९५ टक्के भरले आहे. फोंडा तालुक्यातील पंचवाडी धरण ६९ टक्के, काणकोण तालुक्यातील चापोली धरण ८७ टक्के आणि गवाणे धरण ३४ टक्के भरले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.