राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना आधारकार्डांद्वारे जोडणार

>> शिक्षण संचालक भट यांची माहिती

 

आतापर्यंत सुमारे ९० टक्के विद्यार्थ्यांकडे आधारकार्डे असून येत्या एप्रिल महिन्याच्या शेवटापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना आधारकार्डे उपलब्ध करून देण्यात येणार असून ती उपलब्ध झाल्यानंतर सर्व मुलांना आधारकार्डांद्वारे जोडण्यात येईल. त्यानंतर पालकांना आपल्या मुलांची ई-प्रगती पुस्तके मोबाइलवर उपलब्ध करून देण्याबरोबरच मुलगा अथवा मुलगी कोणत्या दिवशी शाळेत आली नव्हती अथवा उशिरा आली होती ती माहितीही पालकांना आपल्या मोबाइलवर मिळू शकणार असल्याचे शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांनी काल सांगितले.
आधारकार्डाद्वारे अशा प्रकारे पाल्यांना आपल्या पालकांशी जोडण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे पालकांशी जोडण्यात येईल. आपल्या पाल्याच्या प्रगतीविषयी पालकांना घरबसल्या माहिती मिळावी यासाठी पालकांच्या मोबाइलवर ई-प्रगतीपुस्तक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना आधार कार्डाद्वारे जोडण्यात आल्यानंतर त्यांना शिष्यवृत्तीसाठी जे पैसे मिळतात ते थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारकडून निधी
केंद्र सरकारकडून शिक्षण खात्याला माध्यान्ह आहारासाठी २५ कोटी रु., सर्व शिक्षा अभियानासाठी ४० कोटी रु. तर शिक्षकांना व शिक्षकपूर्व प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी २ कोटी रु. एवढा निधी आला असल्याचे भट यांनी सांगितले. बीएड् व डीएड्‌चे प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी हा निधी असल्याचे ते म्हणाले.
इंटेग्रेट वॉईस पद्धती
माध्यान्ह आहारसंबंधीची तपशीलवार माहिती प्रत्येक तालुक्यातील विद्यालयांना पुरवता यावी यासाठी विद्यालयांना इंटेग्रेटेड वॉईस सिस्टीम पध्दतीने जोडण्यात येणार असल्याचे भट यांनी सांगितले. माध्यान्ह आहार पुरवण्यात आल्यानंतर तालुक्यातील दर एका विद्यालयातील मुख्याध्यापकाला त्यासंबंधीची तपशीलवार माहिती मोबाइलवर पुरवणे अशी ही योजना आहे. माध्यान्ह आहारात कसले खाद्य पदार्थ पुरवण्यात आले, त्यांचा दर्जा कसा होता. पुरवण्यात आले तेव्हा ते ताजे होते की नाही अशी सगळी माहिती याद्वारे पुरवण्यात येत असते. सध्या तिसवाडी तालुक्यात ही माहिती वरील प्रकारे पुरवण्यात येत असते. पण लवकरच ती सर्व तालुक्यात सुरू करण्यात येणार असल्याचे भट यांनी सांगितले.