ब्रेकिंग न्यूज़

राज्याचे विविध ज्वलंत प्रश्‍न सोडवण्यात सरकारला अपयश

>> विधानसभेत धारेवर धरणार : कवळेकर

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १५ जुलैपासून सुरू होत असून ते ९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अधिवेशनात राज्यातील सर्व महत्त्वाचे प्रश्‍न कॉंग्रेस पक्ष विधानसभेत मांडणार आहे असे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी काल कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

भाजप सरकार राज्यात सत्तेवर येऊन जवळ-जवळ पावणेतीन वर्षांचा काळ पूर्ण झालेला आहे. मात्र, खाणबंदी, बेरोजगारी, कोळसा प्रदूषण यासारख्या महत्त्वाच्या प्रश्‍नांबरोबरच सरकारला विविध मतदारसंघातील विकासकामेही पूर्ण करण्यात अपयश आले असल्याचे कवळेकर म्हणाले. या सर्व प्रश्‍नांना विधानसभेत वाचा फोडण्यात येणार आहे. सर्व महत्त्वाचे विषय आम्ही विधानसभेत मांडणार आहोत. कोणताही महत्त्वाचा विषय मागे राहू नये यासाठी कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे कवळेकर यांनी स्पष्ट केले.

विधानसभेत मांडण्यात येणार असलेल्या प्रत्येक तारांकित प्रश्‍नांचे उत्तर आम्हाला मिळावे यासाठी कॉंग्रेसचे सर्व आमदार या अधिवेशनात सक्रियपणे वावरणार असल्याचे कवळेकर यांनी यावेळी नमूद केले.

तारांकित प्रश्‍नांची उत्तरे ही आमदारांना ४८ तासांच्या अगोदर मिळायला हवीत. जेव्हा ती तशी मिळतात तेव्हा त्या प्रश्‍नासंबंधीचे विविध उपप्रश्‍न विचारण्यास वाव मिळतो. कारण मूळ प्रश्‍नाचे जे उत्तर दिलेले आहे त्याबाबत अभ्यास करण्यास योग्य तेवढा अवधी मिळालेला असतो. पण भाजप सरकार गेल्या काही अधिवेशनांपासून एक तर तारांकित प्रश्‍नांची उत्तरे आमदारांना केवळ २४ तासांच्या पूर्वी तर कधी कधी तो प्रश्‍न विधानसभेत मांडण्यात येणार आहे त्याच दिवशी देऊ लागले आहे. हे जाणूनबुजून केले जात आहे. योग्य उत्तरे द्यायची नसतात तेव्हा अशी नाटके केली जातात असे ते म्हणाले.