ब्रेकिंग न्यूज़

राजधानी पणजीतील रस्ते बनले खड्डेमय; दुचाकीस्वारांना डोकेदुखी

राजधानी पणजी शहरातील विविध भागातील रस्त्यावरील खड्डे वाहन चालकांसाठी डोकेदुखी बनलेले आहेत. या खड्‌ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहत असल्याने दुचाकी वाहन चालकांना खड्‌ड्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत.
येथील मांडवी हॉटेलच्या समोर रस्त्यावरील केबल घालण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्‌ड्यामुळे अनेक दुचाकी वाहन चालकांना अपघात होत आहेत. याठिकाणी एका दुचाकी स्वार महिलेला अपघात झाल्याने हाताला दुखापत झाली आहे. पाटो पणजी येथे पर्यटन विकास महामंडळाच्या पार्किंग प्लाझाजवळ केबल घालण्यासाठी खोदण्यत आलेले चर उघडे पडल्याने खड्डे तयार झाले आहेत.

या खड्‌ड्यामुळे दुचाकी वाहन चालकांना धोका निर्माण झालेला आहे. या ठिकाणी जोरदार पावसाच्या वेळी पाणी साचून राहत असल्याने खड्‌ड्यांचा अंदाज येत नाही. तसेच पणजीतून बाहेर जाताना पाटो सरकारी कॉलनीजवळ मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील रस्त्यावरील खड्‌ड्यामुळे अपघात होऊ नये म्हणून काही नागरिकांनी खड्‌ड्यात दगडाच्या सहायाने झाड्याच्या फांद्या लावलेल्या आहेत.

मळा पणजी या ठिकाणी पाटो येथे जाणार्‍या पदपुलाच्या जवळ रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.