ब्रेकिंग न्यूज़

राजची भूमिका मनसेला तारणार?

  • देवेश कु. कडकडे

लोकसभा निवडणुकांचे निकाल भले कसेही आले तरी पुढच्या विधानसभेच्या निवडणुकात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मनसेला सोबत घ्यावेच लागेल, कारण कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या या निवडणुकीतील यश-अपयशाचा एक भागीदार राज ठाकरे असतील. जर कॉंग्रेस आघाडीने सहभागासाठी राज ठाकरे यांच्यासमोर नकारघंटा वाजवली, तर तेे विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीचीही अपयशाची लक्तरे वेशीवर टांगण्यास मागेपुढे पाहणार नाहीत.

निवडणुका जाहीर होताच सर्वप्रथम सर्वच पक्षांत उमेदवारीसाठी चढाओढ लागते. काही पक्षांत उमेदवारांची इतकी गर्दी असते की, उमेदवारी वाटताना नेत्यांची दमछाक होते, तर काही पक्षांना उमेदवार शोधावे लागतात. ते दुसर्‍या पक्षाच्या असंतुष्ट नेत्यांना गळाला लावतात. निवडणुकांची पुढची पायरी ही पक्षाच्या नेत्यांनी आपल्या उमेदवारासाठी उडवलेला प्रचाराचा धुरळा असतो. सत्ताधारी पक्षाकडून आपल्या कार्यकाळात किती विकास झाला आणि भविष्यात कोणत्या योजना लागू करण्यात येतील याचा डंका पिटला जातो, तर विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाच्या कमकुवतपणावर बोट ठेवून आपल्या जाहीरनाम्याची मतदारांना भुरळ पाडतात. मते मिळविण्यासाठी हा थेट संघर्ष असतो. सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षाला नामोहरम करीत सत्ता टिकवणे आणि विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षाच्या चुकांचा पाढा वाचत सत्ता आपल्याकडे खेचून आणणे हा सर्वसाधारणपणे निवडणुका लढविण्यामागे उद्देश असतो.

आज देशात अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी निवडणुकांच्या रिंगणात झोकून दिले आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रात प्रचाराच्या रणधुमाळीत एक नावीन्यपूर्ण वाटावी अशी बाब घडत आहे. ज्या पक्षाचा एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाही, त्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे स्टार प्रचारक बनून निवडणुकीच्या सभा गाजवत आहेत. मनसेचे अध्यक्ष यावेळी भाजपाच्या विरोधात जाणार याचे संकेत मिळाले होते, जेव्हा दीड वर्षांपासून भाजपावर टीका करण्यास सुरुवात केली होती. नोटबंदीनंतर ते एखाद्या अर्थतज्ज्ञासारखे त्याचे तोटे सांगत होते. पुलवामा हल्ल्यावरही त्यांनी प्रश्‍नचिन्ह उभे केल्याने पाकिस्तानच्या माध्यमामध्ये हिरो बनले होते. राज ठाकरेंनी मनसेची स्थापना करताच २००९ साली लोकसभेच्या निवडणुका लढविल्या. यावेळी मनसेने मोठा झटका देत भाजपा-शिवसेना युतीला फटका दिला. त्यांच्या उमेदवारांनी युतीची हक्काची मते आपल्याकडे खेचून त्यांचे उमेदवार पाडले, तर सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत १३ आमदार निवडून आणले. पुढे नाशिक महानगरपालिकेत आपला झेंडा रोवण्याची किमया साधत मुंबई महानगरपालिकेत लक्षणीय यश मिळवले. मात्र २०१४ साली राज ठाकरेंच्या लोकप्रियतेला हळूहळू ओहटी लागली. लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होत भाजप-शिवसेना युतीने ४८ पैकी ४२ जागा पटकावल्या. मनसेचे वेगाने धावणारे इंजिन निवडणुकीच्या रुळावरून घसरून धाड्‌कन जमिनीवर आपटले. पुढे विधानसभेच्या निवडणुकीत अशाच अपयशाची पुनरावृत्ती झाली. केवळ १ आमदार निवडून आला. त्याने आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेत प्रवेश केला. मनसेचे अनेक उपनेते आज शिवसेना – भाजपाकडे वळले आहेत. त्यामुळे पक्ष खिळखिळा झाला असून ही मरगळ झटकायची असेल तर एका नव्या राजकीय डावपेचाची आवश्यकता होती. ती संधी या निवडणुकीत चालून आली.
जो नवा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे, तोच मार्ग बाळासाहेब ठाकरेंनी १९६७ च्या लोकसभा निवडणुकीत पत्करला होता.

राजकारणाला गजकर्ण असे संबोधणार्‍या शिवसेना प्रमुखांनी आपला एकही उमेदवार निवडणुकीत नसतानाही संयुक्त महाराष्ट्र समिती आणि कम्युनिष्टांच्या उमेदवारांविरुद्ध प्रचार करून अशाच सभा गाजवल्या होत्या आणि त्यात यशही मिळवले होते. साहजिकच त्याचा फायदा कॉंग्रेसला झाला. या भूमिकेने ठाकरेंना आपल्या राजकीय ताकदीची जाणीव झाली व २०% राजकारण आणि ८०% समाजकारण ही भूमिका घेऊन शिवसेनेने अनेक निवडणुका लढवून संमिश्र यश मिळवले. आज मनसेला पक्ष उभारणीसाठी जालीम उपाययोजना आणि पौष्टिक खुराकाची आवश्यकता आहे. आज मनसेचा मतदार हा परत शिवसेनेकडे वळल्याने नवा मतदार उभा करावा लागणार आहे. सुरुवातीला राज ठाकरेंनी मोदी पॅटर्नची स्तुती करत भाजपाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र सध्याच्या परिस्थितीत शिवसेनेबरोबर युतीशिवाय पर्याय नसल्याने मनसेला सोबत घेणे भाजपाला परवडणारे नव्हते. ही शक्यता धूसर झाल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीशी संधान बांधण्यास सुरवात केली. याला शरद पवारांची संमती असली तरी कॉंग्रेसने मोडता घातला. तेव्हा अखेरचा मार्ग म्हणून मोदी-शहा विरोध अधिक प्रखर करीत सत्ताधारी पक्षाच्या विरोधात रणशिंग फुंकण्याचा चंग बांधला. आज राज ठाकरे अमक्या पक्षाला मत द्या असे न सांगता सत्ताधारी पक्षाला पाडाच असे सांगत मतदारांना बुचकाळ्यात पाडत आहेत.

राज ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांकडून दोन गोष्टी वारसाहक्काने हुबेहुब उमटवल्या आहेत. एक त्यांचा चेहरा आणि शरीरयष्टी. दुसरे त्यांचे आक्रमक वक्तृत्व. राज ठाकरे हे फर्डे वक्ते आहेत. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी जमते. त्यांना कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून प्रचारासाठी मोठी मागणी आहे. त्यामुळे असा फुकटचा स्टार प्रचारक आयता मिळाला तर कोणाला नको आहे! परंतु राजकारणात ज्या उलथापालथी होतात त्या फुकटच्या नसतात तर काही विशिष्ट असा स्वार्थ दडलेला असतो. राज ठाकरेंनी भले लोकसभा निवडणुका लढविल्या नाहीत, परंतु विधानसभेच्या निवडणुका लढविणार नाही, असे जाहीर केलेले नाही. आजपर्यंत ठाकरे घराण्यातील व्यक्तीने निवडणुका लढवल्या नाहीत हा इतिहास असला तरी राज ठाकरे यांनी आपण भविष्यात निवडणुका लढविणार असे जाहीर करून आपल्याला मुख्यमंत्रीपद भूषविण्याची इच्छा असल्याचे स्पष्ट केले होते. यावेळी लोकसभा न लढविण्यामागे पक्षाला सध्या जनाधार नसल्याचे मुख्य कारण आहे.

नोटबंदीमुळे राज ठाकरेंबरोबर अनेक व्यवसायिकांना मोठी आर्थिक झळ बसली. तसेच पक्ष बांधणीला मर्यादा आल्या. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुका न लढविता प्रचंड धुरळा उडवत जनमानसाचा अंदाज जाणून घेत त्या माध्यमातून नवा मतदार जोडण्याचा प्रयत्न आहे. राज ठाकरेंची सध्याची भूमिका त्यांच्यावर बुमरँग बनून उलटू शकते, कारण जो शिवसेनेचा मोठा मतदार मनसेशी जोडला होता तो शिवसेनेच्या नव्या नेतृत्वावर नाराज होता. हा मतदार बाळासाहेबांना मानणारा आणि चाहता आहे. तो कॉंग्रेस आघाडीला कितपत मतदान करील हे मोठे प्रश्‍नचिन्ह आहे. लोकसभा निवडणुकांचे निकाल भले कसेही आले तरी पुढच्या विधानसभेच्या निवडणुकात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मनसेला सोबत घ्यावेच लागेल, कारण कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या या निवडणुकीतील यश-अपयशाचा एक भागीदार राज ठाकरे असतील. जर कॉंग्रेस आघाडीने सहभागासाठी राज ठाकरे यांच्यासमोर नकारघंटा वाजवली, तर तेे विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेबरोबर कॉंग्रेस आघाडीचीही अपयशाची लक्तरे वेशीवर टांगण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. अशाने कॉंग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या मतांवर मनसेने डल्ला मारला तर आश्‍चर्य वाटणार नाही. एरव्ही युती झाली तरीही नवखा पक्ष हा आपल्या मित्रपक्षाची प्रथम मते खेचून घेतो, जसे भाजपाने गोव्यात मगोबरोबर युती करून हळूहळू त्याचे मतदार आणि कार्यकर्ते आपल्या गोटात वळवले. तशीच गत मनसेबरोबरच्या सलगीचा परिणाम कॉंग्रेस-राष्ट्रवादीला भोगावा लागेल, अशीच चर्चा आहे.