ब्रेकिंग न्यूज़
राखीचा धागा ः शक्तीचे प्रतीक

राखीचा धागा ः शक्तीचे प्रतीक

  • सरिता नाईक
    (फातोर्डा- मडगाव)

रक्षाबंधनाचा सण नेमका केव्हापासून सुरू झाला याचा ठोस पुरावा नाही. पण पुराणातसुद्धा रक्षाबंधनाचा उल्लेख आहे. त्या संबंधीच्या दंतकथा आहेत. श्रीमद्भागवत ग्रंथामध्येसुद्धा वामनावतारामध्ये रक्षाबंधनाचा प्रसंग आहे. कृष्ण आणि द्रौपदीची कथा तर प्रसिद्धच आहे.

हल्लीच्या काळात हजारो प्रकारच्या राख्या मिळतात. पण साध्या रेशमी धाग्यामध्ये आणि महागड्या राख्यांमध्ये भावना मात्र एकच असते. बाजारातल्या रंगीबेरंगी राख्या पहायला छान वाटतं ना! राखी कोणत्याही रंगाची असेना का, त्यामागच्या भावनेचा, आश्‍वस्ततेचा, विश्‍वासाचा रंग महत्त्वाचा!

आमच्या लहानपणी श्रावणशुद्ध पौर्णिमेला आमच्याकडे राखी पौर्णिमेचा सण असा साजरा केला जायचा – आदल्या दिवशी गावचे पुरोहित घरी जानवी (यज्ञोपवीत) आणून द्यायचे. घरात जितकी माणसं असत तितकी जानवी देत. बाबा मग त्यांना दक्षिणा देत. दुसर्‍या दिवशी म्हणजे पैर्णिमेच्या दिवशी घरातील मुले, पुरुष ती जानवी गळ्यात घालत आणि मुली, स्त्रिया ती आपल्या उजव्या हाताच्या मनगटावर बांधत. दुपारी नारळीभाताचे जेवण असे. आई म्हणे, हा धागा (सूत) धारण केला म्हणजे पुढच्या संपूर्ण वर्षात येणार्‍या कोणत्याही संकटापासून, वाईट प्रसंगापासून आपले रक्षण होते. या दिवसाला ‘सूत पूनव’ असे म्हणत. मला वाटतं अजूनही खेड्यापाड्यांतून हे नाव वापरलं जातंय. त्यावेळी आताप्रमाणे सुंदर सुंदर, आकर्षक राख्या पहायलाही मिळत नव्हत्या. तशा त्या असतात हे माहीतही नव्हतं.
मोठं होता होता कळू लागलं की या पौर्णिमेला राखी पौर्णिमा म्हणतात. तसं प्रत्येक प्रांतात या सणाला वेगवेगळी नावे आहेत. कुणी नारळी पौर्णिमा म्हणतात, कुणी श्रावणी म्हणतात. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते म्हणजेच आपल्या रक्षणाची जबाबदारी त्याच्यावर सोपवते. पुढं जाऊन हे समजून आलं की रक्षाबंधन हा फक्त भावाबहिणीचा सण नसून त्याहीपलीकडे त्याचं सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व आहे.

रक्षाबंधनाचा सण नेमका केव्हापासून सुरू झाला याचा ठोस पुरावा नाही. पण पुराणातसुद्धा रक्षाबंधनाचा उल्लेख आहे. त्या संबंधीच्या दंतकथा आहेत. एकदा देव आणि दानव यांच्यात युद्ध सुरू झालं. बरीच वर्षे हे युद्ध चाललं होतं. पण देवांना युद्ध जिंकण्याची लक्षणं दिसेनात. या युद्धाची मुख्य जबाबदारी देवांचा राजा इंद्र याच्यावर होती. त्यावेळी इंद्राणी (इंद्राची पत्नी- शचि) बृहस्पतींकडे गेली. तिने त्यांची प्रार्थना केली व जय मिळविण्याचा उपाय विचारला. त्यावेळी बृहस्पतींनी तिला रेशमाचा धागा मंत्राच्या शक्तीने भारून दिला आणि तो इंद्रदेवाच्या उजव्या मनगटास बांधायला सांगितले. इंद्राणीने त्याप्रमाणे केले. या धाग्याच्या मंत्रशक्तीमुळे इंद्रदेव या युद्धात विजयी झाले. योगायोगाने तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता. या दिवशी बांधला जाणारा धागा साधा नसून यश, धन, आनंद, शक्ती हे सर्व देण्यास समर्थ असा धागा आहे.

श्रीमद्भागवत ग्रंथामध्येसुद्धा वामनावतारामध्ये रक्षाबंधनाचा प्रसंग आहे. राक्षसांचा राजा बळी याने देवांचं स्वर्गाचं राज्य प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भगवान विष्णू ब्राह्मण बटूच्या – वामन अवतारात याचक स्वरूपात बळीकडे आले व तीन पावले भूमीची याचना केली. गुरू शुक्राचार्यांनी मनाई करूनसुद्धा बळी राजाने तीन पावले जमिनीचे दान केले. या तीन पावलांमध्ये स्वर्ग, पाताळ व पृथ्वी पादाक्रांत करून विष्णुदेवांनी बळीला रसातळाला पोहोचवले. त्यावेळी बळीने आपल्या भक्तीने भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेऊन रात्रंदिवस आपल्यासमोर राहण्याचे वचन घेतले. भगवान परत न आल्यामुळे देवी लक्ष्मी काळजीत पडल्या. त्यावर नारद मुनींनी सांगितलेल्या उपायाप्रमाणे लक्ष्मीने बळीराजाकडे जाऊन त्यांना राखी बांधून आपला भाऊ बनविले आणि आपल्या पतीला परत आणले. त्या काळात तांदूळ, सोने आणि पांढरी मोहरी वस्त्रामध्ये रेशमी धाग्याने बांधून त्याची पोटली करायचे, हीच राखी! अशी राखी राजे लोकांना बांधली जायची. या राखीमध्ये दैवी शक्ती असते असे मानले जायचे.
कृष्ण आणि द्रौपदीची कथा तर प्रसिद्धच आहे. शिशुपालाचा वध करतेवेळी कृष्णाच्या हाताच्या बोटाला जखम झाली. त्यावेळी द्रौपदीने नेसल्या साडीचा पदर फाडून त्याचे बोट बांधले. त्यावेळी कृष्णाने तिला कोणत्याही संकटात सहाय्य करण्याचे वचन दिले आणि ते पाळलेही. तो दिवसही राखी पौर्णिमेचाच होता.
महाभारतात कृष्णाने युधिष्ठिराला युद्धाच्या संकटातून पार होण्यासाठी व त्याच्या सेनेच्या रक्षणासाठी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्याचा सल्ला दिला होता कारण त्याचं म्हणणं होतं की राखीच्या रेशमी धाग्यात प्रत्येक संकटापासून मुक्ती मिळविण्याची शक्ती आहे.

इतिहासामध्येसुद्धा एकदा मेवाडची राणी कर्मावतीला समजले की बहादूरशहा मेवाडवर हल्ला करणार आहे. त्या हल्ल्याला तोंड देण्याची राणीची सज्जता नव्हती तेव्हा तिने मोगल बादशहा हुमायून याला राखी पाठवून आपले रक्षण करण्याची विनंती केली. हुमायून मुसलमान असूनसुद्धा त्याने राखीची लाज राखली आणि मेवाडच्या बाजूने लढून कर्मावती आणि तिच्या राज्याचे रक्षण केले.
सिकंदर आणि पोरस यांच्यामधील युद्धाच्या वेळीसुद्धा पोरसच्या हातून सिकंदर मारला गेला असता पण सिकंदराच्या पत्नीने पोरस राजाला राखी बांधून आपला भाऊ बनविला आणि युद्धात सिकंदरला मारणार नाही असे वचन घेतले. ते वचन पाळून पोरसने सिकंदरला जिवदान दिले.

इ.स. १९०५ मध्ये जेव्हा इंग्रजांनी बंगालची फाळणी केली त्यावेळी हिंदू-मुसलमानांमध्ये सलोखा रहावा म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी रक्षाबंधनाचा उत्सव साजरा केला होता. म्हणजे राजनीतीमध्येसुद्धा रक्षाबंधनाचा उपयोग करून घेतला गेला होता.
राखी पौर्णिमेच्या दिवशीच कोळी व दर्यावर्दी लोक समुद्राची, पर्यायाने वरुणदेवाची पूजा करतात, त्याला नारळ आणि यज्ञोपवीत अर्पण करून आपलं रक्षण करण्याची प्रार्थना करतात.

यज्ञोपवीत धारण करणारे या दिवशी ते बदलत असतात. पौर्णिमेची तिथी दोन दिवस असली तर रक्षाबंधन दुसरे दिवशी केले जाते. त्या दिवशी श्रवण नक्षत्र येणं हे शुभ लक्षण मानलं जातं. पण भद्रकाल असेल तर त्यादिवशी रक्षाबंधन करू नये असं म्हणतात.. अशी आख्यायिका आहे की शुर्पणखेने आपल्या भावाला म्हणजे रावणाला भद्रकालामध्ये राखी बांधली होती तर एका वर्षाच्या आत त्याचे कुळ आणि राज्य नष्ट झाले. यंदा पौर्णिमा दोन दिवस आली आहे व पहिल्या दिवशी भद्रकाल आला आहे.
रक्षाबंधन फक्त भावाबहिणीचेच होते असं नाही. पूर्वी शिष्य गुरूंना व गुरू शिष्यांना राखी बांधत असत. बहीण बहिणीला, भाऊ भावाला, मित्र मैत्रीणींना, आपल्या सहकार्‍यांना, कनिष्ठ वरिष्ठांना आणि वरीष्ठ कनिष्ठांनाही राखी बांधू शकतात. रक्षाबंधन करणं म्हणजे नाती जपणं, नाती निर्माण करणं, एकमेकांना सांभाळून घेण्याचा विश्‍वास देणं. रक्षाबंधन हा केवळ देखावा नाहीय. ते एक पवित्र बंधन आहे. त्याचं पावित्र्य टिकवलं गेलं पाहिजे.

आता मुली आपल्या सर्व मित्रांना, ओळखीच्या मुलांना राखी बांधून बंधू मानतात. त्यामुळे आपल्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टी शुद्ध, पवित्र राहील, असे त्यांना वाटते. आपल्याकडे कुणीही वाईट नजरेने पाहू नये म्हणून त्या ही युक्ती करतात, असे म्हणायला हरकत नाही.

राख्या अगदी पाच रुपयांपासून दीड-दोन हजार रुपये किंमतीच्या महागड्याही मिळतात पण साध्या रेशमी धाग्यामध्ये आणि महागड्या राख्यांमध्ये भावना मात्र एकच असते. मात्र बाजारातल्या रंगीबेरंगी राख्या पहायला छान वाटतं. हजारो प्रकारच्या राख्या असतात. राखी कोणत्याही रंगाची असेना का, त्यामागच्या भावनेचा, आश्‍वस्ततेचा, विश्‍वासाचा रंग महत्त्वाचा!
आजची तरुण मंडळी निरनिराळ्या अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात, महिलाश्रमात जाऊन राख्या बांधून घेतात. तेथील रंजल्या गांजलेल्यांना त्यामुळे खूप धीर वाटत असेल जणू ते त्यांना सांगतात, ‘घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत’. हा विश्‍वासच त्यांना जगण्याची उमेद प्रदान करत असेल! नाही का?