रस्ते नव्हे; मृत्यूचे सापळे!

रस्ते नव्हे; मृत्यूचे सापळे!

  – प्रमोद ठाकूर

रस्त्यांवरील खड्‌ड्यांची दगड आणि मातीचा वापर करून तात्पुरती डागडुजी केली जात आहे. परंतु पाऊस पडल्यानंतर खड्‌ड्यांत घालण्यात येणारी माती वाहून जात असल्याने रस्ता चिखलमय होत आहे. तसेच खड्‌ड्यांच्या दुरुस्तीसाठी घातलेले दगड वाहनचालकांसाठी डोकेदुखी बनत आहेत. खड्‌ड्यांतील दगडांमुळे दुचाकी वाहनचालकांना घसरून अपघात होत आहेत. याबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने वाहनचालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

 

गोव्यातील रस्त्यांवरील गटारांची दुरवस्था आणि सदोष रस्ते बांधणीमुळे या पावसात अनेक ठिकाणी खड्डे पडले असून रस्ते वाहतुकीसाठी अतिशय धोकादायक बनले आहेत. रस्त्यांवरील खड्‌ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्‌ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी दुचाकी वाहनचालकांना हमखास अपघात होत आहेत. वाहनचालकांचे हकनाक बळी जाऊ लागले आहेत. बरेच जायबंदी होत आहेत. रस्त्यांवरील खड्‌ड्यांमुळे दुचाकी वाहनचालकांना जास्त मनस्ताप सहन करावा लागतो. दरवर्षी राज्यातील रस्त्यांवर खड्डे पडतात. सार्वजनिक बांधकाम मंत्र्याकडून रस्त्यावरील खड्‌ड्यांच्या दुरुस्तीचे आश्‍वासन दिले जाते. परंतु संबंधित सरकारी अधिकारी खड्‌ड्यांच्या डागडुजीकडे गंभीरपणे लक्ष देत नाहीत, असे खेदाने म्हणावे लागेल. त्यामुळे दरवर्षी रस्त्यांवरील खड्‌ड्याबाबत येरे माझ्या मागल्या…!
गोवा विधानसभेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये बुधवार २४ जुलैला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अनुदानित पुरवणी मागण्यांवरील चर्चेमध्ये लोकप्रतिनिधींनी राज्यातील खड्डेमय रस्त्यांचा योग्य पद्धतीने पंचनामा करून या रस्त्यांमुळे वाहनचालकांना सहन कराव्या लागत असलेल्या समस्येला वाचा फोडली आहे. मांद्य्राचे आमदार दयानंद सोपटे यांनी रस्त्यांवरील खड्डे कशामुळे तयार होतात, याचे यथोचित विवेचन केले. रस्त्याच्या बाजूची गटारव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. पावसाच्या वेळी रस्त्याचे परिवर्तन ओहोळात होत आहे. रस्त्याच्या बाजूला घराचे बांधकाम केल्यानंतर घरासमोर कंपाऊंडची उभारणी केली जाते. कंपाऊंडचे बांधकाम करताना गटारांवर अतिक्रमण केले जाते. त्यामुळे गटारांचे अस्तित्वच नष्ट होते. गटारांच्या अस्तित्वावर अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई केली जात नसल्याने अशा प्रकारांत वाढ होत आहे. पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहू नये म्हणून सर्वांनीच खबरदारी घेण्याची गरज आहे. राज्यातील सर्वच भागातील गटारव्यवस्थेचा आढावा घेऊन गटारव्यवस्था पुन्हा कार्यान्वित केली पाहिजे, असे मत आमदार सोपटे यांनी मांडले, तर राज्यभरातील रस्त्यांवरील खड्‌ड्यांमुळे गोव्याचे नाव देश-विदेशांत बदनाम होत आहे. राज्यात येणारे पर्यटक रस्त्यांची स्थिती पाहून नाराजी व्यक्त करतात. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्याची गरज आहे, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सभागृहात बोलताना सांगितले.
राज्यातील कोलमडलेल्या गटारव्यवस्था व रस्त्यांवरील खड्‌ड्यांबाबत गंभीरपणे विचार करून तातडीने उपाय-योजना करण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी खड्‌ड्यांच्या त्वरित दुरुस्तीचे आदेश अधिकार्‍यांना दिल्याची माहिती सभागृहात बोलताना दिली. आता बांधकाम खात्याचे अधिकारी खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती किती वेळात करतात हे पाहावे लागेल.

राज्यातील रस्त्यांच्या बाजूच्या गटारांचे तीन तेरा वाजलेले आहेत. पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत असल्याने रस्ते खराब होतात. रस्त्याच्या बाजूच्या गटारांची दुरुस्ती करून योग्य देखभालीचे काम प्राधान्यक्रमाने हाती घेण्याची गरज आहे. तसेच रस्त्याच्या सदोष बांधणीमुळे पावसाळ्यात रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा योग्य प्रमाणात निचरा होत नाही. पाणी रस्त्यावर साचून राहत असल्याने रस्त्यावर खड्डे तयार होतात. राज्यात दरवर्षी ठरावीक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडतात. रस्त्यावर पडणार्‍या खड्‌ड्यांची कारणे शोधून काढून, परत खड्डे पडू नयेत म्हणून योग्य उपाय-योजना हाती घेतली जात नाही. सध्या पत्रादेवी ते काणकोण या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने पेडणे, करासवाडा- म्हापसा, पर्वरी, सांताक्रुझ, बांबोळी, आगशी, कुठ्ठाळी, वेर्णा व इतर ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडलेले असल्याने वाहतूकव्यवस्थेवर याचा विपरित परिणाम होत आहे. रस्त्यांवरील खड्‌ड्यांमुळे वाहनचालकांना वाहने सावकाश चालवावी लागत आहेत. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. म्हापसा, करासवाडा, गिरी, धारगळ, कोलवाळ येथे रस्ता खराब झाल्याने दुचाकी वाहनचालकांना धोका संभवतो.
राजधानी पणजीतील रस्त्यावरसुद्धा मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता मागे घेण्यात आल्यानंतर पणजी मार्केट परिसरातील काही रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यात आल्याने पणजीवासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे. पाटो, मळा, चर्च सर्कल, सांतइनेज, मिरामार, भाटले व इतर अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावे लागत आहेत.

रस्त्यांवरील खड्‌ड्यांची दगड आणि मातीचा वापर करून तात्पुरती डागडुजी केली जात आहे. परंतु पाऊस पडल्यानंतर खड्‌ड्यांत घालण्यात येणारी माती वाहून जात असल्याने रस्ता चिखलमय होत आहे. तसेच खड्‌ड्यांच्या दुरुस्तीसाठी घातलेले दगड वाहनचालकांसाठी डोकेदुखी बनत आहेत. खड्‌ड्यांतील दगडांमुळे दुचाकी वाहनचालकांना घसरून अपघात होत आहेत. याबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने वाहनचालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
पणजी महानगरपालिकने शहरातील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी मुंबईतून खास रसायन आणले आहे. या यंत्राच्या साहाय्याने रसायनाचा वापर करून खड्डे बजविण्याचे काम हाती घेण्यात आले. परंतु जोरदार पावसामुळे या रसायनाने दुरुस्त केलेल्या खड्‌ड्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे.

फोंडा, वास्को, म्हापसा, डिचोली, वाळपई, मडगाव, बोरी व इतर भागांतील रस्त्यांची स्थितीही दयनीय आहे. पणजीच्या जवळील बेती गावातील रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे. या रस्त्याच्या बाजूला गटारे नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर वाहत असते. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून खड्डे तयार झाले आहेत. या खड्‌ड्यांमुळे अपघातग्रस्त झालेल्या दुचाकीचालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. सुदैवाने दुचाकीचालकाला किरकोळ जखम झाली. अशा प्रकारे राज्यातील खड्‌ड्यांमुळे होणार्‍या अपघातांची वृत्ते रोज वाचायला मिळत आहेत.

दरवर्षी पावसाला सुरुवात होण्याच्या काही दिवस अगोदर अनेक रस्त्यांची कामे हाती घेतली जातात. या वर्षी विविध कारणांमुळे सुमारे ३० टक्के कामे प्रलंबित राहिली. डांबराच्या अभावामुळे अनेक रस्त्यांच्या हॉटमिक्स डांबरीकरणाची कामे होऊ शकली नाहीत. डांबराचा अभाव असल्याने आता परदेशातून डांबराची आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी साधारण ३० हजार टन डांबराची गरज भासते. तेवढे डांबर परदेशातून आयात केले जाणार आहे, असे संबंधितांकडून कळते.
राज्यातील अनेक भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे. गटारव्यवस्थेचे अस्तित्व नष्ट झाले आहे. रस्त्यांवरील खड्‌ड्यांमुळे विशेषताः दुचाकी वाहनचालकांना जास्त त्रास सहन करावे लागतात. खड्‌ड्यांत पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्‌ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे रस्ते दुचाकी वाहनचालकांसाठी मृत्यूचे सापळे बनले आहेत.

पणजी शहरात अनेक ठिकाणी गटारव्यवस्था निकामी झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असते. त्याचबरोबर केबल, जलवाहिन्या किंवा गॅस वाहिनी घालण्यासाठी खोदण्यात येणार्‍या रस्त्यांची योग्य पद्धतीने डागडुजी केली जात नाही. रस्ता खोदल्यानंतर तात्पुरती दुरुस्ती केली जाते. पावसाळ्यात दुरुस्त केलेला रस्ता खचत असल्याने रस्त्यावर पुन्हा खड्डे तयार होतात. एका मोबाईल कंपनीने शहरातील रस्ता यंत्राच्या साहाय्याने खोदून केबल घातली आहे. केबल घालण्यात आल्यानंतर सिमेंटच्या साहाय्याने खोदण्यात आलेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली आहे. परंतु, ही दुरुस्ती योग्य पद्धतीने होत नसल्याने पावसाळ्यात सिंमेट खराब होऊन रस्त्यांवर खड्डे तयार झालेले आहेत. शिवाय डागडुजी करताना चरावर घालण्यात आलेल्या सिमेंटच्या पट्टीवरून दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रकारही घडत आहेत.
रस्त्यावरील खोदकाम करून केबल किंवा जलवाहिनी घालण्यासाठी संबंधित सरकारी यंत्रणेकडून मान्यता घेताना रस्त्याच्या पुन्हा दुरुस्तीसाठी पैसे भरावे लागतात. परंतु, सरकारी यंत्रणेकडून खोदण्यात येणार्‍या रस्त्याची योग्य पद्धतीने दुरुस्ती केली जात नाही.

राज्यात दरवर्षी ठरावीक ठिकाणी रस्त्यांवर हमखास खड्डे पडतात. खड्डे पडणार्‍या ठिकाणी झाडे असतात. या ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य गटारव्यवस्थासुुद्धा असत नाही. रस्त्यावर पडणार्‍या पाण्याचा निचरा होत नसल्याने रस्त्यामध्ये पाणी धुसून खड्डा तयार होतो. अशा प्रकारच्या खड्‌ड्यांची शास्त्रीय पद्धतीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. संपूर्ण भागातील डांबरीकरण करण्यात आलेले रस्ते खोदून पुन्हा बांधण्याची गरज आहे.

सातत्याने खड्डे पडणार्‍या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आता पेवर्सचा वापर केला जात आहे. पेवर्सच्या साहाय्याने रस्त्याची बांधणी केली जात आहे. पणजी शहरात काही ठिकाणी पेवर्सच्या साहाय्याने रस्त्याची बांधणी करण्यात आलेली आहे. मेरशी येथे महामार्गाच्या जवळच्या रस्त्याची पेवर्सचा वापर करून बांधणी करण्यात आलेली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची योग्य पद्धतीने बांधणी केली जात नाही. रस्त्याच्या बाजूला गटाराची सोय करणे आवश्यक आहे. परंतु, गटाराची व्यवस्था केली जात नाही. रस्त्याचे बांधकामसुध्दा विशिष्ट पद्धतीने केले जात नाही. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर तुंबून राहत आहे. रस्त्यावर पडणारे पावसाची पाणी रस्त्यावर साचून राहणार नाही याकडे लक्ष दिले जाणे आवश्यक आहे.

मिरामार ते दोनापावल या रस्त्याची सिमेंटचा वापर करून नव्याने बांधणी करण्यात आलेली आहे. या रस्त्याच्या कामावर साधारण ७५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तथापि, पावसाळ्यात या रस्त्यावरील पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नसल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून राहत आहे. यामुळे दुचाकी वाहनचालकांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्यावरून वाहणारे पावसाचे पाणी बंद करण्याकडे लक्ष दिले जात नाही. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर माती, दगड व अन्य साहित्य पसरत असल्याने अपघात घडत आहेत. वाहनचालकांना भेडसावणार्‍या समस्या लक्षात घेऊन त्या सोडविण्याकडे सरकारी यंत्रणेकडून लक्ष दिले जात नाही. राज्यात दरवर्षी पडणार्‍या पावसाचा अभ्यास करून पावसाळ्यात रस्ते खराब होणार नाहीत यासाठी आवश्यक उपाय-योजना करण्याची गरज आहे. पावसाळ्यानंतर खड्डेमय रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती केली जाते. या रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती आणि पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे.

राज्यात काही ठिकाणी रस्त्यांच्या बाजूला गटारांचे अस्तित्व आहे. या गटारात साचलेला गाळ उपसण्यात येत नसल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडचणी येतात. पंचायत क्षेत्रातील गटारांतील गाळ उपसण्याचे काम स्थानिक पंचायतीकडे दिलेले आहे. राज्यातील बर्‍याच पंचायतींची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने पंचायत निधीतून गटारातील गाळ उपसण्याचे काम होऊ शकत नाही. केवळ आर्थिक स्थिती चांगली असलेल्या पंचायती गाळ उपसण्याचे काम हाती घेतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने गटारातील गाळ उपसण्याचे काम करण्याची गरज आहे.
पणजी शहरातील मलनिस्सारण चेंबरच्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या खड्‌ड्याची दुरुस्ती योग्य प्रकारे केली जात नाही. पोलीस मुख्यालयाजवळ मलनिस्सारण चेंबरच्या ठिकाणी वरच्यावर मोठा खड्डा तयार होतो. या खड्‌ड्याची दखल घेऊन दुरुस्ती केली जात नाही. पणजी शहरात भरतीच्या वेळी जोरदार पाऊस पडल्यास पावसाचे पाणी साचून अनेक रस्ते पाण्याखाली जातात.

राज्यातील अनेक भागांत ठिकठिकाणी रस्त्यावर चर खोदण्यात आल्याचे दिसतात. नागरिकांकडून पाण्याची जलवाहिनी किंवा खासगी आस्थापनाकडून केबल घालण्यासाठी खोदकाम केले जाते. खोदकाम करण्यात येणार्‍या रस्त्याची कायम स्वरूपी योग्य प्रकारे दुरुस्ती केली जात नाही. केवळ तात्पुरती दुरुस्ती केली जाते. काही दिवसांनी रस्त्यावर खोदण्यात आलेला चर पुन्हा तयार होऊन वाहनचालकांसाठी डोकेदुखी बनतो. रस्त्यावरील अशा चरांमुळे वाहनाला हादरे बसून वाहनचालकांना आर्थिक नुकसान सोसावे लागते.
राज्यातील रस्तेच नव्हे तर काही पुलांवरसुद्धा खड्डे पडलेले आहेत. बोरी येथील पुलावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. मांडवीच्या जुन्या पुलावरील जोड रस्त्यावर खड्‌ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. तसेच नवीन पाटो पुलाखालीसुद्धा खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे तातडीने बुजवणे आवश्यक आहे. कारण येथे रहदारीही मोठ्या प्रमाणात असते.