रवींचा अस्त

>> आयसीसी एलिट पंच पथकातून डच्चू

आयसीसी पंचांच्या एलिट पथकातील भारताचे एकमेव प्रतिनिधी असलेले पंच सुंदरम रवी यांना डच्चू देण्यात आला आहे. त्यांच्या जागी इंग्लंडच्या मायकल गॉफ यांचा समावेश करण्यात आला आहे. निवृत्ती स्वीकारलेले पंच इयान गौल्ड यांची जागा विंडीजच्या जोएल विल्सन यांनी घेतली आहे. यापूर्वी आयसीसी आंतरराष्ट्रीय पथकात असलेल्या गॉफ व विल्सन यांना पंच निवड समितीने पदोन्नती दिली.

या पथकात आयसीसी महाव्यवस्थापक (क्रिकेट) ज्योफ ऍलर्डिस, समालोचक व भारताचा माजी खेळाडू संजय मांजरेकर, आयसीसी सामनाधिकारी रंजन मदुगले व डेव्हिड बून यांचा समावेश होता. डरहॅम व इंग्लंड ‘अ’ संघाकडून खेळलेल्या गॉफ यांनी २०१३ साली ऑगस्ट महिन्यात टी-ट्वेंटी सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय पातळीवर पंच म्हणून पदार्पण केले होते. २०१६ साली त्यांनी आपल्या पहिल्या कसोटीत पंचगिरी केली. आत्तापर्यंत त्यांनी ९ कसोटी, ५९ वनडे व १४ टी-ट्‌ेंटींमध्ये पंच म्हणून काम पाहिले आहे. विल्सन यांनी २०११ साली भारताच्या विंडीज दौर्‍यात आंतरराष्ट्रीय पंचगिरीचा श्रीगणेशा केला होता. त्यांना १२ कसोटी, ६३ वनडे व २६ टी-ट्वंेंटीत पंचगिरीचा अनुभव आहे. खराब कामगिरीमुळे आयसीसी एलिट पथकातून डच्चू देण्यात आलेले रवि हे पहिलेच पंच नसून यापूर्वी २०१३ साली आयसीसीने पाकिस्तानचे असद रौफ व न्यूझीलंडच्या बिली बौडेन यांना हटविले होते तर २०११ साली श्रीलंकेच्या अशोका डीसिल्वा व डॅरेल हार्पर यांची अवनती करण्यात आली होती.

आयसीसी एलिट पंच पथक ः अलीम दार, कुमार धर्मसेना, मराय इरासमस, ख्रिस गॅफने, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड कॅटलबरो, नायजेल लॉंग, ब्रुस ऑक्सनफर्ड, पॉल रायफल, रॉड टकर, मायकल गॉफ व जोएल विल्सन.

आयसीसी एलिट सामनाधिकारी पथक ः डेव्हिड बून, ख्रिस ब्रॉड, जेफ क्रो, रंजन मदुगले, अँडी पायक्रॉफ्ट, रिची रिचर्डसन व जवागल श्रीनाथ.