योग म्हणजे काय?

  • प्रज्ञा भट

आज आंतरराष्ट्रीय योग दिन. या निमित्ताने पेंग्वीन इंडियातर्फे ‘बीयॉंड आसनास् ः द मिथ्स अँड लेजंडस् बिहाइंड योगिक पोस्चर्स’ हे प्रज्ञा भट लिखित पुस्तक आज प्रकाशित होत आहे. त्यातील योगाविषयीच्या आपल्या प्राचीन परंपरेतील काही मूलभूत गोष्टी समजावून सांगणार्‍या मूळ इंग्रजीतील पहिल्या प्रकरणाचा हा मराठी अनुवाद –

‘योग’ या शब्दाचे मूळ संस्कृत ‘युज’ मध्ये आहे, ज्याचा अर्थ आहे एकत्र जोडणे. योग हा अशा क्रियांचा समुच्चय आहे, ज्या अनुसरण्याने आत्म्याचे परमात्म्याशी तादात्म्य साधले जाते. योगाचा सर्वांत प्राचीन उल्लेख मिळतो तो ऋग्वेदामध्ये. हिंदूधर्माचा हा पहिला ज्ञात ग्रंथ मानला जातो.

योग हा नेहमीच आपल्याकडे गुरू-शिष्य परंपरेने शिकवला गेला. ज्ञानाची ही एक अशी परंपरा होती जिथे शिक्षकाकडून विद्यार्थ्यापर्यंत ते सोपविले जायचे. पूर्वापार हे चालत आले. गुरू हा संस्कृत शब्द आहे. ‘गु’ म्हणजे अंधार. ‘रू’ म्हणजे ‘प्रकाश’. गुरू म्हणजे अशी व्यक्ती जी विद्यार्थ्याला (शिष्याला) अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते. प्राचीन भारतामध्ये विद्यार्थीजन हे त्यांच्या गुरुंसमवेत राहायचे आणि गुरूंच्या आश्रमामध्येच योगाभ्यास करायचे.

योग लिखित स्वरूपात येण्याच्या फार आधीपासून अनुसरला जात आला आहे. ती एक जीवनपद्धती म्हणूनच विकसित झाली. योग हा मुख्यत्वे मौखिक परंपरेतून आला आहे. त्यामुळे त्याचे मूळ शोधणे दुरापास्त झाले आहे. आपण योगाचा मूळ काळ अनुमानाने ५००० ते १०,००० वर्षे मागे नेऊ शकतो.
योगाविषयी बरेच वैदिक वाङ्‌मय उपलब्ध आहे. योग तत्त्वज्ञानावरील तीन प्रमुख ग्रंथ म्हणजे – घेरंद संहिता, शिवसंहिता व हठयोग प्रदीपिका
यापैकी हठयोग प्रदीपिका हा ग्रंथ प्रारंभिक व अनुभवी योगसाधकांकडून मोठ्या प्रमाणात अभ्यासला जातो. पंधराव्या शतकामध्ये स्वामी स्वत्माराम यांनी तो लिहिला. शरीरशुद्धीच्या (काया) पद्धतींबाबत, प्राणायाम, आसने, बंध आणि मुद्रा याविषयी त्यामध्ये सर्वंकष माहिती दिलेली आहे. या सगळ्यांना मिळून आपण ‘हठ’ संबोधतो. ‘ह’ म्हणजे सूर्य आणि ‘ठ’ म्हणजे चंद्र. या दोन्ही शब्दांचा संयोग म्हणजे ‘हठ’. मात्र, जरी ‘हठ’ या शब्दाचा अर्थ ‘शक्ती’ असा घेतला जात असला व खडतर शैलीने तो अनुसरला जात असला, तरी हठयोगाच्या छत्राखाली सर्व प्रकारच्या आधुनिक योगपद्धतींचा समावेश करता येतो.

पतंजलींची योगसूत्रे
योगासंबंधीचा आणखी एक प्राचीन ग्रंथ म्हणजे पतंजलींची योगसूत्रे. जगभरात मोठ्या प्रमाणावर अनुवादित झालेला तो एक ग्रंथ आहे. पतंजली हे एक महान तपस्वी होते, जे ख्रिस्तपूर्व दुसर्‍या शतकात होऊन गेेले असे मानतात. पतंजलींची योगसूत्रे हा १९६ सूत्रांचा संग्रह आहे. योगाचे तत्त्वज्ञान आणि क्रिया याविषयीची ही सूत्रे आहेत. चार अध्यायांमध्ये चार टप्पे सांगितले गेले आहेत –
* समाधी पद
* साधना पद
* विभुती पद
* कैवल्य पद
योगसूत्रांनुसार प्रकाशाकडे घेऊन जाणारा योगपथ म्हणजे अष्टांग किंवा आठ अंगांनी युक्त असा पथ आहे. त्यामध्ये शारीरिक आणि मानसिक आव्हानांचा सामना करीत मोक्ष किंवा प्रकाश गाठण्याचा मार्ग दाखविण्यात आला आहे.
अष्टांग योगाचे यम – नियम असे आहेत –

* यम ः यम म्हणजे नैतिक तत्त्वे ज्यांचा अवलंब योगसाधकांनी करणे अपेक्षित आहे.
१) अहिंसा – इतरांप्रती योगसाधकांनी अहिंसा अनुसरावी अशी अपेक्षा आहे.
२) सत्य – सत्य म्हणजे खरेपणा. केवळ सत्य बोलण्यापलीकडे खरेपणाचा विचार यात केला गेला आहे. सोईस्कर सत्याच्या पलीकडे बघण्याची हिंमत दाखवणे यामध्ये अभिप्रेत आहे.
३) अस्तेय – आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवणे व आपल्या गरजा कमी करणे यात अभिप्रेत आहे. योगींनी काटकसरीने राहावे व आध्यात्मिक साधना करावी अशी अपेक्षा बाळगली आहे.
४) ब्रह्मचर्य – ब्रह्मचर्य म्हणजे शिस्तबद्ध लैंगिक जीवनाचे अनुसरण. ब्रह्मचर्य म्हणजे केवळ संयम नव्हे. योगीजनांनी अनियंत्रित उपभोगाकडे न जाता लैंगिक जीवनात शिस्त पाळणे अपेक्षिलेले आहे.
५) अपरिग्रह – म्हणजे निर्लोभता. योगीजनांनी हाव सोडावी व जे गरजेचे आहे तेच स्वीकारावे असे हे तत्त्व आहे.

* नियम ः आपल्या विचारांत आणि कृतींमध्ये निर्मळता राखण्यासाठी हे नियम सांगितले गेले आहेत –
१) शौच – शारीरिक स्वच्छता. योगीजनांचे शरीर स्वच्छ व मन शुद्ध असावे. परिसरही स्वच्छ राखावा.
२) संतोष – आनंदी व समाधानी राहणे. आपल्याकडे जे नाही त्याकडे सतत पाहत राहून असमाधानी बनण्यापेक्षा सदैव आनंदी व समाधानी राहण्यास योगीजनांनी शिकले पाहिजे.
३) तापस – योगीजनांना साधेपणाने व काटकसरीने जगता आले पाहिजे व आपल्या आध्यात्मिक उन्नतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
४) स्वाध्याय – स्वतःच स्वतःचा अभ्यास करणे.
५) ईश्वर प्रणिधान – त्या सर्वशक्तिमान शक्तीपुढे नतमस्तक होणे.
६) आसन – योगाच्या दैनंदिन साधनेमध्ये या आसनांमुळे मानसिक व शारीरिक शिस्त येते.
७) प्राणायाम – श्‍वास – उच्छ्वासावरील नियंत्रण.
८) प्रत्याहार – मन आणि जाणिवांवर नियंत्रण मिळवणे यामध्ये अपेक्षित आहे. त्यासाठी बाह्य जगताकडून स्वतःला दूर नेणे अपेक्षित आहे.
९) धारणा – एका विशिष्ट बिंदूवर एकाग्र होणे म्हणजे मन शांत व स्थिर राहते.
१०) ध्यान – धारणा दीर्घकाळ चालू राहते. या टप्प्यावर योगीजनांकडून आत्मचिंतन अपेक्षिलेले आहे. हा असा टप्पा आहे जेथे शरीर, मन, बुद्धी, इच्छा, जाणिव, अहंकार व स्वत्व यांचे मीलन होते.
११) समाधी – दीर्घकाळ ध्यान केले की योगसाधकाला अशी अवस्था प्राप्त होते, जेथे त्याला सदैव शांती लाभते. ती अवस्था म्हणजे समाधी अवस्था.
योगसाधकाला यातले एक अंग पार केले की दुसरे साध्य करायचे असते. या सर्व अंगांची सिद्धी प्राप्त होते तेव्हाच साधक समाधीवस्थेकडे जाऊ शकतो!