योगसाधना

  • सीताकांत घाणेकर

प्रभूबद्दल आत्यांतिक प्रेम असले पाहिजे. तसेच चित्त एकाग्रतेच्या साधनमार्गावर अंत:करणापासून खरा भाव असला पाहिजे. साधनेत यांत्रिकता येता कामा नये. यासंदर्भात विचार प्रत्येकाने करायला हवा- मला प्रभूबद्दल प्रेम आहे का? ते आत्यंतिक आहे का? तसाच माझा भाव अंत:करणापासून आहे का? भक्तिसाधना करतो त्यात प्रांजळता आहे का?

विश्‍वात प्रत्येक व्यक्तीची कामे वेगवेगळी असतात. त्यांतील कुणाची शारीरिक, कुणाची मानसिक, तर इतरांची बौद्धिक कामे असतात. प्रत्येक कार्यासाठी कर्तव्यशक्ती लागते. प्रत्येक क्षेत्रात व पैलूत थोडी कर्तव्यशक्ती जन्मजात असू शकते. तिचे प्रमाणदेखील वेगवेगळे असते. ती अनेक जन्मांची कमाई असते. संचित असते. प्रत्येक आत्म्याच्या या जन्माच्या प्रारब्धाप्रमाणे ती स्थिती त्याला प्राप्त होते.
चौफेर नजर फिरवली तर दिसते की काही मुले बालपणातच एका विशिष्ट क्षेत्रात प्रवीण असतात. उदा. संगीतकला (विविध पैलू- गाणे, तबला, मृदंग, सीतार, सारंगी. आध्यात्मिक क्षेत्र- उदा. नरेंद्र स्वामी (स्वामी विवेकानंद)
– खेळ
– वक्तृत्व, नाट्यकला… वगैरे.
तरीही एक निर्विवाद सत्य आहे की ती कर्तव्यशक्ती वाढवण्यासाठी त्यांना आणखी अभ्यास- तोदेखील शास्त्रशुद्ध करावा लागतो. तसाच नियमित सरावसुद्धा आवश्यक आहे.

चित्त एकाग्रतेसाठीदेखील तसाच अभ्यास अत्यंत जरूरी आहे. तरच व्यक्तीचा सर्वांगानी जीवनविकास होऊ शकतो. मूर्तीपूजेच्या संदर्भात परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले काय मार्गदर्शन करतात ते बाघू. ते म्हणतात- मनाला विशुद्ध करण्याचा अभ्यास सतत दीर्घकालपर्यंत व सद्भावपूर्वक चालला पाहिजे.

आदरबुद्धी ः प्रभूबद्दल आत्यांतिक प्रेम असले पाहिजे. तसेच चित्त एकाग्रतेच्या साधनमार्गावर अंत:करणापासून खरा भाव असला पाहिजे. साधनेत यांत्रिकता येता कामा नये. यासंदर्भात विचार प्रत्येकाने करायला हवा- जास्त करून योगसाधकाने- माझे प्रेम आहे का? ते आत्यंतिक आहे का? तसाच माझा भाव अंत:करणापासून आहे का? भक्तिसाधना करतो त्यात प्रांजळता आहे का? बहुतेकवेळा आपले प्रेम नसते. भाव नसतो. असलाच तर अगदी नावापुरताच असतो. तसेच तथाकथित सर्व साधना कर्मकांडात्मक होते. मूर्तीपूजादेखील त्याला अपवाद नाही.

या विषयात मला बालपणात ऐकलेली एक छान गोष्ट आठवते. एका आश्रमातील एका शिष्याने आपल्या सद्गुरूला विचारले- ‘गुरूदेव मला भगवद्दर्शनाची ओढ लागली आहे, तर ते दर्शन केव्हा होणार?’
गुरूदेव म्हणाले- ‘बाळा, जेव्हा त्याबद्दल तुझी आसक्ती फार वाढेल तेव्हा, म्हणजे ज्यावेळी तुला वाटेल की देवाच्या दर्शनाशिवाय माझे जीवन व्यर्थ आहे. तुझी आतुरता शिगेला पोहोचेल तेव्हा लगेच तुला दर्शन होईल. तू तुझा अभ्यास चालू ठेव. सातत्व टिकव.’

काही काळ असाच गेला तरी शिष्याला काही देवदर्शन होईना. तो बेचैन झाला. गुरूला त्याची बेचैनी जाणवली व त्यामागचे कारणदेखील कळले. त्यासाठी उपाय गुरूंनी ठरविला. दुसर्‍या दिवशी प्रात:समयी जेव्हा ते नदीवर स्नानास गेले त्यावेळी सद्गुरूनी जोराने त्याचे डोके पाण्याखाली दाबून ठेवले. शिष्य वर येण्याचा प्रयत्न करू लागला. पण गुरूजी जास्तच जोर लावला. शेवटी सर्व शक्ती एकवटून त्याने डोके वर काढले. तो गुदमरला होता. शिष्याला गुरूचा राग आला. पण त्याला माहीत होते की गुरूजींची काहीतरी योजना असेल.

शिष्याने गुरूना त्याचे कारण विचारले. तर गुरू म्हणाले- ‘एक सांग, मी तुझे डोके पाण्याखाली घालून ठेवले तर तू वर येण्यासाठी एवढी धडपड का करीत होतास?’
‘गुरूजी, त्याचे कारण साधे आहे. पाण्याखाली असताना मला श्‍वासासाठी पाहिजे असलेली हवा मिळत नव्हती. मी गुदमरत होतो. कदाचित मी मरणारदेखील होतो. म्हणून सर्व शक्तीनिशी वर येण्याचा प्रयत्न करत होतो.’
गुरूजी म्हणाले- ‘अगदी बरोबर. अगदी हीच आतुरता, तीव्रता तेव्हा भगवद्दर्शनासाठी लागेल त्यावेळीच तुला दर्शन होईल.’

आपणदेखील धडा घ्यायला हवा, विचार करायला हवा.
सर्वात प्रथम- माझे प्रेम व भाव तेवढा तीव्र आहेत का? शेवटी भगवंत आपली माता-पिता आहेत. म्हणतात ना- ‘देव भावाचा भुकेला.’
आजच्या लौकिक जीवनातदेखील. आपले प्रेम बहुधा स्वार्थी असते. मग ते प्रेम पती-पत्नी, पालक, पाल्य, मालक, नोकर, भाऊ-बहीण… कुठलेही नाते असूदे. अशा स्वार्थी प्रेमाला दुर्गंध येतो. अनेक अपवाद नक्की असतील.
निदान प्रभूप्रेमाबद्दल तरी तसं व्हायला नको. कारण असे घडेल तेव्हा तिथे यांत्रिकता नसेल. तो भाव शुद्ध असेल. ते प्रेम विशुद्ध असेल.
दृढता ः दृढ मनोबल व निश्‍चय एवढाच अभ्यासयोग नाही, ते सहायक तत्त्व आहे. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता अभ्यास चालू ठेवणे महत्त्वपूर्ण आहे. चित्त एकाग्र करण्यासाठी मी बसणारच!- असा आग्रह असला पाहिजे.
या गुणावर विचार केला तरी आपल्या लक्षात येईल की बहुतेकांकडे मनोबल व निश्‍चय- दोन्हीही अगदी अल्प प्रमाणात असतात. विशेषकरून आध्यात्मिक गोष्टींसाठी. भौतिक फायद्यासाठी ती जबरदस्त असू शकतात. म्हणून तर आपला व्यापार-धंदा, पेशा… करण्यासाठी आपण जबरदस्त शक्ती वापरतो.

प्रलोभने तर विचारूच नका. आसपास ती अनेक आहेत. क्षणोक्षणी आहेत. म्हणूनच-
‘मी चित्त एकाग्रतेसाठी बसणारच!’ हा दृढ संकल्प हवा. या इथे वेळेचेदेखील अत्यंत महत्त्व आहे. शास्त्राप्रमाणे यासाठी सकाळची वेळ सांगितली आहे. ब्रह्ममुहूर्त- साडेतीन ते पाच वाजेपर्यंत. अनेक आश्रमांत या वेळेचे पालन केले जाते. प्रजापिता ब्रह्मकुमारीचे साधक याला ‘अमृतवेळा’ म्हणतात. आपणातील बहुतेकजण त्यावेळी ‘साखरझोपेत’ असतो.

काहीजण सकाळी उठण्यासाठी आलार्म लावतात. पण झोपेच्या व मायेच्या प्रभावामुळे तो बंद करून स्वस्थ झोपतात. हा निर्णय करून की उद्या मी नक्की सकाळी उठणार. पण दुसर्‍या, तिसर्‍या दिवशी तीच पुनरावृत्ती होते आणि आयुष्य भराभर निघून जाते.
ही वेळ चांगली आहे. त्याचे कारण म्हणजे त्यावेळी सर्वत्र शांतता असते. तसेच आध्यात्मिक दृष्टिकोनाप्रमाणे छान सुखदायक कंपने स्वर्गलोकातून, देवलोकातून सर्व ब्रह्मांडात पसरतात. ती पृथ्वीवरही येतात.

आता ही बाब प्रत्येक व्यक्तीच्या श्रद्धेची आहे. पण जे कुणी साधक यावेळी साधना करतात ते सांगतील की त्यांचे अनुभव अत्यंत सुखद असतात. प्रेरणादायी असतात. एका अद्भुत आत्मिक शक्तीचा त्यांना आभास होतो. त्यांचा पूर्ण दिवस चांगला जातो.
भारतात प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य आहे, म्हणून ज्यांना ही वेळ जमत नाही. त्यांनी स्वतःची उपयुक्त वेळ ठरवावी. पण जेवढ्या लवकर साधना होईल तेवढे सुपरिणाम दिसून येतील. शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक व आध्यात्मिक पैलूंत.
आपले मनोबल वाढविण्यासाठी योगांतील तंत्रांचा वापर करता येईल. काही विशिष्ट आसने, कपाळभाती, प्राणायाम- पण तीदेखील शास्त्रशुद्ध.
आपल्या इतिहासात प्रत्येक क्षेत्रात अनेक उदाहरणे आहेत, जिथे त्या व्यक्तीची इच्छाशक्ती, मनोबल व दृढता दिसते. एक उदाहरण म्हणजे ध्रुवबाळ.
भगवान विष्णूला भेटायची त्याची इच्छा एवढी प्रबळ होती की त्याने बालपणातच तप (तत्त्वासाठी परिश्रम) केले. भगवद्दर्शन झालेच, पण त्याशिवाय मृत्यूनंतर अढळ असे धु्रवपद त्याला प्राप्त झाले.

दुसरे उदाहरण रावणाचे. त्याची वृत्ती राक्षसी होती. तो विकार-वासनांचा गुलाम झाला होता. तरीही त्याची शिवभक्ती प्रबळ होती. असे सांगतात की शिवपूजेसाठी एक कमळ कमी पडले म्हणून रावण आपले शिर कापून शिवचरणी अर्पण करायला निघाला होता.
राक्षस असला म्हणून काय झाले? भगवंत शेवटी श्रद्धा, प्रयत्न बघतो.
त्याचे दुर्भाग्य म्हणजे त्याची भक्ती स्वार्थी होती. त्यामुळे तो कलंकित झाला. खरे म्हणजे रावण अत्यंत बुद्धिमान, वेदशास्त्रपारंगत होता. वेदांना त्याने ऋचा लावली होती. या दोन उदाहरणांपासून प्रत्येक व्यक्तीने आपल्या भक्तीची दिशा ठरवायला हवी.
आपले योगसाधक यासंदर्भात विचार करतीलच याची मला खात्री आहे. त्याप्रमाणे आचरणदेखील करीत असतील.
(संदर्भ ः मूर्तीपूजा- प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले)

चित्रेः ज्ञानेश्‍वर, स्वामी विवेकानंद (ध्यानमग्न), ध्रुव- ध्यानमग्न, रावण- शिवपूजा करताना.