योगसाधना – ४६७ अंतरंग योग – ५२ कुठे गेली समाजाची आश्रमव्यवस्था

 

  •  डॉ. सीताकांत घाणेकर

भारतीय शास्त्रात बंधनांना फार महत्त्व दिलेले आहे. आपण नेहमीच्या जीवनात व आत्ता वैश्‍विक संकटाच्या वेली बंधने पाळली तर आपल्यावर संकटाचा डोंगर कोसळणार नाही.

 

मानव – भगवंताची/सृष्टिकर्त्याची एक उत्कृष्ट कलाकृती. तत्त्ववेत्ते मानतात की देवाने त्याला आपला आवडता मुलगा मानला. स्वतःच्याच स्वरूपात वाढवला. अप्रतिम बुद्धिमत्ता दिली. प्रत्येक क्षेत्रात या मुलाने नेत्रदीपक प्रगती केली. खरंच कौतुकास्पद आहे- कला, विज्ञान, सामाजिक, राजकीय, आर्थिक… अशा अनेक क्षेत्रात फार मोठी क्रांती केली व करीत आहे. कोणे एके काळी जंगलातून भटकणारा हा जीव आता या युगात कुठे पोचला याची कल्पनाही करू शकत नाही. तो फार मोठा झाला.
विश्‍वाची एवढी प्रगती करणारा हा मानव- आपल्या बुद्धीचा त्याला अहंकार झाला. तो आत्मकेंद्री झाला. स्वार्थी झाला आणि आता घोर विनाशाकडे त्याची वाटचाल चालू आहे. हा विचार नकारात्मक वाटतो पण तो तसा नाही. या विचारातूनच बुद्धिनिष्ठ व्यक्ती सकारात्मकतेकडे वळते. ती या अशा समस्यांचा, संकटांचा विचार करते, शास्त्रशुद्ध अभ्यास करते, चिंतन करते व चिरंतन असा उपाय शोधते व त्याप्रमाणे आचरण करते.

आपल्या लाडक्या मातृभूमीत, भारत देशात अशा अनेक व्यक्ती होऊन गेल्यात. त्यांनी प्रत्येक क्षेत्र विकसित केले. सर्वांत मुख्य म्हणजे त्यांनी सुरुवातीपासूनच सृष्टिकर्त्याचा शोध घेतला. त्याचे खरे स्वरूप, त्याचे गुणधर्म समजून घेतले. त्याची अफाट कर्तृत्वशक्ती ओळखली. त्याच्या इच्छेचा (यदृच्छा) संपूर्ण अभ्यास केला. जीव-जगत-जगदीश यांच्या परस्पर संबंधाचे त्यांना आकलन झाले. त्यामुळे निसर्गाला त्यांनी मातेसमान, देवासमान मानले. सृष्टीतील नदी, नाले, पहाड-पर्वत, जीव-जंतू, पशू-पक्षी- प्राणी-वृक्ष- वनस्पती यांचा सन्मान करायला तो शिकला.

त्याचबरोबर मानवाचे खरे स्वरूप त्याने जाणले. स्त्री-पुरुष संबंधांवर त्याने विशेष लक्ष दिले. मानवाच्या आयुष्याचा त्याने संपूर्ण विचार केला. समाजाची घडी व्यवस्थित चालावी म्हणून चार आश्रमांचा स्वीकार केला.
१. ब्रह्मचर्याश्रम – ज्ञानार्जनासाठी निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या ऋषींच्या आश्रमात २० ते २५ वर्षे राहून स्वतःच्या कर्तृत्वशक्तीप्रमाणे विविध पेशांमध्ये प्रावीण्य मिळवले.
२. गृहस्थाश्रम – मूळ घरी परत येऊन आपल्या कुटुंबाबरोबर राहणे. शास्त्रशुद्ध पद्धतीने विवाह करून स्वतःच्या संसाराचा विस्तार करणे. अर्थार्जन करणे त्याचबरोबर समाजहितावर लक्ष ठेवणे. आपली सामाजिक कर्तव्ये जाणून समाजकार्यही करणे. हा आश्रम पुढली २५ ते ३० वर्षे करणे.
३. वानप्रस्थाश्रम – स्वतःचा संसार स्थिरस्थावर झाला की मुलांच्या हातात संस्राराची सूत्रे देऊन परत ऋषींच्या आश्रमात जाणे. तिथे आपल्या पेशाप्रमाणे विद्यार्थ्यांना विद्यादान करणे. अशा तर्‍हेने ब्रह्मचर्याश्रमामध्ये विनामूल्य शिक्षण घेतले होते त्याचे समाज-ऋण थोड्याफार प्रमाणात त्याची परतफेड करणे. या आश्रमात व्यक्तींना सर्व सुखसोयी मिळत असत. मानधन मिळत नसे. पन्नाशी- साठीनंतर आपले आयुष्य स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहूनसुद्धा इतरांच्या सहवासात सुखाने घालवणे.
४. सन्यासाश्रम – हा शेवटचा टप्पा. उर्वरित आयुष्यात वनात जाणे. स्वतःची झोपडी बांधून तिथे जे काही मिळेल त्याप्रमाणे आहार करणे. ईशचिंतनात जास्तीत जास्त वेळ घालवणे. जिथे इतर ज्या कुणी व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर सहकार्याने जीवन व्यतीत करणे.

सारांश – या सुंदर अशा आश्रमव्यवस्थेमुळे समाजात सुखशांती, समाधान नांदत असे. ही कल्पनाच किती हृदयगम्य वाटते.
आणि आता? कुटुंबव्यवस्था कोसळली. नैतिकता अधोगतीला गेली. स्वार्थ बोकाळला, आईवडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवली, घटस्फोट वाढले… त्याचबरोबर निसर्गाबद्दल दृष्टिकोन बदलला. निसर्गाला गुलाम मानून त्याच्यावर अत्याचार सुरू झाले. मानव स्वतःला विश्‍वाचा, सृष्टीचा मालक समजायला लागला. पाप-पुण्य; सत्य-असत्य; धर्म-अधर्म; सज्जनता-दुर्जनता… या सर्व गोष्टी कालबाह्य मानून त्यांना धुळीला मिळवले.
हे सगळे घडताना आपण अपेक्षा ठेवली की सृष्टीचा कर्ता काही दिसत नाही. आपण जगज्जेता होऊन स्वतःच्या इच्छेप्रमाणे व शक्तीप्रमाणे मनाला येईल तसे वागू. मला विचारणारा कुणीही नाही. मीच सर्वशक्तिमान सम्राट आहे.

यातूनच रावण, हिरण्यकश्यपू, हिटलर… तयार झाले. सृष्टीचा विनाश व्हायला लागला. सृष्टिकर्त्याने वेळोवेळी नैसर्गिक आपत्तीच्या द्वारे मानवाला संदेश दिला. पण आम्ही धडा घेतला नाही. पण ज्याने अत्यंत कष्टाने हे सारे विश्‍व घडवले आहे. त्याला विश्‍वाची कदर व चिंता वाटते. म्हणून हा विश्‍वकर्ता प्रेषितांच्या रूपाने भारतात अवतारांच्या रूपाने अवतरीत झाला. शेवटचे अवतार तर मानवरूपातच होते- वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध… पण दुर्भाग्य मानवतेचे व त्या भगवंताचे. आपण थोडेदेखील शहाणे झालो नाही.
आणि आता जणुकाय कोरोनारूपाने कलीचेच आगमन झाले असे वाटते. त्याला आटोक्यात आणण्यासाठी सर्व तर्‍हेचे उपाय शोधले जातात. पण अजूनपर्यंत अपेक्षित यश मिळत नाही. याचे एक कारण आपण मागच्यावेळी बघितले.

* मानवाला बंधने नकोत. स्वातंत्र्याच्या नावाने स्वैराचार हवा.
भारतीय शास्त्रात बंधनांना फार महत्त्व दिलेले आहे. शास्त्रकार विविध साधी सोपी उदाहरणे या संदर्भात देतात….

* वृक्ष धरतीचे बंधन मानतो. तो जर उडायला लागला तर त्याची मुळेच तुटतील. त्याच क्षणी त्याचा अंत व्हायला सुरुवात होईल.

* तारवाद्ये असतात ती खुंटीची बंधने मानतात. ती तार सैल ठेवली तर त्यातून संगीत निघणार नाही आणि जास्त ताणली तर ती तुटणार. विविध तारा व्यवस्थित ताणल्या तर त्या तारांतून सुंदर सप्तस्वर- सा, रे, ग, म, प, ध, नी, सा… निघतील.

* नदी-किनार्‍यांचे बंधन मानून त्याप्रमाणे ती व्यवस्थित मधोमध वाहते. तिने तारतम्य सोडले तर आजूबाजूची गावें बुडून जातील.
तसेच… आपण… नेहमीच्या जीवनात व आत्ता वैश्‍विक संकटाच्या वेळी… बंधने पाळली तर आपल्यावर संकटांचा डोंगर कोसळणार नाही. आपले जीवन संगीतमय होईल… याची जाणीव बहुतेकजणांना आहे. पण शेवटी ‘स्वभावाला औषध नाही’.. असे म्हणतात तेच खरे. तसेच ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ हेही खरे आहे.
योगशास्त्रात या सर्व विषयावर विविध प्रकारे चिंतन करून त्यावर ठोस उपाय करण्याची प्रथा आपल्या ऋषींनी हजारो वर्षांपासून चालू केली आहे.

मागच्या वेळी आपण मास्क व्यवस्थित नाकपुड्यांवर घातला तर कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी होते हे बघितले. कारण नाकपुड्याच कोरोनाचे शरीरात येण्याचे प्रवेशद्वार आहे. लोक काय करतील – ऐकतील का नाही?
– शिस्तीत बंधनयुक्त वागतील माहीत नाही… मग आपण बघ्याची भूमिका घेऊन चिंता करतच रहायचे? नक्की नाही. कारण ‘चिंता’ हा शब्दच योगसाधकाला माहीत नसतो.
हठयोगातील जलनेती व कपालभाती ही अत्यंत उपयुक्त व लाभदायक तंत्रे आहेत.
१) जलनेती – यामध्ये मीठ घातलेले कोमट पाणी नाकपुड्यांत सोडायचे असते. पण ही क्रिया शास्त्रशुद्धपणे करायला हवी. दोन मुद्दे महत्त्वाचे – मिठाचे प्रमाण व पाण्याचे तापमान.
मिठाचे प्रमाण ः मीठ पाण्यात मिसळल्यानंतर पाण्याची चव अश्रूंप्रमाणे व तितकीच खारट असणे आवश्यक आहे. जास्त मीठ घालू नये. हानिकारक आहे.
पाण्याचे तापमान ः आधी मिठाचे पाणी उकळायचे व नंतर थंड करायचे. कोमट झाले की मग जलनेती करायची.

* जलनेतीचे भांडे (पॉट) – पूर्वी पंचधातूचे भांडे बनवत असत. पण ते महाग असायचे. तसेच त्याचे वजन जास्त असायचे. आता तर ते बनवणाराच मिळत नाही.
हल्ली प्लॅस्टिकचे दिवस म्हणून विविध संस्थांनी तसे छान हलके, स्वस्त पॉट बनवायला सुरुवात केली. पण परत ते सगळीकडे मिळणे कठीण होते.
माझ्या योगसाधकांना या भांड्याची गरज होती व ती मिळत नव्हती म्हणून ध्यान करताना मी या विषयावर विचार- चिंतन केले आणि मला उपाय सापडला… तो असा…

* आपण तीर्थ हाताच्या तळव्यावर घेऊन पितो. तसेच तळवा व्यवस्थित दुमडला तर त्याच्यात जास्त पाणी व्यवस्थित राहते. तो हात नाकपुड्यांना लावून पाणी नाकातून आत ओढायचे/ खेचायचे. पाहिजे तर मान फिरवून दुसर्‍या पुडीतून बाहेर काढायचे. एक कप हा साधारण सात-आठ वेळा ही कृती करायला वापरू शकतो. मी आधी अनेक वर्षे जलनेती करीत असे.
जलनेती केल्यामुळे नाकाच्या आतील सर्व भाग साफ होतो. तिकडील घाण निघून जाते. जंतूंचा प्रसार होण्याची शक्यता कमी होते. कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी होईल.