योगसाधना – ४१९ अंतरंग योग

  •  डॉ. सीताकांत घाणेकर

डोळे बंद करून आपल्या मनातील विचारांवर लक्ष केंद्रीत करावे. सहसा मन एकाच विचारावर स्थिर राहात नाही. हे विचार कोणते याची नोंद मनातच ठेवावी. साधारण पाच विचार आले की डोळे उघडावे व हे पाच विचार किती वेळात आले हे आपल्या घड्याळात बघून एका कागदावर त्याची नोंद ठेवावी.

अंतरंग योगातील धारणा- ध्यान- समाधी यांचा अनुभव घेण्यासाठी आपल्या मनावर चांगल्या प्रकारचे नियंत्रण लागते. यासाठी शास्त्रशुद्ध योगसाधना अत्यावश्यक आहे.
‘धारणा’- या अंगामध्ये सुरुवातीला चित्त एकाग्र होते पण आपले लक्ष असले की लक्षात येते की हेच मन दुसर्‍या विचारात गुंतायला लागते. मुख्य म्हणजे चित्त एकाग्र नाही ही गोष्ट अनेकांच्या लक्षातच येत नाही आणि त्यामुळे चित्त परत मूळ विषयावर साधक आणत नाही. म्हणून संपूर्ण दक्षता घ्यावी.

आता असे घडणे हे बिलकुल स्वाभाविकच आहे कारण आम्ही अनेक वर्षांमध्ये असा चित्त एकाग्रतेचा शास्त्रशुद्ध अभ्यास केलेलाच नसतो. खरे म्हणजे भारतीय शिक्षणपद्धतीप्रमाणे योगाभ्यास बालपणात, ऋषींच्या अरण्यातील आश्रमात सुरू होत असे. त्यावेळी व्यक्तीचे वय सहाच्या आसपास असे. तसेच निसर्गाच्या सान्निध्यात योगसाधना करणे सोपे जाते. आश्रमातील विद्यार्थी ब्राह्ममुहूर्तावर उठत असत म्हणजे पहाटे साडेतीन ते चारच्या आसपास. म्हणून साधना लवकर सुरू होत असे.
आणि आज??? आम्ही योगाभ्यास बालपणी सुरू केला नाही. त्यामुळे ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी बहुतेक जण साखर झोपेचा आस्वाद घेत असतात. त्यामुळे साधना सुरू करेपर्यंत जगाची वर्दळ सुरू झालेली असते. त्यामुळे शांतता बिघडते.

आजही भारतातील आश्रमातील लोकांचे जीवन चार वाचताच सुरू होते. त्यामुळे तिथे योगाभ्यास पाच वाजता सुरू केला जातो. ज्या कुणाला प्रामाणिकपणे योगसाधना करायची असेल ती व्यक्ती आपल्या जीवनात थोडाबहुत बदल नक्कीच करेल.
आपले चित्त चंचल असल्यामुळे व्यत्यय हा सुरुवातीला येणारच. त्यामुळे निराश होण्याची गरज नाही. इथे एक गोष्ट करता येईल ती म्हणजे एका विशिष्ट वेळात किती वेळा व्यत्यय आले, किती वेळा चित्त एकाग्रतेपासून ढळले याची नोंद घेऊन त्याप्रमाणे अभ्यास चालू ठेवायचा आणि दक्षता घेऊन हे व्यत्यय कमी वेळा होतील तसेच जास्त वेळा चित्त बाहेर राहणार नाही यावर लक्ष ठेवावे. थोड्या सत्रांनंतर आपली प्रगती होते की नाही हे लक्षात येईल. यासाठी वेगवेगळ्या प्रकारांचा आपण अवलंब करण्याचा प्रयत्न करू.

१) डोळे बंद करून आपल्या मनातील विचारांवर लक्ष केंद्रीत करावे. सहसा मन एकाच विचारावर स्थिर राहात नाही. हे विचार कोणते याची नोंद मनातच ठेवावी. साधारण पाच विचार आले की डोळे उघडावे व हे पाच विचार किती वेळात आले हे आपल्या घड्याळात बघून एका कागदावर त्याची नोंद ठेवावी.
एका विशिष्ट क्षणी मन अत्यंत चंचल असते. तर साधारणपणे पाच विचारांसाठी तीस ते साठ सेकंद लागतात. मन थोडे शांत असले तर त्यासाठी दोन-तीन मिनिटेही लागतील. हे विचार कसले होते याचीसुद्धा नोंद ठेवावी.
– आवश्यक/अनावश्यक, चांगले/वाईट, भयानक, स्वतःबद्दल/इतरांबद्दल, विश्‍वाबद्दल…
हा अभ्यास नियमित दिवसातून चार-पाच वेळा करावा. आपल्या असे लक्षात येईल की दिवसातील वेगवेगळ्या वेळी व्यत्यय कमी-जास्त असतील तसेच विचारदेखील वेगळे असतील. अभ्यास काही काळ चालूच ठेवला की आपली प्रगती होईल. म्हणजे व्यत्यय कमी वेळा येतील व कमी वेळ मन बाहेर राहील.

२. आपल्या घरासमोरील रस्त्याकडे लक्ष केंद्रीत करावे. तिथे निरनिराळ्या प्रकारची वाहनं येतात- सायकल, दुचाकी- स्कूटर, मोटरसायकल, चारचाकी, लहान गाड्या, व्हॅन, बस, ट्रक… सुरुवातीला या सर्व वाहनांकडे लक्ष द्यावे. मनात नोंद घ्यावी की कुठल्या प्रकारची वाहने या रस्त्यावर दृष्टीस पडतात. हीच गोष्ट इतर कुठेही आपण करू शकतो. शक्यतो मध्यम रहदारीचा रस्ता सोयीचा पडतो. असे केल्यानंतर आपल्या मनात एक चित्र तयार होईल की कोणती वाहने या रस्त्यावर जास्त असतात. तसेच वेळेप्रमाणे – सकाळी, दुपारी, संध्याकाळी रहदारी बदलणार. मुख्य म्हणजे मनाला एक शिस्त लागेल की चित्र फक्त रहदारीवरच एकाग्र करायचे. त्यामुळे इतर कुठलाही विचार सहसा मनात येणार नाही.

तद्नंतर पुढचा टप्पा- एका विशिष्ट तर्‍हेच्या वाहनांची नोंद घेणे – फक्त दुचाकी किंवा चारचाकी. मग त्यापुढे जाऊन दुचाकीमधील फक्त स्कूटर किंवा फक्त मोटरसायकल. तसेच चारचाकीमधील विविध वाहने- फक्त लहान गाड्या किंवा त्यांचा रंग.
त्यापुढे तिसरा टप्पा. एका विशिष्ट तर्‍हेच्या गाड्या किंवा त्यांचा रंग.
पहिल्या टप्प्यापासून या वाहनांची संख्या मोजली तर चित्त आणखी एकाग्र होईल. तसेच किती वेळ हे तंत्र चालू ठेवणार हेदेखील ठरवावे. – म्हणजे किती मिनिटे. मनाला वेळेचे बंधन असल्यामुळे एक शिस्त लागेल. यात आणखी एक फरक आपण करू शकतो तो म्हणजे गाड्यांचे रंग – काही ठरावीक रंगाच्याच गाड्यांची नोंद ठेवावी. उदा. पांढरी- काळी- तांबडी… पाहिजे असल्यास एका कागदावर या वेगवेगळ्या रंगांच्या गाड्यांची नोंद करावी- म्हणजे शेवटी प्रत्येक रंगाच्या गाड्यांची संख्या नोंद होईल.

इथे किती गाड्या झाल्या याचा आम्ही सर्व्हे करत नाही तर हा सारा प्रपंच चंचल मनाला एका विशिष्ट कार्यात बांधून ठेवण्यासाठी आपण करतो आहोत हे विसरू नये.
अनेकांना, बहुदा लहान मुलांना असा अभ्यास करताना आनंद वाटतो. मजा येते.
३. पाढे मोजणे – आपण बालपणात पाढे शिकलो होतो त्यांची आता उजळणी करायची – सरळ व उलटी. उदा. १,२,३,४…. पन्नास…… शंभर. नंतर उलटी- शंभर… नव्व्याण्णव……. एक. एक ते १०० पाढे आपण सहज म्हणू शकतो. पण उलटी मोजणी करताना चित्त एकाग्र असणे अत्यावश्यक आहे.
सुरुवातीला मोठ्याने म्हणायचे. नंतर मनातल्या मनात. तसेच कुणासमोर मोठ्याने बोलले तर बरे कारण मोजताना झालेली आपली चूक तो दाखवू शकेल. जसजशी चित्त एकाग्रता वाढेल तसतसे पुढे थोडा कठीण अभ्यास करावा. उदा. बे एके ब, बे दुने चार…. मग तेच उलट म्हणायचे. त्यानंतर इतर पाढे, तीनचा, चारचा वगैरे… किती पाठ केले होते बालपणी तेवढे.

सुरुवातीला गरज असेल तर उजळणीचे पुस्तक समोर ठेवून पाढे मोजावे..
या सर्व तंत्रांमध्ये डोक्यात तणाव ठेवू नये. अगदी सहज पाढे मोजावेत. हेतू हाच की चित्त-एकाग्रता वाढवणे. जसा अभ्यास नियमित होईल तसे आपल्याच लक्षात येईल की हळूहळू मनावर नियंत्रण येते आहे.

माझ्या अनुभवावरून मला कळून चुकले की मला स्वतःला खूप फायदा झाला व इतरांनादेखील. ही सगळी तंत्रे मला कुणीही शिकवली नाहीत. मला प्रामाणिकपणे योगसाधना करायची होती. आसने- कपाल भाती प्राणायाम- व्यवस्थित होत असत. पण अंतरंग योगाकडे आलो की पुढे अपेक्षित प्रगती होत नसे. तरीही मी धारणा-ध्यान करण्याचा सराव नियमित चालू ठेवला आणि आश्‍चर्य म्हणजे ही वेगवेगळी तंत्रे त्या अवस्थेत मला सुचली. तशीच अनेक सोपी, साधी, सुटसुटीत तंत्रे आहेत. ती पुढच्या वेळी…
तुम्हालाही काही माहीत असतील तर कळवा ना. आम्हा सर्व योगसाधकांना फायदा होईल.