योगसाधना – ४०९ प्रत्याहार – २७

  • डॉ. सीताकांत घाणेकर

ठरलेल्या आठ दिवसांसाठी लाखो स्वाध्यायी आयोजनाप्रमाणे ठरवलेल्या वेगवेगळ्या गावात जातात. गटामध्ये पाच-सहा व्यक्ती असतात. एक-दोन दांपत्ये व काही तरुण. मिळेल तो गट व मिळेल ते गाव. गावकरी जसे राहतात तसे हे स्वाध्यायी तिथे राहतात.

प्रत्येक व्यक्तीला थोडेफार ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे. त्या ज्ञानाचे वेगवेगळे पैलू असतात, हेतू असतात. एक तर्‍हेचे ज्ञान आहे ते उदरनिर्वाहासाठी आहे. त्यांतही विविध क्षेत्रं आहेत. प्रत्येकजण आपापल्या पेशा किंवा व्यवसायाप्रमाणे ते घेत असतो. आणि दुसरे आहे ते म्हणजे ‘सामान्य ज्ञान’. प्रत्येक व्यक्तीला थोडेबहुत ज्ञान जन्मतःच असते अथवा जसा त्याचा समाजाशी, विश्‍वाशी संबंध येतो तसे हे ज्ञान विस्तारित होत जाते. तिसरे ज्ञान आहे – जीवनविकासाचे ज्ञान. यात आत्मज्ञान अभिप्रेत आहे. आपण योगसाधनेवर विचार करतो म्हणून त्यातील योगमार्ग – ज्ञानयोग – भक्तियोग – कर्मयोग – राजयोग बघतो आहोत.
सुरवातीला ज्ञान संपादन करणे आवश्यक आहे. प्रामुख्याने ते बुद्धीसाठी आहे. सुरुवातीला तसे ते थोडे कठीणच वाटते, क्लिष्ट वाटते. पण जसजसा अभ्यास आपण करत जातो, गर्भितार्थ कळायला लागतो तसतसा आनंद मिळतो. आणखी अभ्यास करावा असे वाटते.
मानवाला मनदेखील आहे. त्यात भाव असतो. भावना असतात. त्याच्यासाठी थोडा सोपा योग म्हणजे भक्तियोग. सामान्य मानवाला अगदी सोपा. यात भजने, भक्तिगीते, मंत्र… ही सर्व येतात. मुख्य म्हणजे भक्तीयोगानंतर व्यक्तीचा भाव वाढायला हवा. सृष्टी, प्राणिमात्र… यांच्याबद्दल त्याचे प्रेम वाढणे अपेक्षित आहे.
मनुष्याला शरीरसुद्धा आहे. आपण सर्वतर त्याचेच चोचले पुरवीत असतो. पण त्याच्यापुढे जाऊन या शरीराचा सदुपयोग करायचा असतो. त्यासाठी ज्ञान व भक्ती आवश्यक आहे.
सूज्ञ व्यक्ती या तिन्ही योगांचा अभ्यास करतात – बौद्धिक-मानसिक-भावनिक विकासासाठी. शरीराचा उपयोग करून कर्मयोग करायचा असतो.
भारतीय संस्कृतीत आपण अनेक मोठमोठे कर्मयोगी बघतो. जीवनभर या व्यक्ती समाजाच्या कल्याणासाठी झटले. त्यांची प्रेरणा आम्ही सर्वांनी घेणे आवश्यक आहे. पण तो मार्ग जरा कठीण वाटतो. महापुरुष तो मार्ग सोपा करून दाखवतात. त्यातील एक म्हणजे पू. पांडुरंगशास्त्री आठवले. त्यांच्या स्वाध्याय परिवारात ज्ञान-भक्ती-कर्म या योगांचा त्रिवेणी संगम आहे. या तिन्ही योगांचा अभ्यास करता करता, शास्त्रीजी सांगतात की स्वाध्यायींनी भक्तिफेरी-भावफेरी करावी. म्हणजे लोकसंपर्क करावा. त्यासाठी ते तीर्थयात्रा करायला सांगतात.

ठरलेल्या आठ दिवसांसाठी लाखो स्वाध्यायी आयोजनाप्रमाणे ठरवलेल्या वेगवेगळ्या गावात जातात. गटामध्ये पाच-सहा व्यक्ती असतात. एक-दोन दांपत्ये व काही तरुण. मिळेल तो गट व मिळेल ते गाव. गावकरी जसे राहतात तसे हे स्वाध्यायी राहतात- कधी कुणाच्या घरातील खोलीत तर कधी शाळेत, कधी धर्मशाळेत, तर कधी मंदिरात… अनेक गावात अपेक्षित सोय नसते. – ना शौचालय, ना स्नानासाठी बंद खोली म्हणजे स्नानगृह. गावचे लोक जसे जगतात, तसेच या स्वाध्यायींना रहावे लागते. कधी कधी विहिरीवर किंवा नदीवर स्नान करावे लागते. महिलांना तर गाव उठण्याच्या आधी आंघोळ उरकावी लागते. प्रत्येकाने स्वतःचे कपडे धुवायचे असतेत. गटातील सदस्य एकत्र येऊन स्वतःसाठी साधा शाकाहारी स्वयंपाक बनवतात. सकाळी गावात प्रभात फेरी होते. स्तोत्रं-अष्टकं म्हणत म्हणत. सकाळी व संध्याकाळी लोकांशी भावसंपर्क होतो. कसलाही भेदभाव नाही – ना धर्म, ना वर्ण, ना वय, ना लिंग… प्रत्येक मानवाला भेटायचे – दैवी भ्रातभाव – लक्षात ठेवून. रात्री सार्वजनिक जागेत एकत्र बसायचे गावकर्‍यांबरोबर. संस्कृतीच्या, जीवन-विकासाच्या गप्पागोष्टी करत… काही भावगीते (जी स्वाध्यायींनीच रचलेली आहेत – ज्यांच्यावर कवीचे नाव नसते) म्हणायची असतात.

विविध गावात भक्तिफेरीचे वेगवेगळे अनुभव येतात –
* हवा ः आपल्या राहत्या गावापासून वेगळी असू शकते- केव्हा अत्यंत गरम तर कधी एकदम थंड.
* पाणी ः थोड्या गावात व्यवस्थित नळाचे पाणी असते. पण केव्हा केव्हा एक विशिष्ट वेळीच नळाला पाणी येते. त्यामुळे गरजेकरिता लागणारे पाणी वेगळे भांड्यांमध्ये भरून ठेवावे लागते. ज्यांच्या घरात राहतो त्यांच्यावर हा भार स्वाध्यायी घालत नाहीत. काही गावात पाणी दुरून आणावे लागते.
* भोजन, चहाफराळासाठी लागणारे साहित्य थोड्या प्रमाणात स्वाध्यायी आपल्या गावातून जाताना घेऊन जातात. पण गरज लागली तर स्थानिक गावात खरेदी करतात. कधी कधी यासाठी बाजार किंवा दुकाने जवळ नसतात. काही ठिकाणी दूधसुद्धा व्यवस्थित मिळेल याची खात्री नसते.
* कधी कधी गाव डोंगराळ भागात असते. तेव्हा प्रत्येक दिवशी वर चढणे व खाली उतरणे आलेच.
* हल्ली अनेकांचे आरोग्य ठीक नसते. – मधुमेह, हृदयविकार, गुडघेदुखी, पाठदुखी… असे अनेक रोग असतात. त्यासाठी स्वतःची औषधे बरोबर न्यावी लागतात. कधी कधी गटातील कोणीही सदस्य आजारी पडू शकतो – ताप, सर्दी-खोकला, जुलाब… गावात डॉक्टर-वैद्य असेलच असे नाही. प्रसंगानुसार सर्व सांभाळावे लागते.
* काही गावात साफसफाई नसते. कचर्‍याचे ढीग असतात. गटाराचे पाणी तुंबलेले असते. त्या ठिकाणी मग मच्छर व माशापण खूप त्रास करतात.
*् गावात वेगवेगळे अनुभव येतात कारण सर्व प्रकारचे लोक भेटतात. विविध मते ऐकायला मिळतात.
– असे प्रेमाने भेटणे फार आवश्यक आहे. तुम्ही फार चांगले काम करता. आमच्या गावातही असा स्वाध्याय सुरू करणे आवश्यक आहे… आम्हाला वेळ नाही, तुमचे ऐकायला, असे तुमच्यासारखे फिरायला. असे विचार दिले म्हणून जग सुधारणार काय? तुम्ही उगाच वेळ वाया घालवता…
* हे सगळे म्हातारपणी करायचे असते. तरुणपणी आपले काम करण्यास जास्त लक्ष द्यावे.

अनेकवेळा गावातली जनावरे स्वाध्यायींशी एवढी एकरूप होतात- गुरेढोरे, कुत्रेमांजरी… कारण स्वाध्यायी त्यांनाही भरभरून प्रेम देतात.
– समाजातील विविध स्तरातील व्यक्ती भेटतात – सुशिक्षित-अशिक्षित; गरीब-श्रीमंत, डॉक्ट, वकील, शेतकरी, कोळी (सागरपुत्र-सागरकन्या ः शास्त्रीजींनी त्यांना दिलेले गोंडस नाव), आदिवासी, महार, चांभार, कुंभार, राजकारणी… स्वाध्यायी सर्वांना प्रेमाने भेटतात. अनेक गावात रहदारीची सोय नसते. ना बस ना रिक्क्षा, बैलगाडी, घोडागाडी, मोटरसायकल…. मैलोन् मैल चालत जावे लागते.
एक आठवडा कसा भुर्रकन निघून जातो कळतदेखील नाही. शेवटी परत घरी येण्याचा क्षण येतो. प्रत्येकाचे मन मिश्र भावांनी भरलेले असते – आनंद असतो कारण परत आपण स्वतःच्या घरी कुटुंबाकडे परतणार. थोडे दुःख कारण हे प्रेमळ लोक परत भेटणार नाहीत. अनेकवेळा एक हृदयगम्य दृश्य पहायला मिळते – गावातील कुत्रासुद्धा इतर लोकांबरोबर वेशीपर्यंत येतो.
सवय नसलेल्या कष्टांमुळे शरीर जरी थकलेले असले तरी मनाला तरतरी येते. कारण जीवनाचा थोडा वेळ सत्कर्मी लावल्याचे समाधान मिळते.
शास्त्रीजी छान सांगतात – आता घरातील उंबरठ्याला सांगायला मिळेल की आज आम्ही आमच्या दैवी भावंडांना भेटून आलो. त्यांना ऊब दिली. देवाला विसरलेला असेल त्याचा कृतज्ञतेचा भाव जागृत करून आलो.

आपण गोष्टीत वाचतो की ऋषी तप करत होते. थोडे दिवस का होईना – स्वाध्यायींचे हे तपच आहे. कारण स्वतःच्या इच्छेने उचललेले हे कष्ट आहेत- संस्कृतीच्या प्रेमापोटी, स्वतःच्या जीवनविकासासाठी – ‘‘तत्त्वासाठी परिश्रम’’. (शास्त्रीजींची व्याख्या.)
आपला विषय प्रत्याहार – इंद्रियांवर नियंत्रण – आहे. त्या विषयाकडे अशा भक्तिफेरीचा घनिष्ठ संबंध आहे. गावांत इंद्रियांच्या उपभोगाची साधने मिळणार नाहीत – जी आपल्या घरी मिळतात. असे नियमित केल्याने इंद्रियांवर थोडे थोडे नियंत्रण मिळवण्यासाठी अभ्यास आपोआप होतो.