ब्रेकिंग न्यूज़

योगसाधना – ३३२ योगमार्ग – राजयोग आसन – १६

– डॉ. सीताकांत घाणेकर

हल्ली जमिनीवर मांडी घालून बसण्याची आपली सवय मोडली आहे. कारण आपण पाश्‍चात्त्यांसारखे खुर्चीवर बसतो. सगळे ‘चेअर मेन’ झालो आहोत. त्यामुळे थोड्या वेळाने हे सुखासन (भारतीय बैठक) ‘दुःखासन’ होण्याची शक्यता असते. निदान योगसाधकांनी तरी या तीन आसनांचा उपयोग करून घ्यावा – टीव्ही बघताना जरी याचा सराव केला तरी फायदा होईल.

आपण कोणतीही चांगली महत्त्वाची गोष्ट करतो त्यावेळी त्याची पूर्वतयारी करणे अत्यंत जरुरीचे असते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असे प्रसंग वेळोवेळी येतच असतात. उदा. स्वयंपाक करणे, परिक्षेला बसणे, जवळच्या किंवा दूरच्या प्रवासाला जाणे, उत्सव किंवा समारंभ साजरा करणे, ऑपरेशन करणे, घर-बंगला बांधणे, लढाई करणे…. ही यादी न संपणारी आहे. या सर्व गोष्टी वैयक्तिक, सामाजिक जीवनात किंवा अन्य कुठल्याही क्षेत्रात असू शकतात. तयारी व्यवस्थित केली तर परिणाम उत्तम येतात. केलेल्या गोष्टींमुळे फायदा होतो. त्याशिवाय करणार्‍यांना उत्साह येतो, उमेद वाढते. ती गोष्ट पुन्हा पुन्हा कराविशी वाटते.

कुठल्याही क्षेत्रात यश संपादित करायचे असेल तर आयोजनामध्ये विविध पैलूंचा विचार करावा लागतो. तद्नंतर त्यावर अभ्यास, विचार-विनिमय, सुसंवाद… अशा अनेक गोष्टी करायच्या असतात. तिथे कुठलीही घाई उपयोगाची नाही. हे सर्व केले नाही तर सर्वांना त्रास व दुःख होण्याचीच शक्यता जास्त असते. तसेच फायद्याऐवजी नुकसानदेखील होऊ शकते.
अगदी अशीच गोष्ट योगसाधनेची आहे. प्रत्येक योगसत्र व्यवस्थितपणे आखायचे असते. त्यामुळे प्रत्येक पैलूचे विस्तृत ज्ञान आवश्यक असते. असे केले तर योगसत्र उत्कृष्ट ठरेल व ज्यावेळी योगसाधक दर दिवशी साधना करेल त्यावेळी त्याला क्षणाक्षणाला सुख व आनंदाचा अनुभव मिळेल. योगसाधनेचे विविध फायदे त्याला सहज अनुभवता येतील.

विश्‍वांत वेगवेगळ्या संस्था आहेत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने योगासने आयोजित करतात. पण ज्यावेळी काहीजण गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय योग करतात तेव्हा त्यांना अपेक्षित परिणाम मिळेलच याची खात्री नसते. उलट योग हे दुधारी शस्त्र असल्यामुळे चुकीची तंत्रे केली तर दुष्परिणाम सुद्धा होतात.
बारकाईने योगसत्राचा अभ्यास केला तर लक्षात येईल की अनेक वर्षांपूर्वी या ऋषीमुनींनी मानवाच्या विविध पैलूंवर सखोल विचार करून एक विशिष्ट पद्धती आखली. त्याप्रमाणे योगसाधना करणे सर्वथा उचित होईल.
योगसाधना करताना तीन गोष्टी प्रामुख्याने येतात…
* साधनेचे तत्त्वज्ञान, शास्त्र व कृती (प्रत्यक्ष सत्र). त्यात सर्वांत आधी येते ते ध्येय. योगसाधनेचे ध्येय योगशास्त्राच्या व्याख्येतच दिसून येते…

– युज्यते अनेन इति योगः|
ः- योग म्हणजे मीलन – जीवात्मा व परमात्मा; मन व शरीर. फार उच्च तत्त्वज्ञानाप्रमाणे हे मीलन (जीवात्मा व परमात्मा यांचे) मृत्युनंतर अपेक्षित आहे. तो फार गूढ विषय आहे. ज्ञानयोगामध्ये त्याबद्दल विस्तृत ज्ञान आहे. इथे मीलनाचा संदर्भ आहे तो योगाभ्यासातील विविध तंत्रे करतानाचा. आत्मा व परमात्मा यांचं मीलन म्हणजे परमानंदाचा अनुभव- जसे माता आणि मूल यांची भेट झाल्यावर त्या दोघांना होतो तसा. भारतीय संस्कृतीनुसार हे दोन्ही आपल्या शरीरातच आहेत. त्यांचे मीलन कसे घडवून आणायचे हे मार्गदर्शन सद्गुरू करतात.

तद्नंतर मीलन म्हणजे मन व शरीराचे. प्रयत्न केला तर हे सहज शक्य आहे. पण तशी जाणील असणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच साधनेच्या प्रत्येक पायरीवर दोघांना एकत्रित ठेवणे अपेक्षित आहे.
आपले शरीर साधनेच्या जागेवर स्थित असते, पण मन तिथे आहे की नाही हे आपणच बघायचे असते. त्यानंतर ते सर्व वेळ तिथेच राहील याची हमी किंवा जबाबदारी घ्यायला हवी. विविध तंत्रे करताना मन शरीराबरोबर नसेल तर तो फक्त शारीरिक व्यायाम होईल व संपूर्ण पंचपैलूंवर लाभ मिळणार नाहीत.
* शारीरिक – मानसिक – भावनिक – बैद्धिक – आध्यात्मिक.
आपले मन सगळीकडे भटकत असते. ते केव्हा कुठे जाईल याची त्या व्यक्तीलादेखील खात्री नसते. म्हणून मन शरीराकडे वळवण्यासाठी सर्वांत आधी तीन वेळा ‘ॐ’ चे उच्चारण करावे. तो उच्चार गोड, आवाजात हळुवार करावा.

– ॐ ऽ ऽ ऽ ; ॐ ऽ ऽ ऽ ; ॐ ऽ ऽ ऽ ऽ
साधकाला ॐ शब्दाची उत्पत्ती माहीत असावी. त्यासाठी आपल्या ज्ञानी ऋषींनी एक सुंदर गीत रचले आहे…
* ॐकार प्रधान रूप गणेशाचे… ‘अ’कार तो ब्रह्मा… ‘उ’कार तो विष्णु…. ‘म’कार महेश…. म्हणजे ॐ म्हणताना आपोआप मनबुद्धिला या चारही देवांचे स्मरण होणे अभिप्रेत आहे. हेच ॐ म्हणण्यामागील श्रेष्ठ तत्त्वज्ञान आहे.
पण होते काय की बहुधा आपण या सर्व गोष्टी कर्मकांडात्मक करतो. कारण त्यामागील तत्त्वज्ञान आम्ही जाणत नाही. याचे एक उत्कृष्ट उदा….
* आम्ही मंदिरात जातो – देवीच्या किंवा देवाच्या. तिथे चित्त एकाग्र करून प्रार्थना म्हणायला सुरुवात करतो. अगदी भगवंताच्या मुखारविंदाकडे बघून. आम्हालाही आनंद होतो आणि भगवंतालादेखील!
– त्वमेव माता पिता त्वमेव….
इथपर्यंत सगळे काही छान, व्यवस्थित, सुखदायक, आनंददायक असते कारण आपण विश्‍वाला विसरतो. आपल्या समस्या विसरतो.
एवढ्यात ‘माकड मन’ उड्या मारत बाहेर काढून ठेवलेल्या आपल्या नवीन घेतलेल्या चपलांवर जाते… ती चप्पल जागेवर तर असेल ना? का कुणी चोरली असेल? एका क्षणातच हे घडते. इकडे प्रार्थनाही चालू असते…
* त्वमेव बंधू… सखा त्वमेव.
म्हणजे आपला सखा व कोण झाला? – भगवंत की चप्पल?
त्यामुळेच सुरवातीपासूनच तंत्रांमागील शास्त्र व तत्त्वज्ञान माहीत हवे., खरे म्हणजे ज्यांनी याचा अनुभव घेतला असेल, शास्त्रशुद्ध योगसाधना करताना – ॐकाराचा उच्चार करताना अत्यंत सुखद संवेदना होतात. अत्यंत उच्च प्रतीचा चिदानंदाचा अनुभव नव्हे तर अनुभूती येते. कारण ॐच्या तिन्ही अक्षरांमध्ये (अ-उ-म) सुंदर अशी आंतून गोंजारणारी कंपने आहेत.

एकदा व्यक्तीला असा सुंदर अनुभव आला की मग मन बाहेर जाणारच नाही. कारण त्या मनाला सुखशांती हवी असते. ती बाहेरील विश्‍वांत मिळत नाही. कारण ती आंतरिक असते. फक्त मनाला हवे असते ते मार्गदर्शन. या विषय समजण्यासाठी झोपेचे उदाहरण घेऊ या. …
* झोप – जेव्हा शांत लागते तेव्हा व्यक्तीला सुखाचा अनुभव येतो. सकाळी उठल्यावर तरतरी येते. असे घडण्यासाठी दोन्ही मने – बाह्यमन व अंतर्मन शांत असणे आवश्यक आहे. मनात त्यावेळी कुठलेही विचार असता कामा नये किंवा स्वप्ने पडता कामा नये. एक संगीतकार आपला स्वर अगदी सूरात लावतो आणि त्याच्या गाण्यातून सुमधुर संगीत निघते. अगदी तशीच अवस्था ‘ॐ’ गाताना मनाची होणे अपेक्षित आहे. आपण ॐ किती वेळा, किती वेळ (दीर्घ) म्हणतो यापेक्षा कसे म्हणतो हे महत्त्वाचे आहे – चित्ताची एकाग्रता साधण्यासाठी परमानंदाचा अनुभव घेण्यासाठी!

ॐ लवकरच संपतो आणि मन परत बाहेर उड्या मारण्याच्या तयारीत असते. म्हणून लगेच प्रार्थना सुरू करायची असते.
योगसाधना करताना काही विशिष्ट आसने अत्यंत उपयोगाची आहेत.
* पद्मासन (कमळाच्या पाकळ्यांसारखी) – उत्कृष्ट. या आसनात मन शांत ठेवणे सहज शक्य असते. म्हणून त्यासाठी नियमित सराव हवा. नाहीतर गुडघे दुखले तर वेदनाच जास्त होणार. हे आसन जमत नसेल तर दुसरे करावे…
* वज्रासन (गुडघे मोडून बसणे)
– हे आसनही अत्यंत उपयुक्त आहे. पण याचासुद्धा नियमित सराव हवा.
* सुखासन (भारतीय बैठक)
– हल्ली या आसनात बसण्याची आपली सवय मोडली आहे. कारण आपण पाश्‍चात्त्यांसारखे खुर्चीवर बसतो. सगळे ‘चेअर मेन’ झालो आहोत. त्यामुळे थोड्या वेळाने हे आसन ‘दुःखासन’ होण्याची शक्यता असते.
निदान योगसाधकांनी तरी या तीन आसनांचा उपयोग करून घ्यावा – टीव्ही बघताना जरी याचा सराव केला तरी फायदा होईल.