योगमार्ग – राजयोग

योगमार्ग – राजयोग

(योगसाधना – २४५)

(स्वाध्याय – १३)

– डॉ. सीताकांत घाणेकर

सामान्य मानवाला तत्त्वज्ञान हा अगदी रूक्ष विषय वाटतो. सुरुवातीला जेव्हा सामान्य व्यक्ती तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायला लागते तेव्हा सर्व पैलू व्यवस्थित समजत नाहीत. अनेक वेळा व्यक्ती गोंधळतात व अभ्यास सोडून देतात. त्यामुळेच नियमित स्वाध्याय आवश्यक आहे.

आळस न करता स्वाध्याय केला की कठीण विषयदेखील सोपे वाटू लागतात, रुचकर वाटतात. तदनन्तर अभ्यास करण्याची उत्सुकता वाढते. साधना सुरू होते. साधकाला आनंद मिळू लागतो.
पू. पांडुरंगशास्त्री हा विषय अगदी सोप्या भाषेत सांगतात. ते म्हणतात, ‘गणपती ही तत्त्वज्ञानाची देवता आहे. त्याच्या हातात मोदक असतो. तो ओबडधोबड असतो. बाहेरून आकर्षक वाटत नाही. पेढा मात्र सुंदर गुळगुळीत दिसतो. लहान मुलापुढे मोदक व पेढा ठेवला तर तो लगेच पेढा उचलतो. प्रथम घासातच त्याला पेढ्याच्या गोडव्याचा अनुभव येतो. याविरुद्ध मोदक दिसायला आकर्षक नाही. तसेच प्रथम घासात तोंडात पीठाची चव येते, त्याला काही रुची नसते. पण जसजसे ते मूल आणखी घास घेतं तेव्हा त्याला आतील पंचखाद्य किती रुचकर व गोड आहे ते कळतं. मग त्याला मोदकदेखील आवडायला लागतो. कारण त्याच्या लक्षात येतं की मोदक बाहेरून चांगला दिसत नसला तरी आत गोड असतो.
तत्त्वज्ञानाचेदेखील तसेच आहे. – सुरुवातीला रूक्ष पण नंतर सुंदर. जास्त करून सुरुवातीला विषय कठीण वाटतात कारण ते अत्यंत सूक्ष्म असतात- जसे आत्मा, परमात्मा; द्वैत-अद्वैत-विशिष्टाद्वैत-केवलाद्वैत-क्रियमाण- संचित, प्रारब्ध, कर्म, जन्म-मृत्युचे रहस्य, गुह्यशास्त्र, पाप-पुण्य…इत्यादी. त्यामुळे वेद, उपनिषद, गीता यांचा अभ्यास करताना सुरुवातीला साधक भांबावून जातो.
पोहताना सुद्धा तसेच होते. सुरुवातीला नाकातोंडात पाणी जाते, व्यक्ती गुदमरतो पण जसजसा सराव होतो तसतशी कर्तृत्वशक्ती वाढते. पोहणारा निष्णात होतो. तो पाण्यात कोलांट्या मारतो, छानपैकी तरंगतो, विविध खेळ करतो.
आध्यात्मिक ज्ञानाचेही तसेच आहे. रस चाखायचा असेल तर सूक्ष्म व्हायला हवे.
आपण फूल दुरून बघतो तेव्हा त्याचा रंग, आकार आम्हाला आकर्षित करतो. फुलाच्या जवळ गेलो व त्याला स्पर्श केला तर त्याची मृदुता जाणवते; वास घेतला तर सुवास मनाला आनंद देतो. पण तेवढ्यात फुलातून लहान मुंग्या किंवा छोट्या मधमाश्या बाहेर येतात. त्यांना काय मिळाले तर आतील गोड असे मध! कारण त्या लहान, सूक्ष्म असतात.
अध्यात्मात तसेच- जेवढे जवळ जाऊ, जेवढे सूक्ष्म होऊ तेवढा आनंद वाढत जातो, गोडी वाढत जाते. शेवटी आत्मानंद, परमानंद, चिदानंद अनुभवाला येतो. त्याचसाठी आवश्यक आहे सतत नियमित स्वाध्याय व योगसाधना.
स्वाध्याय करता करता ज्ञान होते की ‘मी एक आत्मा आहे. परमात्म्याचा अंश आहे. मी ज्या शरीरात वास करतो तिथे माझ्याबरोबर परमात्मादेखील आहे. तो माझ्या कर्मांची व्यवस्थित नोंद ठेवतो व त्याचप्रमाणे मला कर्मफल देतो’. हे ज्ञान अनेकांना असते. पण सूक्ष्म जाणीव होत नाही. त्यामुळेच अनेकजण षड्‌रिपूंचे, विकार-वासनांचे व अहंकाराचे गुलाम होतात. इतरांना त्रास करतात. तसे स्वतःचेही जन्मोजन्मीचे अकल्याण करतात. विश्‍वाकडे चौफेर नजर फिरविली तर अशा व्यक्ती व घटना वाढतच आहेत, असे दृष्टिक्षेपात येते. मूल्याधिष्ठित शिक्षण सहसा दिसत नाही.
ज्या क्षणी प्रत्येक व्यक्तीला जाणीव होईल की कुणीतरी आपल्या आचार-विचारांची नोंद व्यवस्थित ठेवतो आणि तीदेखील आपल्या शरीरातच बसून. त्यावेळी त्याच्या वागणुकीवर आपोआप नियंत्रण येईल.
पू. पांडुरंगशास्त्रींनी सांगितलेली या संदर्भातील एक छोटीशी गोष्ट फारच बोधप्रद आहे. गोष्ट आहे इंग्लंडच्या बादशहाची, जागतिक युद्धाच्या वेळची.
चांगले राजे ज्यांना प्रजेच्या कल्याणाची चिंता असते, ते अनेक वेळा वेश पालटून फिरत असतात. जसे आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज शेतकर्‍यांच्या वेशात फिरायचे.
एक दिवस इंग्लंडचे राजे असेच फिरत होते. फिरता फिरता ते लष्कराच्या छावणीत पोचले. तिथे बाहेर मैदानात एक सैनिक सिगार ओढत पाय टेबलावर ठेवून आरामात बसला होता. बादशहा त्याच्याकडे गेले व म्हणाले, ‘साहेब, पीट्‌सबर्गचा रस्ता कुठला… आपण सांगता का?’
साहेब आपल्याच तोर्‍यात त्यामुळे ऐकून न ऐकल्यासारखे केले. आपल्याकडे सामान्य माणसाला मोठ्या सरकारी साहेबांकडून अशीच वागणूक मिळते. शेतकर्‍याने परत तोच प्रश्‍न विचारला? साहेबांना राग आला. ते खुर्चीवरून उठले व त्या ‘सामान्य व्यक्तीला’ लाथ मारली. त्यामुळे तो माणूस खाली कोसळला. उठून उभा राहिला.
तेवढ्यात साहेब ओरडले, ‘मी या छावणीचा प्रमुख आहे आणि तू सामान्य माणूस! मला असले फालतू प्रश्‍न विचारतोस?’
शेतकरी म्हणाला, ‘माफ करा हं. माझेच चुकले. तुम्हाला मी विचारायला नको होते. तुम्ही कोण हे मी ओळखले नाही’. आणि तो चालायला लागला.
शास्त्रीजी म्हणतात, ‘हे लष्करातले लोक रागीट असतात पण विनोदीदेखील असतात. त्यामुळे त्या प्रमुखाने त्याला परत बोलावले व म्हणाला, ‘मी कोण आहे, माझा लष्करातील हुद्दा काय, हे जाणतोस?’
शेतकरी म्हणाला, ‘मला लाथ मारली म्हणजे तुम्ही फार मोठे ऑफिसर असणार.’ बरोबर आहे, मोठे लोकच लाथा मारतात.
लष्कर प्रमुख, ‘तरीही माझा हुद्दा ओळख बघू!’
शेतकरी म्हणाला, ‘तुम्ही सबलेफ्टनंट आहात काय?’
सैनिक, ‘नाही! त्याच्यावर.’
शेतकरी एक एक हुद्दा सांगायला लागला- ‘‘लेफ्टनंट, कॅप्टन…’ तरी सैनिक म्हणतो ‘त्याच्या वर!’ शेवटी शेतकरी म्हणाला, ‘मेजर का तुम्ही?’
सैनिक, ‘हो मी मेजर आहे व या लष्करी छावणीचा प्रमुख आहे.’
शेतकरी, ‘आपण एवढे मोठे. माझेच चुकले. मी तुम्हाला ओळखले नाही म्हणून सामान्य प्रश्‍न विचारला.’ शेतकरी मागे वळून चालायला लागला. विनोदी मेजरने त्याला पुन्हा बोलावले व म्हणाला, ‘मी कोण ते तुला कळले. पण तू कोण?’
शेतकरी म्हणाला, ‘साहेब, तुम्हीच ओळखा’. त्यावेळी इंग्लंडमध्ये दोन तर्‍हेचे हुद्दे होते. सिव्हिल व मिलिटरी. त्यामुळे मेजर म्हणाले, ‘तू सिव्हीलमध्ये आहेस का मिलिटरीमध्ये?’
शेतकरी म्हणाला, ‘मी मिलिटरीमध्ये.’
हे उत्तर ऐकल्यावर मेजर जरा सावध झाले. तरीपण त्यांनी विचारले, ‘मिलिटरीमध्ये कोण आहेस?’
मेजरसाहेब एक एक हुद्दा विचारायला लागले- ‘सबलेफ्टनंट, लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर… शेतकरी म्हणतो, ‘नाही, त्याच्या वर.’
हे ऐकल्याबरोबर मेजर वरमले व भीतीग्रस्त झाले. मेजरच्या वर ऐकल्याबरोबर खुर्चीवरून उभे राहिले. कारण हा शेतकरी दिसणारा माणूस आपल्यापेक्षा वरच्या हुद्यावर आहे याची त्याला जाणीव झाली. त्याला शब्द फुटेना.
शेतकरी म्हणाला, ‘काय झाले? विचारा की’.
मेजर म्हणाले, ‘‘लेफ्टनंट कर्नल, कर्नल, मेजर जनरल, जनरल… पुढे पुढे जाता जाता फील्ड मार्शल… सेनाप्रमुख (चीफ ऑफ स्टाफ) पर्यंत पोचले.’’ तरीही शेतकरी म्हणतो, ‘त्याच्यावर.’
मेजर म्हणाले, ‘त्याच्यावर आहेत इंग्लंडचे बादशहा. मग तुम्ही बादशहा का?’ ‘शेतकरी म्हणाला, ‘‘हो’’!
मेजरची आधीच बोबडी वळलेली. आता त्याला कोर्ट मार्शल दिसू लागला. लगेच ते म्हणाले, ‘‘साहेब, इंग्लंडच्या बादशहाविरुद्ध कोणी बोलला किंवा त्यांना शिव्या दिल्या तरी आम्ही त्याला शिक्षा करतो आणि इथे मी आपणास लाथ मारली. मला एकच शिक्षा-मृत्युदंड’’.
लगेच त्या मेजरनी आपली रिव्हॉल्वर काढली, बादशहाच्या हातात दिली आणि म्हणाला, ‘युवर हायनेस, आपण मला आत्ताच शूट करा. मला कोर्ट मार्शल नको.’
बादशहाने रिव्हॉल्वर घेतली. त्याच्या कपाळाला लावली. मेजर वाट बघतात की केव्हा गोळी डोक्यात आरपार जाणार?’
तेवढ्यात बादशहा हसत म्हणाले, ‘मेजर, इंग्लंडचा बादशहा एवढा मूर्ख नाही की नकळत घडलेल्या तुझ्या चुकीमुळे मी तुला ‘शूट’ करीन! तुमच्यासारख्या उमद्या शूर वीराला या हुद्यापर्यंत आणण्यासाठी आपला देश पुष्कळ संपत्ती खर्च करतो. तुला मारून मला माझ्या देशाचे नुकसान करायचे नाही. पण मी तुला अवश्य शिक्षा करीन.’’
मेजर थरथरत म्हणाले, ‘हो…मला शिक्षा हवीच.’
बादशहा म्हणाले, ‘तुला शिक्षा एकच आहे. यापुढे प्रत्येक क्षणी इंग्लंडचा बादशहा समोर आहे याची जाणीव ठेव. मग तुझी वागणूक सौम्य बनणार. तू उद्धट राहणार नाही.’
इथे गोष्ट संपते. पण यावरून बोध घेऊन आपल्यातील प्रत्येकाला जर जाणीव झाली की विश्‍वाचा बादशहा – परमेश्‍वर, आपल्या जवळच नव्हे तर आपल्यातच आहे. तर मग आपला आचार-विचार-उच्चार सुधारेल. मग विश्‍वांत नियंत्रण आणण्यासाठी कसलाही कायदा नको. सर्व तर्‍हेचे गुन्हे, चोर्‍या, मारामार्‍या, खून, बलात्कार, लाचलुचपत, लढाया… आपोआप बंद होतील.
त्यामुळेच मूल्याधिष्ठित शिक्षणामध्ये असल्या ज्ञानावर भर द्यायला हवा. शास्त्रीजींच्या स्वाध्याय परिवारामध्ये असेच उच्च विचार नियमित मिळतात. त्यांचे विश्‍वभर असलेले स्वाध्यायी – ‘स्वाध्याय’ करण्यास प्रमाद करत नाहीत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply