ब्रेकिंग न्यूज़

योगमार्ग – राजयोग

‘आयुष’ पुरवणीच्या ‘योगसाधना’ या सदरात आपण दर मंगळवारी भेटतो आहोत. वेळ कसा भराभरा निघून जातो… आपल्याला कळतच नाही. आपण ३८१ आठवडे भेटलो म्हणजे किती वर्षे भेटतो आहोत..? आपणच बघा. आणखी किती आठवडे भेटणार… मला माहीत नाही. देवी सरस्वती व योगेश्‍वर श्रीकृष्ण प्रेरणा देतील तोपर्यंत…!!
काही गोष्टी मुद्दाम नमूद करायला हव्या. मुख्य म्हणजे अनेकांची कृतज्ञता….
* नवप्रभाचे कार्यकारी मंडळ – ज्यांनी मला ही अमोल अशी संधी दिली… ज्यामुळे मी माझे योगशास्त्राबद्दल अगदी मर्यादित ज्ञान वाचकांसमोर मांडू शकलो.
* आपण वाचक वर्ग – ज्यांनी मला क्षणोक्षणी उत्साह दिला. विविध प्रतिक्रिया मला सांगितल्या. जसे… ‘योगसाधना’मुळे आमच्या ज्ञानात भर पडली. फायदा झाला. आरोग्याच्या पैलूत व जीवन विकासासाठी तुम्ही लिहित रहा.
* योगसाधना शास्त्रशुद्ध का करावी याबद्दल माहिती मिळाली.
* योगशास्त्र एवढे विस्तृत आहे- हेदेखील ज्ञान झाले. आपल्याला किती मर्यादित ज्ञान आहे हे कळले.
* अनेकांनी सांगितले की त्यांनी योगतत्त्वज्ञानाची पुस्तके व ग्रंथांचा अभ्यास सुरू केला आहे. आनंदाची बातमी. त्यांना सुयश चिंतू या.
* भारतीय संस्कृती किती उच्च प्रतीची आहे .. हे समजले. संस्कृतीबद्दल, योगमहर्षिंबद्दल प्रेम व आदर वाढला.
* जागतिक योग दिवस (२१ जून) याचे ध्येय कळले- ‘सुसंवाद व शांतीसाठी योग’. विश्‍वाला या ध्येयाची किती गरज आहे याची जाणीव झाली.
…तर ही अशी वेगवेगळी मते… लहान-थोरांची, सुशिक्षित-अशिक्षितांची, स्त्री-पुरुषांची, गोवेकरांची – बाहेरील व्यक्तींची… माझ्याकडे योगसाधना शिकणार्‍यांची… मित्रांची… हितचिंतकांची…
ऐकून आनंद होतो. सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे.
आज आपण एवढ्या दीर्घ प्रवासानंतर अष्टांगयोगाच्या पाचव्या अंगावर पोचलो आहोत – ‘प्रत्याहार’. त्यासाठी थोडी उजळणी आवश्यक आहे.
‘योग’ हे एक अत्यंत उपयुक्त शास्त्र आहे. त्याच्या अनेक व्याख्या आहेत पण मुख्य म्हणजे
* ज्या शास्त्रामुळे मीलन होते तो योग. – प्राथमिक पातळीवर मन व शरीर यांचे – अत्त्युच्च पातळीवर जिवात्मा व परमात्मा यांचे.
* मुख्यतः – ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, राजयोग.
– राजयोग म्हणजेच अष्टांगयोग किंवा पतंजली योग.
योगशास्त्रावर अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. पतंजली योगसूत्रे, हठयोग प्रदीपिका, श्रीमद्भगवद्गीता तर संपूर्ण योगशास्त्रच आहे. अठरा अध्यायांची नावेच बघितली तर कळेल. आणि पूर्ण पुरुषोत्तम अवतार श्रीकृष्ण तर ‘योगेश्वर’ आहेत.
आता अष्टांगयोगाच्या आठ अंगांबद्दल थोडक्यात उजळणी करू या….
* यम-नियम-आसन-प्राणायाम-प्रत्याहार-धारणा-ध्यान-समाधी.
यांत पहिली पाच अंगे – बहिरंग योग. शरीराच्या आणि इंद्रियांच्या माध्यमाने मनाचे संवर्धन.
१. यम ः व्यक्ती व समाजासाठी सद्वर्तनाचे आदेश आहेत
अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह.
२. नियम ः स्वतःच्या आत्मशुद्धीसाठी आत्मशासनाचे आदेश.
शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्‍वर प्रणिधान.
३. आसन ः शरीराच्या वेगवेगळ्या स्थिती- शारीरिक व मानसिक.
४. प्राणायाम – प्राणशक्तीवर नियंत्रण.
५. प्रत्याहार – उपभोगाच्या विषयांपासून इंद्रियांवर नियंत्रण व त्यांचा सांभाळ.
तद्नंतर येतो तो दुसरा विभाग.
* अंतरंग योग – मनाचाच उपयोग करून मनावर नियंत्रण. यात तीन अंगे.
६. धारणा ः चित्ताची स्थिरता. यात दोन विभाग – बाह्य धारणा व अंतर्धारणा
७. ध्यान ः चित्त एकाग्रता.
८. समाधी ः चित्ताची एककारता (स्वरूपकता) – ही अत्त्युच्च पायरी आहे जी अगदी मोजक्याच योगसाधकांना जमते. उदा. स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्‍वर.
आपला नवा विषय… सुरू होतो तो म्हणजे ‘प्रत्याहार’.
– उपभोगाच्या विषयांपासून इंद्रियांवर नियंत्रण. इथे दोन मुख्य मुद्दे आहेत…
* उपभोगाचे विषय * इंद्रिये.
इंद्रियांचा वापर करून विषयांचा उपभोग घ्यायचा. पण या ठिकाणी अभिप्रेत आहेत – सुयोग्य उपयोग व इंद्रियांवर नियंत्रण.
इंद्रिये मुख्यतः दोन गटात आहेत.
१) ज्ञानेंद्रिये – ज्यांमुळे आम्हाला सभोवतालच्या विश्‍वाचे ज्ञान होते.
– डोळे (रूप), कान (शब्द), नाक (गंध), जिभ (रस), त्वचा (स्पर्श)
२) कर्मेंद्रिये – ज्यांच्या मदतीने आपण आपले शारीरिक कार्ये करतो.
इथे मुख्य मुद्दा म्हणजे ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये. सृष्टीकर्त्याने आम्हाला जगाचा अनुभव व उपभोग घेण्यासाठी इंद्रिये अवश्य दिली आहेत. पण त्यांचा व्यवस्थित, मर्यादित व सुयोग्य उपयोग अभिप्रेत आहे. त्यांच्यावर संपूर्ण नियंत्रण अपेक्षित आहे. योग्य वापर केला असता हे भगवंताचे विश्‍व किती सुंदर व आल्हाददायक आहे याची अनुभूती येते आणि स्वतःला पाहिजे तशी अज्ञानामुळे किंवा विपरीत ज्ञानाप्रमाणे इंद्रिये वापरलीत तर त्या व्यक्तीला व समाजाला भयानक परिणाम भोगावे लागतात. मानवाला स्वतःला विविध त्रासदायक रोग होतात पण विश्‍वाचा नाश होतो.
सध्याच्या जगात चौफेर नजर फिरवली तर हा मुद्दा कुणाही सामान्य माणसाच्या लक्षात येईल. त्यासाठी फार काही सखोल अभ्यास करण्याची जरुरी नाही.
कठोपनिषदात योगाची एक सुंदर व्याख्या आहे… इंद्रियांच्या संदर्भात….
* तां योगमिती मन्यते स्थिराम् इंद्रिय धारणम् (कठोपनिषद २.५४)
– ज्या स्थितीत सर्व इंद्रिये व मन स्थिर असतात ती स्थिती म्हणजे योग.
इंद्रियांचा सदुपयोग अवश्य करावा पण सद्सद्विवेकबुद्धी वापरून.
याच्या उलट दुसरे काही हट्टी लोक आहेत जे इंद्रियांचा उपयोग उपभोगासाठी करतच नाहीत. स्वतःवर फार मोठी व भयानक अशी बंधने घालतात. त्यामुळे त्यांना अनेक कष्ट भोगावे लागतात व आरोग्यदेखील बिघडते.य उदा. नदीच्या थंड पाण्यांत झोपून किंवा एका पायावर उभे राहून ध्यान करणे.
– जेवणखाण्यावर नको असलेले नियंत्रण. कधी कधी अनेक काळपर्यंत उपवास.
– कुंभमेळ्याच्या दिवसांत मोठ्या काट्यांची गादी करून त्याच्यावर झोपणे. (मी काही तथाकथित साधूंचे फोटो बघितले होते.)
…. सारांश काय तर शरीराला जास्तीत जास्त कष्ट देणे आणि त्याला ‘तप’ गोंडस नाव देणे. अशा व्यक्ती स्वतःला देवाचा फार मोठा भक्त मानतात. ते म्हणतातदेखील की असे केल्याने त्यांना भगवद्प्राप्ती होईल व लगेच मोक्ष मिळेल.
मी कुणावर टीका करत नाही, पण अनेक महापुरुषांच्या जीवनाचा अभ्यास केला तर त्यांच्या जीवनात अशी टोकाची भूमिका दिसत नाही. थोडक्यात काय… तर जीवनात अपेक्षित आहे तो ‘सुवर्णमध्य!’ हा साधायचा सर्वतोपरि प्रयत्न ज्ञानी व जिज्ञासू योगसाधक करतीलच. याबद्दल मला तरी खात्री आहे. फक्त अपेक्षा आहे ती म्हणजे ही झपाट्याने वाढायला हवी.