योगमार्ग – राजयोग

योगमार्ग – राजयोग

– डॉ. सीताकांत घाणेकर (योगसाधना – २६९) (स्वाध्याय – १७ ) विश्‍वाकडे चौफेर नजर फिरवली तर एक गोष्ट सहजलक्षात येईल की बहुतेक जण स्वार्थी, आत्मकेंद्री झाले आहेत. अशी दृश्ये अनेक कुटुंबात, समाजात, राष्ट्रात, विश्‍वात दिसतात. सुरुवातीला मानव फक्त ‘स्व’चा म्हणजे स्वतःचाच विचार करतो. बालपणी व तरुणपणी तो आपल्या अगदी जवळच्या नातेवाईकांचा विचार करतो. त्या नातेवाईकांत त्याचे आई-वडील, आजी-आजोबा, भावंडं… हीच असतात. तद्नंतर काका, मामा, मावशी, त्यांची मुले.. ही सगळी येतात. थोडा दृष्टीकोन विशाल झाला तर मग शेजारी, मित्र, समाज त्याच्या परिघात दिसतात. पुढे दृष्टी आणखी विस्तृत झाली तर देश, विश्‍व यांच्याबद्दल तो विचार करतो. शेवटी आणखी सद्विचार करायला लागला तर विश्‍व, प्राणी-पशु-पक्षी, निसर्ग हेदेखील त्याला आपले वाटतात. दृष्टिकोन पदोपदी असा उंचावण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत सुसंस्कार, सत्‌संगती, सद्विचार… अशा व्यक्ती अगदी थोड्याच असतात. त्यात संत, महापुरुष.. इत्यादींची गणना होते. आजच्या काळात अगदी वेगळेच दृश्य दिसते. बहुतेक मानवांची दृष्टी विशाल होण्याऐवजी संकुचित बनते. मग त्यांच्या दृष्टीचा परीघ परत एकदा लहान होऊन ‘स्व’कडेच येतो. याची उदाहरणे अनेक असतील पण रोजच्या सामाजिक व्यवहारातले उदाहरण म्हणजे कुटुंब. अनेक जण विवाह झाल्यानंतर आपल्या आईवडिलांना, भावंडांना विसरतात म्हणजे त्यांच्याशी वागण्याची त्यांची तर्‍हा बदलते. अनेकदा ते आपले अनेक वर्षांचे एकत्र कुटुंब सोडून वेगळे राहतात. याला कारणे अनेक आहेत. कधी कधी अपरिहार्य कारणांमुळे तसे राहणे आवश्यक असते. काही वेळा कुणाचा तरी स्वार्थ व आत्मकेंद्रीपणा अशा घटनांना जबाबदार ठरतो. हल्ली तर अनेक तथाकथित ‘‘चांगल्या घराण्यात’’ वडिलोपार्जित संपत्तीमुळे मतभेद असतात. अनेक वेळा कोर्टकचेर्‍या चालू होतात. घटस्फोट तर वाढतच आहेत.इथे एक गोष्ट मुद्दाम नमूद करायची म्हणजे आपसात मतभेद असतील, पण मनभेद करायचे नाहीत. यासाठीच आवश्यक आहे तो म्हणजे ‘‘भाव’’! पू. पांडुरंगशास्त्री म्हणतात- * मानवजीवनाचा दोनतृतियांश भाग भावाने भरलेला आहे. एकतृतियांश भागच भोगाचा आहे. * ‘‘भावपूर्णता’’ हे विकसित मानवाचे द्योतक आहे. आपले भावजीवन समृद्ध करणे आणि दुसर्‍याचे भावजीवन पुष्ट करणे हे भगवंताचे कार्य आहे. * अर्थ, धन अथवा वित्त जेव्हा सर्वस्व वाटते अशा काळात भावजीवन पुष्ट करून कोमेजलेल्या मानवी जीवनाला ‘‘स्वाध्यायच’’ फुलवतो. (संदर्भ ः ‘स्वाध्याय’ एक आगळे व्रत) – एषः पन्था एतत्‌कर्म – या शास्त्रीजींच्या प्रवचनांवर आधारित पुस्तकावरून… शास्त्रीजींचे हे मोजकेच शब्द अन् थोडीच वाक्ये अत्यंत अर्थपूर्ण व भावपूर्ण आहेत. त्यांच्या सांगण्यातही पुष्कळ भाव असतो. त्यांच्या स्वाध्याय परिवारात विविध ठिकाणी भाव भरलेला आहे. म्हणून ‘भाव’ ही दोन अक्षरे वेगवेगळ्या संदर्भात वापरली जातात. उदा.- * ‘भावगीत’ – अनेक स्वाध्यायी आंतरिक प्रेरणेमुळे छान छान भावगीते लिहितात. त्यात लिहिणार्‍याचे नाव नसते. कारण ते ‘कृष्णार्पण’ केलेले असते. अशी भावपूर्ण गीते भारतातील विविध भाषांमधून त्या त्या गावातील स्वाध्यायी रचतात. ही भावगीते स्वाध्याय केंद्रात किंवा स्वाध्यायींच्या बैठकीआधी गायली जातात. तीदेखील भावविभोर होऊन.. त्यातील अर्थ समजून! ती गाण्याचा हेतू हा की बाहेरून आल्यावर मनात अनेक विचार असतात. कारण मन चंचल असते. त्या मनातील भाव वाढून चित्त एकाग्रता साधण्याासाठी या गीतांचा उत्तम फायदा होतो. * ‘भावगंगा’- गावोगावी स्वतःच्या मातृभाषेत ही शेकडो भावगीते लिहिली जातात. नंतर ती स्वाध्यायींची मातृसंस्था – ‘श्री भगवद्गीता पाठशाळा’ इथे पाठवली जातात. त्यातील काही निवडक भावगीते विविध भाषेत छापली जातात- ती म्हणजे भावगंगा! * भावभक्ती – शास्त्रीजी सांगतात की भक्ती दोन तर्‍हेच्या – भावभक्ती व कृतीभक्ती भावभक्ती म्हणजे भजने, श्लोक, स्तोस्त्रे, पूजा अर्चा, तीर्थ प्रसाद… वगैरे. या सर्व गोष्टी भावाने करणे आवश्यक आहेत. फक्त कर्मकांड म्हणून नव्हे! त्यामुळे स्वतःचे व इतरांचे मन प्रसन्न होते. इथे व्यक्ती भावविभोर होणे आवश्यक आहे. संत सांगतात… ‘देव भावाचा भुकेला’ ‘मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव..’ * भावफेरी (भक्तीफेरी) – ही भक्तीतील कृतीभक्ती. या भावफेरीमध्ये इतरांना भेटायचे असते. शेजारी-पाजारी, नातेवाईक, आपल्या गावात, दूरच्या गावात, परप्रांतात, परदेशांत. या भेटण्यातसुद्धा भावच आहे. शास्त्रीजी सांगतात की हे भेटणे स्वतःचे व इतरांचे जीवन भावपुष्ट करण्यासाठी आहे. कुणी जीवनात थकलेला असेल, दुःखीकष्टी असेल, संकटे व समस्या याने ग्रासलेला असेल त्याला प्रेमाने व आत्मियतेने भेटून भगवंताचे सद्विचार देणे मुख्य आहे. त्याला धीर देऊन त्याचे जीवन भावपुष्ट करणे अभिप्रेत आहे. शास्त्रीजी प्रेमाने सांगतात की ज्यावेळी आपण दुसर्‍याला भेटतो त्यावेळी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात- आम्ही इतरांना सुधारण्यासाठी, आर्थिक मदत देण्यासाठी भेटत नाही तर फक्त भाव देण्यासाठी जातो. ते पुढे म्हणतात की आम्हीच सुधारलो नाहीत तर दुसर्‍यांना काय सुधारणार? तसेच उपदेश करणे हा आपला अधिकार नाही. तर तो महापुरुषांचा, संतांचा अधिकार आहे. आज जगभर लाखों स्वाध्यायी स्वखर्चाने गावागावात नियमितपणे फिरून स्वाध्याय करतात. स्वाध्यायी म्हणतात की यात भोजन-वेळ-खर्च त्यांचा स्वतःचा असतो. यातही भाव समजणे अत्यंत आवश्यक आहे. शास्त्रीजींनी सांगितलेले ते फक्त एक कर्मकांड नव्हे. त्यांनी स्वतः अनेक वर्षें अशा भाव-भक्तीफेर्‍या केलेल्या आहेत. केव्हा एकटे, केव्हा आपल्या पत्नीबरोबर तर कधी इतर स्वाध्यायींबरोबर! स्वाध्याय परिवाराच्या तीर्थयात्रासुद्धा या भक्तीफेरीच्या तत्त्वावर आधारित असतात. तीर्थयात्रा म्हणजे फक्त धार्मिक वा निसर्गरम्य ऐतिहासिक स्थळांना भेटी नव्हे! हा त्यांचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. खरेच, आपले स्वाध्यायी जेव्हा भावफेरी करून परत आपल्या घरी येतात त्यावेळी त्यांच्या मुखकमलावर एक तेजस्वी भाव दिसतो. ते थकलेले असले तरी त्यांच्या मनात असा एक भाव असतो- – जीवनाचे काही क्षण भगवंताना अपेक्षित अशा भगवद्कार्यासाठी देऊन आलो. माझ्या भावंडांना प्रेम-उबारा देऊन आलो. त्यांना आपल्या मानवी जीवनाची कृतार्थता वाटते. भारतातील व विश्‍वातील संतांची चरित्रे अभ्यासली तर दिसेल की त्यांनी सुद्धा हेच कार्य केले. ते लोकांचे व भगवंताचे लाडके झाले. * जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला…! पू. पांडुरंगशास्त्री म्हणूनच म्हणतात – स्वाध्याय हा भावजीवन पुष्ट करून कोमेजलेल्या मानवी जीवनाला फुलवतो. आज सर्व विश्‍वात भोगजीवनात बुडालेल्या, आत्मकेंद्री बनलेल्या आपल्या बांधवांना सद्वृत्तीकडे वळविण्यासाठी अशा स्वाध्यायांची अत्यंत जरुरी आहे.