योगमार्ग – राजयोग

योगमार्ग – राजयोग

– डॉ. सीताकांत घाणेकर
(योगसाधना – २६८)
(स्वाध्याय – १६)
विश्‍वात विविध क्षेत्रात विविध विषय आहेत. प्रत्येकविषयाचा अभ्यास प्राथमिक स्तरावर सुरू करावा लागतो. तदनंतर थोडे थोडे पायरी-पायरीने ज्ञान संपादन करून विद्यार्थी प्रगती करीतच पुढच्या पुढच्या पायरीवर चढत जातो. सुरुवातीला अनेक विषयांचा अभ्यास करावा लागतो. नंतर प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडीचा विषय निवडते. त्याच विषयाचे जास्तीत जास्त ज्ञान संपादन करून त्यात प्रावीण्य मिळविण्याचा प्रयत्न करते. आपल्या ज्ञानाप्रमाणे नोकरी, धंदा, व्यवसाय सुरू करते. पण आजच्या प्रगतिशील विश्‍वात प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान वाढतच असते. त्यामुळे चढाओढीत टिकण्यासाठी नवनवीन गोष्टी शिकाव्या लागतात. नव्या कला आत्मसात कराव्या लागतात. नाहीतर ती व्यक्ती प्रगती करू शकत नाही. सारांश- नियमित अभ्यास, ज्ञानार्जन आवश्यक आहे. अगदी तसेच जीवनविकासासाठी – व्यक्ती आणि विश्‍व दोन्हीच्या – नियमित स्वाध्याय अत्यंत जरुरी आहे. कारण जसजसे आयुष्य सरत जाते तसतशा वेगवेगळ्या समस्या मानवाला त्रस्त करतात. त्यावेळी आवश्यक ज्ञान नसेल तर मानवाला निराशा येते.
नियमित शास्त्रशुद्ध ऋषीप्रणीत ‘‘स्वाध्याय’’ केल्याने इतर अनेक सद्गुणांबरोबर एक गुण येतो तो म्हणजे * तेजस्विता!
पू. पांडुरंगशास्त्री आपल्या स्वाध्याय परिवाराला तेजस्विता या गुणाबद्दल समजावताना सांगतात-
* जो बापुडा बनत नाही, दीन बनत नाही, लाचारी करीत नाही आणि बिचारा राहत नाही तो खरा तेजस्वी!
* ‘‘नमः शान्ताय तेजसे’’- असा भगवान ज्याचा आदर्श आहे – तो खरा तेजस्वी!
* ‘तेजस्वी’ तो की जो परिस्थितीवशात् लाचार बनत नाही, विषयांचा बळी बनत नाही आणि विषयासमोर ठेंगणा ठरत नाही.
शास्त्रीजी शेवटी म्हणतात-
* स्वाध्याय याचे धडे देतो.
(संदर्भ – ‘स्वाध्याय – एक आगळे व्रत!’ – पू. पांडुरंगशास्त्रींच्या प्रवचनांवर आधारित पुस्तक- एष पन्था एतत्कर्म)
विश्‍वाकडे चौफेर नजर फिरवली तर लक्षात येईल की बहुतेक व्यक्तींमध्ये ‘तेजस्विता’ नाही. म्हणूनच त्या व्यक्ती किंवा आपल्यापैकी बहुतेकजण – बापुडे, दीन, लाचार, बिचारे आहोत.
– परिस्थितीवशात् लाचार झालेलो आहोत.
– विषयांचे बळी बनलो आहोत म्हणून विषयांसमोर ठेंगणेदेखील ठरलो आहोत.
त्यामुळेच तेजस्वी विचारांची अत्यंत गरज आहे. जगाच्या इतिहासाकडे नजर फिरविली तर अनेक क्षेत्रात अशा तेजस्वी व्यक्ती दिसतील – स्त्रिया व पुरुष, कधी कधी लहान बालकदेखील संस्कारवर्गामध्ये अशा तेजस्वी व्यक्तींच्या गोष्टी नियमित सांगितल्या तर ते प्रत्येकाचे – लहान-थोर सर्वांचे आदर्श ठरतील. ज्यांच्यावर असे संस्कार होतील त्यांना आपल्या जीवनाचे एक ध्येय मिळेल. मग ते तेजस्वी बनून प्रत्येक समस्येला, संकटाला, प्रसंगाला सहज सामोरे जातील.
हजारो वर्षांपूर्वी आपल्या ज्ञानी ऋषींनी या विविध समस्यांवर सखोल चिंतन करून योगशास्त्र मानवतेला दिले. अवताररूपात देवकीनंदन बनून श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत अर्जुनाला निमित्त करून अठरा अध्यायात अठरा प्रकारचे योग आम्हाला सांगितले. एवढेच नव्हे तर स्वतःच्या जीवनामधून या विश्‍वाच्या कुरुक्षेत्रात कसे खंबीरपणे उभे राहावे याबद्दल मार्गदर्शन केले. गीतेचा व्यवस्थित अभ्यास केला तर श्रीकृष्णांचे तत्त्वज्ञान आत्मसात होईल. तत्‌पश्‍चात विविध योगमार्ग – ज्ञान, भक्ती, कर्म, राज(अष्टांग) – शिकलो व त्याप्रमाणे आवश्यक व अपेक्षित योगसाधना केली तर ‘तेजस्विता’ हा गुण प्रत्येकाच्या वागण्यात दिसून येईल.
अनेकवेळा हे सर्व मुद्दे कळतात पण वळत नाहीत. त्यासाठीच ज्यांच्या चरित्रात ‘तेजस्विता’ हा गुण आढळतो त्यांचा अभ्यास करावा लागतो. त्यातील प्रत्येक व्यक्ती आपल्यासारखी सामान्यच होती. पण त्यांना मिळालेल्या विशिष्ट विचारांमुळे व संस्कारांमुळे ते वेगळे वाटतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी वाटते.
आपली मातृभूमी भारताच्या इतिहासात तर अनेक तेजस्वी तारे चकाकताना दिसतात. त्यात बालक, तरुण, वयस्कर, स्त्रिया… सर्वच आहेत आणि तेसुद्धा विविध क्षेत्रात- सांस्कृतिक, आध्यात्मिक, राजकीय… इत्यादी. त्यातील थोड्या व्यक्तींच्या गोष्टी जरी माहीत करून घेतल्या तर ‘तेजस्विता’ म्हणजे काय हे समजेल.
तरुणपणी चकाकणारे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे – बाळ ध्रुव! राजा उत्तानपाद व राणी सुनीती यांचा मुलगा. सावत्र आई सुरुचीने आपल्या मुलाला- उत्तमाला – राजाच्या मांडीवर बसवून ध्रुव बाळाला खाली लोटून दिले होते. दुर्भाग्याने आपली पट्टराणी सुरूची नाराज होईल म्हणून नाइलाजाने राजा स्वस्थ बसले. या घटनेत हस्तक्षेप केला नाही. खाली पडल्यावर रडणारा तो छोटा बालक ध्रुव आपल्या आईकडे गेल्यावर ती त्याला उपदेश करून व कुरवाळून सांगते- ‘‘देवाने जसे ठेवले आहे तसेच राहावे.’’ ‘देव’ हा शब्द ऐकल्यावर ध्रुव ‘देवाला कसे आणि कुठे भेटायचे…’ याबद्दल आईला मार्गदर्शन मागतो. आई सहज म्हणजे की ‘त्यासाठी जंगलात जाऊन घोर तपश्‍चर्या करावी लागते. मग देव प्रसन्न होऊन वर देतो पण ती म्हणते की लहान मुलाचे हे काम नाही!’
तेजस्वी ध्रुव कुणालाही न सांगता रात्री जंगलात जातो. त्याच्यावर अनेक संकटे, अडचणी येतात. पण देवाला भेटण्याचे ध्येय समोर ठेवून तो सगळ्यांचा सामना करतो. विष्णूला प्रसन्न करून घेतो. शेवटी अढळपद मिळवतो.
लहानपणी आई, आजी, गुरुजी शेवटी सांगायचे – हा बालक ध्रुव म्हणजेच आकाशात उत्तर दिशेला दिसणारा – तेजस्वी ध्रुव तारा!
दुसरा बालक म्हणजे विष्णुभक्त – प्रल्हाद! राक्षसराज हिरण्यकशिपू व नागकन्या कयाधू यांचा सुपुत्र. बालपणापासून आईकडून व महर्षी नारदांकडून विष्णुभक्तीचे संस्कार मिळालेला हा बालक तेजस्वी होतो. त्याला खात्री असते की भगवान विष्णू त्याचे रक्षण करतील. म्हणून अत्यंत आत्मविश्‍वासाने आपल्या स्वतःच्या वडिलांकडून होणार्‍या राक्षसी अत्याचारांचा सामना करतो. डोंगरावरून कडेलोट केला जाताना, उकळत्या तेलात टाकल्यावर किंवा होलिकेच्या मांडीवर बसताना चहूबाजूंनी आग असताना तो अगदी शांत असतो.
शेवटी या विष्णुभक्ताचा नाश होत नाही म्हणून अगदी हतबल झालेले हिरण्यकशिपू जेव्हा त्याला विचारतात, ‘तुझा देव कुठे आहे?’
शांत, तेजस्वी चेहर्‍याने प्रल्हाद उत्तरादाखल प्रतिप्रश्‍न करतो, ‘देव कुठे नाही?’
जेव्हा हिरण्यकशिपू विचारतो, ‘या खांब्यात आहे का?’ तेव्हा ती तेजस्वी वृत्ती कायम ठेवून प्रल्हाद सकारात्मक उत्तर देतो, ‘हिरण्यकशिपूने खांबावर लाथ मारल्यावर ‘नरसिंह’ प्रकट होऊन त्याचा नाश करतो.
… तर अशा या तेजस्वी व्यक्तींच्या तेजस्वी गोष्टी लहानपणी आम्हाला ऐकवल्या जात. पण काहीजण म्हणतात की या तर पुराणातल्या कथा! त्या सत्य आहेत का?
पण अशा गोष्टींची सत्यासत्यता पडताळून न पाहता त्यातील बोध महत्त्वाचा असतो. त्याशिवाय इतर गोष्टी आहेतच की – वीर अभिमन्यू, बाल शिवाजी, झांशीची राणी लक्ष्मीबाई, हुतात्मा भगतसिंह, नेताजी सुभाषचंद्र बोस…
अशी अनेक तेजस्वी व्यक्तिमत्त्वे आहेत. या अनेक घटना प्राचीन काळातील नाहीत. हल्लीच्या इतिहासातील आहेत. यांनीसुद्धा पुराणातील तेजस्वी व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास केला होता म्हणून ते तेजस्वी झाले.
‘स्वाध्यायाला’ हेच अपेक्षित आहे. म्हणूनच ‘स्वाध्यायात तत्त्वज्ञानाबरोबर छान छान गोष्टीदेखील असतात. म्हणून तो नियमित करण्यात मजा येते.