योगमार्ग – राजयोग

(योगसाधना: २६१)
(स्वाध्याय – २९)
– डॉ. सीताकांत घाणेकर
भारतातील ज्ञानी तत्त्ववेत्ते, ऋषी, महापुरुष, संत…. सर्व सांगतात…
* दुर्लभं मनुष्य जन्मः – मनुष्य जन्म दुर्लभ आहे. व्यवस्थित अभ्यास व चिंतन करून या वाक्याचा खरा खोल म्हणजे गर्भितार्थ समजायला हवा. अभ्यासानंतर मानवाला समजते की आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे. परमात्म्याकडून निघून तो सृष्टीत प्रवेश करतो. चौर्‍यांशी लाख योनीत जन्म घेऊन मग तो मनुष्य जन्म घेतो व शेवटी आपल्या कर्मानुसार विविध जन्म घेतो- कृमी, कीटक, पशु-पक्षी… या सर्व योनींमध्ये क्रमानुसार जन्माला येतो व मरण पावतो. हा क्रम भगवंताने निश्‍चित केलेला आहे. त्याचे ज्ञान मानवाला होत नाही.
ज्ञानी एवढेच सांगतात की फक्त मानव जन्मानंतर भगवंताला अपेक्षित असे सत्कर्म म्हणजे कर्मयोग केला तर तो आत्मा परत परमधामाला जाणून घेऊन त्या परमात्म्याशी एकरूप होतो. यालाच आपण मोक्ष किंवा मुक्ती असे म्हणतो. या सर्व तत्त्वज्ञानाचा सार एवढाच की माणसाने सत्कर्म करावे ज्याच्यामुळे सृष्टिकर्त्याला आनंद होईल. आपल्या अपत्याचा अभिमान वाटेल, विश्‍वातील इतर सर्वजण आनंदात राहतील व सुखी होतील. प्रत्येक जन्मात त्या आत्म्याची प्रगती होईल. शेवटी तो आपल्या आईच्या म्हणजे सृष्टिकर्त्याच्या कुशीत जाईल.
खरे म्हणजे परमेश्‍वराची व तत्त्वज्ञानातील सर्व धुरीणांची इच्छा हीच आहे. पण विश्‍वात एवढे अज्ञान व त्यापेक्षा भयानक विपरीत ज्ञान भरलेले आहे की बहुतेक जण अत्यंत आत्मकेंद्री झालेले दिसतात. सत्कर्मापेक्षा दुष्कर्मच जास्त दृष्टिक्षेपात येते. त्यामुळे सामान्य मानव गोंधळलेला, घाबरलेला दिसतो. त्याला या दुष्कर्मामुळे त्रास होतोच पण त्याशिवाय नैसर्गिक आपत्तींमुळे तो आणखी घाबरतो, जर्जर होतो.
काहीजण जे थोडे काही वाचन करतात ते मग स्वतःच्या मनाचे समाधान करून घेतात की हजारो वर्षांपूर्वी भारतीय ऋषींनी लिहूनच ठेवलेले आहे की कलियुगात असे होईलच- असत्याचा सत्यावर विजय होणार, सज्जनांना त्रास होणार, दुर्जनांचा विजय होणार… आणि शेवटी प्रलय होणार व जगाचा नाश होणार. तर काहीजण म्हणतात की भगवान विष्णू आपला शेवटचा म्हणजे दहावा अवतार कलीचा घेणार व दुर्जनांचा संहार करून सज्जनांना तारणार. अशा गोष्टी इतर अशिक्षित लोकांना सांगून त्यांचे सांत्वन करतात.
तरीही अनेक प्रश्‍न राहतात…
हे सर्व घडणार तरी केव्हा?
या घटना घडताना मानवाने मुख्यत्वे करून स्वतःला ज्ञानी, धुरीण म्हणवणार्‍यांनी गप्प बसून रहायचे का?
मानवाने काय करायला हवे म्हणजे हे दुःख, हा विनाश कमी होईल!
असे विविध छोटे-मोठे, साधे-सोपे प्रश्‍न आहेत. पण त्यांची उत्तरे मात्र फार गहन आहेत. त्यासाठीच आवश्यक आहे * स्वाध्याय *
विश्‍वातील विविध देशांतील, धर्मातील ज्ञानी व्यक्तींनी अशा कठीण घटनांवर व विषयांवर अभ्यास करून अनेक उपाय वेळोवेळी सुचवलेले आहेत. अनेकांनी त्या दिशेने अत्यंत उपयुक्त कर्मही केलेले आहे.
आपल्या राष्ट्रात भारतीय ऋषींनी या विषयावर अत्यंत उच्च कोटीचा अभ्यास केलेला आहे. संशोधन केले आहे. भारतीय तत्त्वज्ञान व संस्कृती या ज्ञानात अगदी परिपूर्ण आहे. इतर देशांतील विचार चांगले आहेतच पण भारतात जे सखोल चिंतन झाले तसे तिथे झालेले दिसत नाही. त्या तत्त्वज्ञानाचा अभ्याससुद्धा आवश्यक आहे- संपूर्ण जीवनविकासाकरिता.
वैश्‍विक स्वाध्याय परिवाराचे प्रेरणास्रोत पू. पांडुरंगशास्त्री आठवले या संदर्भात सांगतात की आपल्या मार्गदर्शनासाठी श्रीमद्भगवत्‌गीता, रामायण, महाभारत, संतांची चरित्रे इत्यादींचा अभ्यास करायला हवा.
यासाठी स्वाध्याय केंद्रातील प्रवचनांबरोबरच स्वाध्याय परिवाराची संस्था – सद्विचार दर्शन ट्रस्ट ही शास्त्रीजींच्या प्रवचनांवर आधारित विविध पुस्तकं, ग्रंथ छापत असते. तसेच दर वर्षी अभ्यास करून ‘विद्याप्रेमवर्धन’ परीक्षादेखील स्वखुशीने देता येते. सोळा वर्षांवरील कुणीही या परीक्षांना बसू शकतो.
विद्याप्रेमवर्धन हे नावच किती मधुर, गोंडस आहे! विद्येच्या प्रेमाने परीक्षा. म्हणजेच ज्ञानार्जन देखील त्याच प्रेमाने, आवडीने.
शास्त्रीजींच्या कार्यांत भारतीय तत्त्वज्ञानाचा समावेश आहेच पण पाश्‍चात्त्य व इतर तत्त्ववेत्त्यांचाही अभ्यास आहे. पण स्वाध्यायात मुख्य तत्त्वज्ञान भगवद्गीतेचे आहे. कारण शास्त्रीजींचे मत आहे की
वैश्‍विक प्रश्‍नांची उत्तरे गीतेत सापडतात.
गीता कुठल्याही एका देशासाठी किंवा संप्रदायासाठी नाही.
विश्‍वाच्या सामाजिक, राजकीय किंवा आध्यात्मिक या तीनही समस्यांची उत्तरे गीतेत मिळतात.
‘‘गीता पाथेय’’ या त्यांच्या प्रवचनांवर आधारित पुस्तकांत शास्त्रीजी म्हणतात…
* गीता भावसागरातील एक दीपगृह आहे. दीपगृहाचे स्थान जसे सागराच्या मध्ये असते तसे गीतारूपी दीपगृहाचे स्थानही महाभारताच्या मध्ये आहे. रणांगणातही गीतेच्या उत्पत्तीचे स्थान मध्येच होते. अर्जुनाचा रथ दोन सेनांच्या मध्ये उभा होता. त्यावेळी भगवंताने गीता ऐकविली. रणांगणात एका बाजूला कौरवांचे अकरा अक्षौहिणी सैन्य होते व दुसर्‍या बाजूस पांडवांचे सात अक्षौहिणी सैन्य आहे. आजच्या जगातही असेच चित्र दिसते. आपण म्हणतो, सत्यमेव जयते. पण सत्याच्या मार्गाने जायला बहुतेकजण धजत नाहीत. त्याला सामर्थ्य लागते. म्हणून शास्त्रीजी सांगतात…
‘सत्य सामर्थ्यमेव जयते|’
तसेच शास्त्रीजी हेही सांगतात की गीता हे एक दीपगृह आहे. वादळात सापडलेल्या जहाजाला दीपगृहाचा आधार असतो तसेच आजच्या विश्‍वरुपी भवसागरात विविध समस्या-संकटांमध्ये गीतेचा मानवास आधार आहे. गीतेतील अनेक वचनांचा आधार आहेच पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे म्हणजे गीताकार-पूर्णपुरुषोत्तम पूर्णावतार भगवान श्रीकृष्णांचा जास्त आधार आहे.
अर्जुनाचा मोह कसा चुकीचा आहे हे पटवून देऊन श्रीकृष्णांनी आपल्या प्रिय सख्याला धर्मयुद्धासाठी प्रवृत्त केले. दर वेळी संकटांपासून त्याचे रक्षण केले. योगेश्‍वर कृष्णच पांडवांची खरी शक्ती होती.
सामान्य मानवाला सुद्धा यापासून मार्गदर्शन व दिलासा मिळतो. पण त्यासाठी हवा नियमित स्वाध्याय! तसेच विश्‍व, राष्ट्र, संस्कृती, सृष्टीकर्ता यावर प्रेम व भगवंतावर अतूट श्रद्धा!
स्वाध्याय करता करता या सर्व गोष्टी आपोआप प्रत्येकाच्या जीवनात यायला लागतात. कुठेतरी केव्हातरी सुरुवात ही करायलाच हवी. कळत-नकळत अपेक्षित परिणाम दिसायला लागतील. (संदर्भ ः पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रवचनांवर आधारित पुस्तक – गीता पाथेय.)