योगमार्ग – राजयोग

योगमार्ग – राजयोग

– डॉ. सीताकांत घाणेकर

(योगसाधना – २५६)

(स्वाध्याय – २४)

सर्व विश्‍वांत चौफेर नजर टाकली व थोडा विचार केला तर लगेच लक्षात येईल की बहुतेक व्यक्ती जे काही भौतिक आहे त्याचीच जास्त कामना (इच्छा) करतात. त्या यादीत मुख्यत्वे करून धन-संपत्ती प्रमुख असते. त्याबरोबर सत्तेची त्यांना आवड असते. म्हणूनच ते शिक्षणही त्यासाठीच घेतात. सामाजिक कार्यही त्याच इच्छेने करतात. अगदी थोडे लोक जीवन विकासाकरिता (स्वतःच्या व इतरांच्या) कार्यरत असतात. या विकासांत आध्यात्मिक पैलू एक मुख्य असा पैलू आहे. असे कार्य करणारे फारच थोडे लोक असतात.

त्याचबरोबर असेही असतात की ज्यांना अन्य विषयात जास्त रस असतो- विश्‍व, राष्ट्र, संस्कृती, समाज… हे म्हणजे साधु-संत, महापुरुष. हे खरे सद्गुरुप्रेषित, मार्गदर्शक असतात.
आपण सर्व म्हणतो की जग बिघडले आहे. अशा व्यक्तींची समाजाला फार गरज आहे. आम्हाला भगतसिंह, शिवाजी, राणी लक्ष्मीबाई… पाहिजेत. तसेच संत ज्ञानेश्‍वर, तुकाराम, मिराबाई… पाहिजेत. दुःखाची गोष्ट म्हणजे ते शेजारच्या घरात जन्माला यावेत, आपल्या घरी नको, अशीच बहुतेकांची अपेक्षा असते. येशू ख्रिस्ताला ते मानतील. त्याचे गुण गातील. त्याच्या नावाने सर्व कर्मकांड करतील. त्याचे पुतळे बनवतील. पण ते वागले तसा कुणीही वागला तर त्यालादेखील क्रुसावर चढवतील.
अनेक वेळा या महापुरुषांचे वागणे अशा अल्प ज्ञानबुद्धीच्या लोकांना समजत नाही. किंवा ते वागणे विचित्रच वाटते. हे तथाकथित विद्वान त्यांना मूर्ख वा वेडा समजतात. असेच एक मागच्या शतकातील महापुरुष म्हणजे श्रीरामकृष्ण परमहंस- स्वामी विवेकानंदांचे गुरू!
श्रीरामकृष्णांच्या आयुष्यातील अनेक घटना अशा आहेत की त्या सामान्य माणसांच्या समजण्यापलीकडे असत. त्यांत एक म्हणजे ते आपल्या पत्नीची देवी समजून पूजा करीत! ध्यानावस्थेत अनेक गोष्टी ते बोलत. त्यांचे काही अपरिपक्व शिष्य होते. त्यांना तर या सर्व गोष्टी विचित्रच वाटायच्या. त्याशिवाय त्यांचे मित्रसुद्धा श्रीरामकृष्णांच्या अशा वागण्यावर बोलायचे.
अशा या शिष्यांची मग द्विधावस्था व्हायची. त्यांच्या मनात विचार यायचा- ‘अशा वेड्या गुरुंकडून आम्ही काय शिकणार? आमचे आयुष्य तर इथे व्यर्थ जाणार नाही ना? आणि इथे भौतिक फायदा तर काहीही नाही..!
एक दिवस त्यांना कुणीतरी म्हटले की तुम्ही श्रीरामकृष्णांनाच याबद्दल विचारा. मग त्यातील एकाने रामकृष्ण एकटेच बसले होते. त्यावेळी त्यांना धीर करून विचारलेच, ‘गुरूदेव, आपण अनेक वेळा विचित्रच वागता. या घटना आमच्या समजण्यापलीकडे असतात. काही व्यक्ती आपणास वेडे म्हणतात, हे खरे आहे काय?’
श्रीरामकृष्ण हसले आणि म्हणाले, ‘अगदी बरोबर आहे. मी वेडाच आहे. पण एक सांगा- या जगात कोण वेडा नाही? प्रत्येक व्यक्ती वेडी आहे. तुम्ही कलकत्त्याच्या मध्यभागी जाऊन पहा. प्रत्येकजण वेड्यासारखा पळतो आहे. थोडे क्षणही शांतपणे थांबायला त्यांना वेळ नाही. प्रत्येकाचे पळणे वेगवेगळ्या कारणासाठी असेल जसे कनक, कांता, कीर्ती. तसाच मीसुद्धा पळतो आहे. पण दोघांच्या पळण्यात फार फरक आहे. इतर लोक ज्यासाठी पळतात ते तात्कालिक आहे म्हणजे दीर्घकाळ टिकणारे नाही. पण ज्याच्या मागे मी पळतो आहे ते आनंदस्वरूप, शाश्‍वत आहे. आता तुम्हीच यावर चिंतन करा आणि ठरवा खरे काय ते!
अनेक संत-महापुरुषांबद्दल अशा विविध कथा आहेत. सूज्ञ व्यक्तींनी त्यातील सत्यासत्यता, शब्दप्रयोग न बघता त्याचा सार, बोध बघायला हवा. त्यातून स्वतःला काय मार्गदर्शन मिळते त्याची नोंद घेऊन त्यानुसार आचरण करणे आवश्यक आहे.
हे सर्व लिहिण्याचे एक कारण म्हणजे आम्हा स्वाध्यायींना काहीजण विचारतात, ‘स्वाध्याय करून फायदा काय? स्वाध्यायाने पैसा मिळतो का? पगार वाढतो का? कीर्ती मिळते का?’
आम्ही सांगतो, ‘नाही, यापैकी काहीही मिळत नाही. उलट आम्ही स्वतःचा ‘टाइम, टिकिट व टिफीन घेऊन जातो’.
मग काहीजण म्हणतात, ‘मग या सर्व उठाठेवी का? रिकामटेकडेपणाचे उद्योग हे सर्व!’
अशा लोकांना काय व कसे समजावणार?
– स्वाध्याय म्हणजे काय? तो कशासाठी करायचा असतो? काय मिळते ते कळण्यासाठी स्वतः स्वाध्याय करायला हवा. जशी आइस्क्रीम, रसगुल्ला कसा लागतो, किती गोड आहे या सर्व गोष्टी ते खाल्ल्याशिवाय कळत नाही, तसेच.
पू. पांडुरंगशास्त्रींच्या शब्दात सांगायचे म्हणजे – ‘स्वाध्यायाच्या दिव्य दृष्टिकोनातून क्षणभंगुर-नश्‍वर असा कोणताही फायदा कोणत्याही स्वाध्यायीला नको असतो. स्वाध्यायाने चिरंतन, शाश्‍वत लाभ होतो तो म्हणजे साधना व कार्यासाठी लागणारा उत्साह मिळतो. स्वाध्यायाने सर्वांना आशा, स्फूर्ती व धैर्य मिळते. स्वतःचा जीवन-विकास होईलच असा दृढ आशावाद निर्माण होतो.
* ‘सुख दुःखे समे कृत्वा…’
या गीता-मंत्राद्वारे स्वाध्यायींना सतत स्फूर्ती मिळत असते.
* ‘केलेले फुकट जात नाही.’
हा दृढ विश्‍वास असल्यामुळे त्यांचे अखंड धैर्य अधिकच वाढते.
हीच स्वाध्यायाची फार मोठी प्राप्ती आहे. अशा प्राप्तीची या कलियुगामध्ये विश्‍वाच्या प्रत्येक घटकाला, नागरिकाला अत्यंत आवश्यकता आहे. नाही तर तो आपल्या जीवनातील समस्यांमुळे खचून जातो. जीवन त्याला निरस वाटते. जगण्यात काही अर्थ वाटत नाही. मग त्याला विविध मानसिक व शारीरिक रोग होतात. अनेक जण व्यसनाधीन होतात. काही आत्महत्याही करतात.
आता ‘‘स्वाध्याय काय घडवून आणतो?’’- ते शास्त्रीजींच्या मतानुसार जाणून घेऊ या.
१. स्वाध्याय प्रत्येक व्यक्तीत आत्मगौरव निर्माण करतो.
२. स्वाध्याय प्रत्येक व्यक्तीला कृतीशील बनवतो.
त्यामुळे तो प्रभुकार्यासाठी निघतो. हीच त्याची प्रभुशक्ती आहे. त्या कृतीमुळेच त्याचे चारित्र्य हळुहळू घडत असते. भगवंताच्या विचारांवर एकदा प्रेम बसल्यावर तो स्थिर, गुपचूप कसा बसेल?
एरवीसुद्धा व्यवहारात ज्याच्यावर आमचे प्रेम असते त्याच्यासाठी काही तरी कार्य करण्याची आमची आंतरिक इच्छा जागृत होते आणि इथे तर प्रभुप्रेम आहे. भगवंत जसे सतत आपले काम करतो तसा स्वाध्यायी करतो. देवासारखाच तो आजन्म सोबत करतो.
प्रभुकार्य करताना त्याला नावाची, प्रसिद्धीची, कीर्तीची किंवा आभाराचीदेखील अपेक्षा नसते.
३. स्वाध्याय माणसा-माणसामधील भेदभाव दूर करतो. जात, वर्ण, संप्रदाय, पंथ… यांना महत्त्व न देता – ‘सर्व एकाच पित्याची-प्रभुची लेकरे आहोत. आपला रक्तसंबंधापेक्षा उच्च असा रक्त बनवणार्‍याशी संबंध आहे, याचा अनुभव आणून देतो. तसेच जगात जन्मलेली कोणतीही व्यक्ती हीन, क्षुद्र, अस्पृश्य नाही हे तो मानतो व इतरांना समजावतो. गीतेतील
* ‘ममैवांशो जीवलोकः|’
* ‘सर्व स्पचाहं हृदि सन्निविष्टः|’
यांचे प्रात्यक्षिक स्वाध्यायात घडते.
४. स्वाध्याय माणसाचा कार्योत्साह वाढवतो.
५. स्वाध्यायी व्यक्ती एकांतात चित्त एकाग्र करून भावभक्तीद्वारे आंतरिक विकास व समाजात फिरून बहिर्भक्तिद्वारे (कर्मयोग) स्वतःचा जीवन-विकास साधतो.
६. स्वाध्यायी कधीही निराश, हताश होत नाही. तसेच कुणीही आदर-सत्कार केला तर फुलून जात नाही. कारण तो सर्व यज्ञ योगेश्वराच्या चरणी अर्पण करतो. त्यामुळे तो उन्मत्त बनत नाही. म्हणूनच प्रभुकार्याबरोबर संसारही उत्साहाने होतो.
७. योगेश्वर कृष्ण म्हणजे स्फूर्ती, उत्साह व चैतन्य यांचा प्रवाह. स्वाध्यायी वर्ग श्रीकृष्णाची उपासना नियमित करतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीत प्राण भरलेला दिसतो. स्वाध्यायी उत्साही व चैतन्यमय असतात.
८. स्वाध्यायींना भक्ताची व्याख्या माहीत आहे.
* ‘भक्त म्हणजे जो विभक्त नाही तो’.
त्यामुळे ते भ्रामक समजुतीवर आधारलेली, अंधश्रद्धेने भरलेली, चमत्कारात फसलेली खोटी भक्ती दूर सारून प्रभु प्रेमाने मंडित अशी कृतिभक्ती करू लागतो. भक्ती ही केवळ कृती नाही तर एक वृत्ती आहे याची हळूहळू त्याला जाणीव होते. कृतीने उपासनेची सुरुवात होते. तसेच सतत श्रवणाने वृत्ती घडत असते. याचे ज्ञानही स्वाध्याय करता करता मिळते.
म्हणूनच ‘‘स्वाध्याय करण्यास प्रमाद नको!’’
(संदर्भ – एक पन्था एतत्कर्म- ‘स्वाध्याय – एक आगळे व्रत’)

Leave a Reply