ब्रेकिंग न्यूज़
योगमार्ग – राजयोग

योगमार्ग – राजयोग

– डॉ. सीताकांत घाणेकर

(योगसाधना – २५५)

(स्वाध्याय -२३)

आज विश्‍वात ज्ञानाचा फार मोठा स्फोट झाला आहे आणि तो चालूच राहणार. प्रत्येक सूज्ञ व्यक्तीला ज्ञानाची फारच आवश्यकता आहे- त्याच्या व्यवसायामध्ये, त्याच्या दैनंदिन व्यवहारात आणि विचार तरी किती?… अनेक.

ज्ञान मिळवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, तर्‍हा असतात पण मुख्यत्वे – पठण(वाचणे) व श्रवण(ऐकणे) दोन्हीची आवश्यकता आहे. तसेच या दोन्ही पद्धती चांगल्या. पण फक्त पठण केले की थोड्या वेळानंतर शब्दांची शुष्कता जाणवते. म्हणून थोडे श्रवणदेखील आवश्यक आहे. हे श्रवण करताना बोलणारी व्यक्ती दिसत नाही – उदा. रेडिओ, कॅसेट,… दिसणारे – उदा. टीव्ही, सीडी किंवा प्रत्यक्ष. यांमध्ये प्रत्यक्ष श्रवण सर्वांत चांगले असे मानतात. कारण तिथे बोलणारा आणि श्रोता यांचे चैतन्य असते. वक्ता चांगला असला तर अति उत्तम. तो आपल्या भावना वक्तव्यात घालतो किंवा विशिष्ट हावभाव करतो. तसेच त्याला श्रोत्याकडून प्रतिसादाचा थेट अनुभव मिळतो. पू. पांडुरंगशास्त्री वक्तव्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगतात- कथा, आख्यान-व्याख्यान, भाषण, स्वाध्याय. ते म्हणतात…१) कथा-आख्यान ः कथेत आणि आख्यानात मुख्यतः रसिकता, दृष्टांत, कर्णमधुरता, वातावरणाची सुंदरता व रमणीयता असते. येथे पात्रांच्या गुणानुवादाचे कथन होते. पण काही करण्याची आंतरिक इच्छा जागृत होत नाही.
‘‘विनोेदात सांगायचे झाले तर ‘कथा म्हणजे थकवा घालवण्याची जागा!’’
२) व्याख्यान म्हणजे ‘‘मुद्दे काढून केलेले विद्वत्तापूर्ण वक्तव्य, ज्याच्यात वक्त्याला ज्ञानाचा अहंगंड असतो आणि श्रोत्यामध्ये न्यूनगंड असतो. त्यामुळे येथे श्रोत्या-वक्त्याचे ऐक्य असत नाही.’’
३) भाषण – यात वर्तमान परिस्थितीचे राजकीय व सामाजिक चित्रण करण्यात येते. लोकांकडून त्याचा फायदा उठविण्यात येतो. येथेही श्रोत्या-वक्त्याचे ऐक्य असत नाही.
४) स्वाध्याय – इथे गुणानुवाद – श्रवण असते. त्याचबरोबर गुण जीवनात आणण्याचा दृढ संकल्पही असतो. अहंगंड-न्यूनगंड नसतो. तसेच कोणत्याही प्रकारच्या भौतिक फायद्याचे चित्रण नसते. माणूस स्वतःतील दोष दूर करण्यासाठी प्रयत्नशील असतो. श्रवणात येणार्‍या पात्रसृष्टीबरोबर आपणही आपल्या जीवनाची पोथी उघडून पाहावी अशी इच्छा होते. स्वतः गुणसंपन्न होण्यासाठी सत्-चरित्रांशी स्वतःची तुलना करावीशी वाटते. स्वाध्यायाची ही खास विशेषता आहे.’’
शास्त्रीजी स्वाध्यायाबद्दल पुढे सांगतात की इथे वक्ता उपदेशक नसतो तर तोदेखील साधक असतो. वक्ता बोलून व श्रोता ऐकून स्वाध्याय करतो. त्यामुळे वक्त्यात अहंगंड व श्रोत्यात न्यूनगंड निर्माण होत नाही. म्हणूनच श्रोता व वक्ता यांचे ऐक्य निर्माण होते.
स्वाध्याय केंद्रात दैवी, तेजस्वी, भावपूर्ण विचार नियमित सांगितले-ऐकले जातात. त्यामुळे जीवनातील पापें-क्षुद्रता, दैन्य, लाचारी, अकर्मण्यता, संशय इत्यादी दूर होतात. स्वाध्यायी मानतात-
* श्रुत्वा पापं परित्यजेत्‌|
* श्रुत्वा ज्ञानामृतं लभेत्‌|
ज्ञानरुपी अमृत प्राप्त करून अमृतविद्येद्वारे अस्मितायुक्त व भावपूर्ण जीवन जगण्याकडे ओढ राहते. हीसुद्धा स्वाध्यायाची फार मोठी विशेषता आहे.
पू. पांडुरंगशास्त्रींनी अष्टांगयोगातील स्वाध्याय हा एक नियम आपल्या दैवी कार्यासाठी निवडला. तरी त्यांच्या अफाट व सुंदर वैश्‍विक कार्यात तीनही योग – ज्ञान, कर्म, भक्ती – सामावलेले आहेत. या तीनही योगमार्गांचा सुरेख संगम त्यांच्या कार्यात आहे. शास्त्रीजींचे मत आहे की जीवनविकासामध्ये ही पद्धत अत्यंत आवश्यक आहे.
विविध योगसंस्था व योगसाधक केव्हा केव्हा एकच कुठलाही भाग किंवा दोन भाग आपल्या योगप्रसाराच्या कार्यासाठी घेतात. पण त्यामुळे काही अनपेक्षित समस्या प्रत्येक मानवाच्या वेगवेगळ्या स्वभावामुळे येऊ शकतात. कारण
‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ अनेक वेळा उच्च कोटीचे ज्ञानी कोरडे असू शकतात. म्हणजे फार भावनिक नसतात. म्हणूनच शास्त्रकार सांगतात-
* ‘‘ज्ञानियांच्या घरी भक्तीचा अभाव’’.
तसेच भक्तियोगी फक्त कर्मकांडातच मग्न असू शकतात. त्यामुळे ज्ञानपूर्ण भक्ती व भक्तिपूर्ण ज्ञान आवश्यक आहे. त्याचबरोबर कर्मही अपेक्षित आहे. नाहीतर अशा योगसाधकाचा स्वतःचा जीवनविकास कदाचित होऊ शकेल – जर त्यांनी ऋषींना अभिप्रेत असा या मार्गाचा अभ्यास केला तर! नाहीतर अहंकारामुळे व विपरीत ज्ञानामुळे त्यांचा प्रवास अधोगतीकडे होऊ शकतो. काही व्यक्तींच्या बाबतीत तसे घडतेही.
वरील तिन्ही योगमार्गांबद्दल वरवर वाचले तर ही गोष्ट लक्षात येत नाही पण शास्त्रीजी या संदर्भात एक सोप्पी गोष्ट सांगतात-
* ही गोष्ट फार जुनी आहे. त्याकाळी आजच्यासारखे वर्तमानपत्र, दूरदर्शन, फोन काहीही नव्हते. एका छोट्याशा खेड्यात एक मध्यवयीन विधवा बाई आपल्या तीन-चार वर्षाच्या मुलाबरोबर राहत होती. एक दिवस दूरच्या एका गावात गावातील इतर लोकांबरोबर ती जत्रेला गेली. गर्दी फारच होती. त्यामुळे ती आपल्या मुलाचा हात पकडूनच चालत होती. पण त्या गर्दीत चुकून तिचा हात सुटला आणि तो मुलगा हरवला. तिच्याबरोबर गावातल्या लोकांनी मुलाला सगळीकडे शोधला पण तिचे दुर्भाग्य! तो काही मिळाला नाही.
आपल्या नशिबाला दोष देऊन ती दिवस कंठू लागली. आधी पती वारले आणि आता मुलगा हरवला – तोही एकुलता एक आणि लहान!
दिवस-महिने-वर्षे गेली. मुलाची आठवण येतच होती. पण तो भेटण्याची शक्यताच नव्हती.
एक दिवस – दहा-बारा वर्षांनंतर ती बाई आपल्या झोपडीत बसलेली. तेवढ्यात तिचा एक नातेवाईक तिच्या घराच्या दिशेने येताना तिला दिसला. त्याच्याबरोबर एक तरुण मुलगा होता.- असेल बारा-चौदा वर्षांचा! थोडा वेळ इकडच्या-तिकडच्या गप्पा-गोष्टी झाल्या. मग त्या नातेवाइकाने त्या बाईला विचारले, ‘एक सांग, तुझा मुलगा लहानपणी हरवलेला, त्याची मग काही बातमी मिळाली का?’
बाई म्हणाली, ‘नाही रे बाबा, अजूनपर्यंत त्याचा शोध चालू आहे. पण तो काही मिळाला नाही. आता माझेही वय वाढते आहे. भगवंताकडे मी रोज प्रार्थना करीत असते की मला तो परत मिळू दे.’ त्या नातेवाइकाने तिला विचारले ‘या तरुणाला तू ओळखतेस का? त्याला केव्हा पाहिलेस का?’
बाई म्हणाली, नाही रे बाबा, मी त्याला ओळखत नाही’. मग त्याने त्या मुलाला विचारले, ‘तू या बाईला ओळखतोस का?’ त्याने नकारार्थी मान हलवली. मग तो नातेवाईक म्हणाला, ‘हे बघ ताई, तुझा हरवलेला मुलगा तो हाच!’
पण ओळख कशी व्हायची? विश्‍वास कसा ठेवायचा? नातेवाईक म्हणाला, ‘त्याच्या अंगावर काहीतरी खूण असेल.. तीळ वगैरे.’
बाईला आठवण झाली. तिच्या मुलाच्या पाठीवर एक भला मोठा काळा तीळ होता. तिने मग त्याच्या पाठीवर बघितले तर तसाच तीळ होता. पण खात्री कशी करायची?
त्या नातेवाइकाने मग तिला एका लहान मुलाचे जुने कपडे दाखवले. तेच तिच्या मुलाचे कपडे होते. तिला आठवले, ‘आता तर खात्रीच पटली.’ नातेवाइकाने म्हटले, ‘बघ, हाच तुझा हरवलेला मुलगा.’ मग तो मुलगा म्हणाला, ‘बाळा, हीच तुझी खरी आई!’
हे म्हणताक्षणी दोघांनी – आई व लेकराने – एकमेकांना मिठी मारली. दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. अनेक वर्षांनी तिची तपश्‍चर्या फळाला आली होती. तिने भगवंताचे आभार मानले.
घडलेली गोष्ट त्या नातेवाइकाने नंतर सांगितली. तो गावोगावी फिरणारा एक व्यापारी होता. त्याच्या चांगल्याच ओळखी होत्या. एक दिवस एका मोठ्या शहरात तो एका श्रीमंताकडे बंगल्यात गेला होता. तिथे एक म्हातारे जोडपे राहत होते. हा मुलगा तिथे होता. त्या दोघांना स्वतःचे अपत्य नव्हते. म्हणून त्यांनी आपल्या मुलासारखेच त्याला सांभाळले होते. ती सज्जन होती म्हणून त्यांना वाटायचे की ह्या मुलाचे आईबाप भेटले तर त्यांच्या मृत्यूच्या पूर्वी ती त्या मुलाला आईवडिलांकडे सुपूर्द करतील. पण अनेक वर्षे शोध घेऊनही ती काही भेटत नव्हती.
ही गोष्ट त्यांनी या व्यापार्‍याला सांगितली. त्यावेळी त्याला आठवण झाली की त्याच्या नात्यातल्या एका बाईचा मुलगा हरवला होता. म्हणून त्याने त्या दांपत्याला त्याबद्दल म्हटले. त्यांनी लगेच ओळखीसाठी त्या मुलाचे लहानपणातील कपडे त्याला दिले. ती दोघे त्या जत्रेसाठी गेली होती. तिथे हा लहान मुलगा त्यांना भेटला. त्याचा नातेवाईक कुणीही भेटला नव्हता. म्हणून त्यांनी या मुलाला आपल्या घरी आणले होते.
आता या गोष्टीचा ज्ञान-भक्ती-कर्म या योगमार्गांशी संबंध काय ते बघुया..
* जोपर्यंत ती भगिनी व तो तरुण मुलगा यांना ज्ञान नव्हते की ती एकमेकांची कोण आहेत तोपर्यंत त्यांचा भाव जागृत झाला नव्हता. त्यामुळे त्याच्याकडून काही कृती घडली नाही. पण ज्यावेळी ज्ञान झाले की त्यांचे आई-मुलाचे नाते आहे त्याक्षणी परस्परांबद्दल त्यांचा भाव जागृत झाला व त्यांच्याकडून कृती(कर्म) घडले.
आणि तीदेखील सहज व भावपूर्ण!
तसेच मानवाला ज्ञान व्हायला हवे की त्याचे आणि भगवंताचे नाते काय आहे ते. म्हणजे लगेच भाव जागृत होणार व तो कर्मप्रवृत्त होणार.
या छोट्याशा गोष्टीच्या माध्यमातून पांडुरंगशास्त्री आठवले एक महान तत्त्व आमच्यासारख्या सामान्यांना समजावतात. हीच तर अशा महापुरुषांची महत्ता आहे.
त्यामुळे स्वाध्याय केंद्रात नियमित येऊन अशा ज्ञानपूर्ण व भावपूर्ण गोष्टी ऐकाव्यात म्हणजे जीवनाचे तत्त्वज्ञान समजते व जीवनविकासाकडे आपली वाटचाल सुरू होते.

Leave a Reply