योगमार्ग : राजयोग

योगमार्ग : राजयोग

– डॉ. सीताकांत घाणेकर

(योगसाधना – २५३)

(स्वाध्याय – २१)

संत कबीर म्हणतात-

‘‘रसरी आवत जातते, सिलपर पडत निसान,
करत करत अभ्यास के, जडमति होत सुजान’’
या महान महापुरुषाच्या दोनच पक्तींमध्ये महान तत्त्वज्ञान दिसते. प्रत्येक शब्द इथे फारच अर्थपूर्ण आहे. म्हणूनच फक्त या दोन ओळी वाचून-ऐकून भागत नाही. तर त्यांचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा.
पूर्वीच्या काळात भारतातील प्रत्येक गावांत-शहरात विहिरी होत्या. सर्वजण तिथूनच पाणी घेत. आज अनेक ठिकाणी नळाचे पाणी मिळते. त्यामुळे विहिरींचे पाणी तेवढे जरुरी नाही. उलट गावातला कचरा अनेक जण त्या विहिरीत टाकतात. त्या पाण्याला आता तेवढे महत्त्व नाही. पाणी देखील दूषित झालेले. फक्त नळाचे पाणी येत नाही तेव्हाच त्या विहिरीची आठवण होते.इथे मुख्य संदर्भ म्हणजे विहिरीचे पाणी कळशी वापरून राजूने काढत होते. अनेकवेळा विहिरीच्या काठांवरील दगडांवर घर्षणामुळे एक निशाण उमटत असे. एरवी दगड घट्ट असतो. पण नियमित घर्षणामुळे अनेक दिवसांनंतर त्याच्यावर निशाण उमटते. कबीरांना तेच सांगायचे आहे- राजूने परत परत घर्षण झाल्यामुळे दगडावर देखील जसे निशाण पडते, तसेच अभ्यास नियमित केल्याने ज्याची मति जड आहे – म्हणजे बद्धि कमी आहे- तो देखील सुजाण म्हणजे ज्ञानी होऊ शकतो.
अगदी हाच मुद्दा स्वाध्यायाला देखील लागू होतो. म्हणूनच तत्त्ववेत्ते म्हणतात,
‘‘स्वाध्यायान्मा प्रमदः’’
– स्वाध्याय करण्यास आळस करू नका.
स्वाध्यायकेंद्रात दर आठवड्याला एक विशिष्ट दिवस व वेळ(एक तास) स्वाध्यायी एकत्र येतात-नित्य-नियमाने. हा शब्द ‘नित्य – नियम’ देखील नित्य व नियमिततेचे द्योतक आहे. थोडा जरी विचार केला तर लगेच लक्षात येईल की सर्व निसर्ग नित्यनियमानेच चालतो. सूर्य. चंद्र, तारे वेळेवर उगवतात-मावळतात. सर्व ऋतू व्यवस्थित येतात. पावसाळा-हिवाळा-उन्हाळा ठरल्याप्रमाणे येतो. वृक्ष आपल्याला नेमून दिलेल्या नियमाप्रमाणे फुले-फळे देतात. कृमी-कीटक पशु-पक्षी देखील कार्यरत असतात. आता हल्लीच्या वर्षांत निसर्गात फार वाईट बदल झालेले आहेत याचे कारण म्हणजे स्वतःला अत्यंत हुशार व बुद्धिमान मानणारा मानव निसर्ग नियमांचे पालन करण्याचे सोडाच उलट त्याच्या विरुद्धच वागतो. याचे महाभयंकर प्रायश्‍चित्त त्याला भोगावेच लागते- वादळ, भूमीकंप, दुष्काळ, पूर….
सारांश, सर्व काही नित्य व नियमाने चालले तर अपेक्षित फळ येतेच आणि हे ज्ञान फक्त एकट्या-दुकट्याला फक्त संत-महापुरुषांना असून उपयोगी नाही तर अनेकांना किंवा त्यापेक्षा सर्वांना असणे आवश्यक आहे. तरच सर्व मानवजात सुविचारी-सज्जन बनून त्याप्रमाणे आचरण करील व विश्‍व विकासाकडे वाटचाल करील- आजच्यासारखी विध्वंसाकडे नाही. त्याचमुळे मानवाने एकत्र येणे आवश्यक आहे आणि तेदेखील नियमित.
मानव हा असा प्राणी आहे की सहसा तो एकटा राहू शकत नाही. त्याला बहुतेकवेळा कुणीतरी बरोबर लागते म्हणून त्याला सामाजिक प्राणी म्हणतात. पण दुसरा आला की त्याला भीती वाटू शकते- बहुतेकवेळा ती व्यक्ती अनोळखी असेल तर!
शास्त्रकार याबद्दल एक छान श्लोक सांगतात-
‘‘न एकाकि रमते, द्वितीयात वै भयं भवति|’’
– माणूस एकटा रमत नाही आणि दुसर्‍याची त्याला भीती वाटते. याचे मुख्य कारण म्हणजे दुसर्‍यावरचा विश्‍वास. मानवाचा स्वभावच असा आहे की कोण कसा केव्हा वागेल याची खात्रीच देता येत नाही. व्यक्ती आत्मकेंद्रित झाल्यामुळे कोण कुणाचा केव्हा विश्‍वासघात करेल याची खात्री नाही. इतिहासातील अनेक घटना याची साक्ष आहेत. मग ते नातेवाईक असू देत किंवा परकी असू देत. अगदी पती-पत्नी, पालक-मुले, भाऊ-भाऊ…देखील स्वार्थांध होऊन दुसर्‍यांचे अहित करतात. हल्लीतर संस्कारहीन समाजात अशा घटना वाढतच आहेत.
पू. पांडुरंगशास्त्री आठवले याबद्दल स्वतःचा एक गंमतीदार अनुभव सांगतात. एक दिवस ते एकटेच अहमदाबादहून मुंबईला रात्रीच्या गाडीत जायला निघाले होते. त्यांचा निरोप घ्यायला काही स्वाध्यायी आले होते. शास्त्रीजींचे सामान वगैरे ठेवून झाले. गाडी सुटण्याची वेळ झाली. पण डब्यात ते एकटेच होते. आणखी कुणीही सहप्रवासी नव्हते. ते बघून एक स्वाध्यायी म्हणाला, ‘‘दादा, तुम्ही डब्यात एकटेच आहात, सांभाळा हं!’’
तेवढ्यात त्या डब्यात आणखी एक व्यक्ती घाईघाईने चढली. गाडी सुटायची वेळ झाली. तेवढ्यात त्या व्यक्तीकडे बघून दुसरा स्वाध्यायी म्हणाला, ‘‘दादा, त्या व्यक्तीपासून सांभाळा ह!’’
आपले हे असेच होते. बरोबर कुणी नसला तरी पंचाईत आणि असला तर अडचण!
स्वाध्यायींची दादांबद्दल ही आपुलकी बघून दादा त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही चिंता करू नका. भगवंत माझ्याबरोबर आहे.’’
आज लाखो स्वाध्यायी याच विश्‍वासाने जीवन जगत आहेत.
शास्त्रीजी म्हणतात-
‘‘इच्छेला सदिच्छा बनविण्याकरिता स्वाध्यायासाठी एकत्रित झाले पाहिजे. या सदिच्छेच्या परिणामामुळे माणूस वैयक्तिक जीवनात दीन, लाचार, बनत नाही. कोणाचा मिंधा राहत नाही. बापुडा राहत नाही, स्वार्थी बनत नाही. परिस्थितीसमोर नमत नाही. तसेच परावलंबी जीवन जगत नाही. तो मस्तीत जगतो. आत्मगौरवाने शोभणारे त्याचे जीवन अस्मितायुक्त व भावपूर्ण असते. त्याचप्रमाणे सदिच्छेमुळे तो स्वतःच्या सामाजिक जीवनात कोणते वाईट चिंतीत नाही, करीतही नाही. शक्य असेल तेवढे भलेच करतो आणि सत्ला, प्रभूला केंद्रबिंदू मानून त्याचे काम करू लागतो.’’
‘‘दीर्घकाळ आणि निरंतर केलेल्या स्वाध्यायाच्या अभ्यासाद्वारे सदिच्छा दृढ होते. त्याचप्रमाणे भक्तिद्वारे, प्रभुवरील विश्‍वास वाढतो. सदिच्छेचे रुपांतर ‘यदृच्छे’त होऊ लागते. गीता कथित यदृच्छा म्हणजे भक्तीचा परीपाक- जिच्यात केवळ ईश्‍वरावरील दृढतम व अनुपमेय विश्‍वासाचे दर्शन घडते.’’-(एषः पन्था एतत्‌कर्म – पुस्तकावरून…)
एका महापुरुषाचे विचार इतके उच्च असणे शक्य असते. त्याचे वर्तनही तसेच असणे स्वाभाविक आहे. पण ज्यावेळी आमच्यासारखे सामान्य लोकही अशा सुविचारांनी प्रभावित होतात तेव्हा ती गोष्ट खरेच प्रशंसनीय आहे.
शास्त्रीजींच्या स्वाध्याय परिवारामध्ये अशा अनेक घटना, भावप्रसंग घडलेले आहेत व नियमित घडत आहेत.
गुजरातमधील एका डोंगरावर आदिवासी राहतात. तिथे इतर गावातील काही स्वाध्यायी नियमित अनेक वर्षें जातात. त्यांच्या जीवनात पुष्कळ चांगले बदल झाले. ही बातमी शहरातील एका वर्तमानपत्राच्या वार्ताहराला कळली. तो त्या गावात गेला. वाटेतच त्याला तिथे काही मुले श्लोक म्हणताना भेटली. ही अशिक्षित जमात आणि इथे ही मुले संस्कृत श्लोक म्हणतात ते पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्यातील एका मुलाने अनेक श्लोक शुद्ध संस्कृत भाषेत म्हटले. त्या वार्ताहराला फार आनंद झाला. त्याने लगेच दहा रुपये काढले व त्याला बक्षीस म्हणून देऊ केले. त्या मुलाने नमस्कार करून नम्रपणे सांगितले, ‘‘काका, आम्ही अशी बक्षिसे घेत नाहीत. राग मानू नका.’’
एरवी शहरात बक्षिसासाठीच मुले श्लोक म्हणतात. त्याला ही गोष्ट वेगळीच वाटली. तो म्हणाला, ‘मला तुझ्या वडिलांना भेटायचं आहे. कुठे भेटतील?’
त्या मुलाने आपल्या झोपडीत त्या वार्ताहराला नेले व त्याची व वडिलांची भेट घालून दिली. त्या वार्ताहराने मुलाचे कौतुक केले व बक्षिसाचे दहा रुपये वडिलांना देऊ केले. इथेही त्याला आश्‍चर्याचा धक्का बसला. वडिलांनी नमस्कार केला व तसेच नम्रपणे नकार दिला. पण वार्ताहर आग्रहच करायला लागला. तो म्हणाला, ‘मी स्वखुशीने हे बक्षीस देत आहे, मग घ्यायला काय हरकत आहे?’ परंतु वडिलांनी पैसे काही घेतले नाहीत. उलट म्हणाले, ‘‘भाऊ, तुम्ही बक्षिस स्वखुशीने देता हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. पण आमच्या पुढील पिढीला कळले की असे श्‍लोक म्हणून सहज पैसे कमवता येतात तर ते कष्टच करणार नाहीत. ते फक्त श्‍लोक म्हणून भीक मागतील. भारतात असे अनेकजण आहेत जे अशी भीक मागतात. आमच्यातील काही लोकही असे करत होते. पण अनेक वर्षे स्वाध्यायी आमच्या गावात नियमित येतात. त्यांनी आम्हाला आत्मसन्मान शिकवला. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका.’’
वार्ताहराला त्याचे म्हणणे पटले. तो तिथून निघून गेला. अशा घटना माहीत झाल्या की विश्‍वास बसत नाही. पण नियमित स्वाध्यायाने या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. ते स्वाध्याय करण्यास आळस करत नाहीत.

Leave a Reply