योगमार्ग – राजयोग

0
153

– डॉ. सीताकांत घाणेकर

(योगसाधना – २५२)

(स्वाध्याय – २०)

भगवंताने निर्माण केलेल्या विश्‍वात अनेक तर्‍हेचे कृमी-कीटक, पशू-पक्षी, प्राणी-जनावरे… आहेत. त्यातलाच एक प्राणी- मानव. पण मानव आणि इतरांत फरक हा की मानवाला देवाने बुद्धीचे वरदान दिलेले आहे. हेतू हा की त्याने विचार करावा, चिंतन करावे. सृष्टीचे, जीवनाचे, सृष्टिकर्त्याचे गुह्य शोधावे. त्याने सज्जन, सुसंस्कृत असावे. त्याने आपली हुशारी स्वतःच्या व इतरांच्या जीवनविकासासाठी वापरावी. स्वतःला जे सर्व वैभव मिळाले याबद्दल सूक्ष्म अभ्यास करावा. असा अभ्यास विश्‍वातील अनेक तत्त्ववेत्त्यांनी केला आणि आजही करताहेत. या सर्वांत पहिला विचार म्हणजे स्वाध्याय – स्वतःबद्दल अभ्यास. हा अभ्यास आयुष्यभर करावा.

स्वाध्याय आपल्या जीवनात उतरविणारे अनेक महापुरुष आहेत. त्यातील काही इतरांनाही स्वाध्याय करण्यास प्रवृत्त करतात. त्यातील एक महापुरुष म्हणजे स्वाध्याय परिवाराचे प्रेरणास्रोत पू. पांडुरंगशास्त्री आठवले. सखोल चिंतन करून त्यांनी स्वाध्याय सामान्य लोकांसाठी अगदी सोपा बनविला आहे. म्हणून या परिवारात सर्व स्तरातील लोक आहेत- श्रीमंत-गरीब; लहान-मोठे; तरुण-प्रौढ; महिला-पुरुष… स्वाध्यायी कुठल्याही भौतिक लाभाची अपेक्षा न ठेवता एकत्र येतात व जीवनविकास म्हणजे नक्की काय हे नियमित समजून घेतात. त्यात प्रामुख्याने चार गोष्टी येतात- १. ऐकणे, २. भेटणे, ३. विचार करणे आणि ४. सोडणे.
मानवाला ज्ञान प्रामुख्याने दोन प्रकारे मिळते- ऐकणे व वाचणे (सत्‌श्रवण व सत्‌पठण). अनेक वेळा आपण ज्ञान मिळवतो व नंतर ते विसरून जातो. म्हणून त्या ज्ञानाबद्दल विचार करणे अत्यंत आवश्यक आहे (सत्‌चिंतन). पण तेवढ्याने प्रक्रिया संपत नाही. ते ज्ञान दृढ होण्यासाठी कुणाला तरी सांगायला हवे (सत्‌कथन). असे नियमित केल्याने मानवाचे चारित्र्य घडते (सत्‌चारित्र्य). म्हणूनच कुणालातरी सांगायचे झाले तर भेटणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विकार-वासना-अहंकार या गोष्टी ज्या मानवी विकासाच्या आड येतात त्या सोडणेदेखील आवश्यक आहे, असे करून स्वाध्यायाची प्रक्रिया पूर्ण होते.
अज्ञानी मानव फक्त शरीर व त्याच्या गरजा, आपला संसार याबद्दलच दररोज विचार करतो. एका मर्यादेपर्यंत ही गोष्ट ठीक आहे. पण त्याची प्रगती होणे आवश्यक आहे. शरीरापासून सुरुवात करून मन-बुद्धीपर्यंत पोचणे प्रथमावस्थेत अपेक्षित आहे. तदनंतर जसजशी व्यक्तीची प्रगती होते तसतशी वरची पायरी म्हणजे आध्यात्मिक अनुभव येतात. म्हणूनच न चुकता अभ्यासाची नितांत गरज असते.
अनेकांना ‘आध्यात्मिक’ म्हणजे ‘धार्मिक’ असे वाटते. याचे कारण अध्यात्माचा खरा अर्थ त्यांना माहीत नसतो. अध्यात्म – ‘आत्मनि अधि इति अध्यात्म’. या व्याख्येचा अभ्यास केला म्हणजे कळते की यात आत्म्याचा अभ्यास अपेक्षित आहे. पण आत्मा तर अतिसूक्ष्म आहे. वरवर विचार करता त्याचा ठाव सामान्याला लागत नाही.
पू. पांडुरंगशास्त्री समजावून सांगतात- ‘‘आपल्यामधील वासना, विकार, भावना यांचा विचार करून त्यांना प्रभुप्रेमाकडे वळवून त्यांचे उदात्तीकरण (सब्लिमेशन) करून अंतर्मुख होऊन जो आतील हत्यारे तयार करतो त्याला अध्यात्माचा पथिक म्हणतात’’.
‘धार्मिक’ पैलूत कर्मकांडावर जास्त भर असतो. त्याचीही आवश्यकता असते. अध्यात्म प्रत्यक्षात आणण्यासाठी सुरुवातीच्या पायरीत त्या कर्मकांडाची गरज असते. पण ‘धर्म’, ‘धार्मिकता’ म्हणजे काय हे समजायला हवे. नाहीतर आजकाल ही गोष्ट न समजल्यामुळे धार्मिक तेढ वाढतेच आहे.
खरा आध्यात्मिक धार्मिकदेखील असेल. पण तथाकथित धार्मिक आध्यात्मिक असेल याची खात्री नाही. खरा ज्ञानी धार्मिक मात्र आध्यात्मिक असेल.
अनेक वेळा आपण ‘प्रेम’ हा शब्द वापरतो- पण खरा सूक्ष्म अर्थ न समजल्यामुळे तो गुळगुळीत झालेला आहे. अज्ञानामुळे विविध व्यक्ती विविध अर्थाने तो शब्द उच्चारतात. त्यात भौतिकतेवरच जास्त भर असतो. अनेक गैरसमज उद्भवतात. पण जीवनविकासासाठी प्रेम अत्यंत आवश्यक आहे… सर्वांवर प्रेम… प्रभू, सृष्टी, प्राणी… प्राण्यांवरच्या किंवा मानवा-मानवामधील प्रेमावर बोलताना ‘आत्मीयता’ हा शब्द जास्त सयुक्तिक वाटतो. यात आत्मिक प्रेमाचा जास्त प्रादुर्भाव आहे. फक्त शारीरिक किंवा भौतिक प्रेम नाही.
स्वाध्याय केंद्रात एकाच प्रभूची लेकरे समजून सर्व स्वाध्यायी एकत्र येतात. स्थूल लाभालाभ हा विचारच नसतो तिथे. त्यामुळे व्यक्तीमध्ये कसल्याही द्वंद्वाला जागा नसते. सर्वांगीण जीवन-विकास या विचारालाच प्राधान्य असते आणि तो फक्त स्वतःचाच नाही तर इतरांचा सुद्धा! सर्व स्वाध्यायी आध्यात्मिक स्तरावर प्रभू प्रेमाच्या तंतूने एकत्र बांधलेले असतात. विविध प्रवृत्तीच्या व्यक्ती एकत्र आल्यामुळे वेगवेगळी मते अवश्य असतात. पण मताग्रह नसतो. त्यामुळे ‘‘मर्ङ्गीश्र तभेद’’ असले तरी ‘‘मनभेद’’ अपेक्षित नाहीत. त्यासाठी क्रोध, मद, मत्सर या षड्‌रिपूंना इथे जागा नसते.
स्वाध्यायासाठी स्वाध्याय केंद्रात विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळी (ठरलेला एक तास) यायचे म्हणजे त्यावेळी संसाराच्या विचारांना बंदी. जीवनविकासाचाच विचार ऐकायचा व करायचा.
शास्त्रीजी सांगतात-
* जीवनात सुख मिळाले तर तो प्रभुप्रसाद आहे असे स्वाध्यायींना वाटते. प्रभूचे सतत स्मरण राहते. प्रभुकार्यासाठी अधिक झिजण्याची त्याला चुटपुट लागते. दुःखात प्रभू आठवतो कारण तो जागृत करतो, सावध करतो, काळजी वाहतो असे वाटते. निराशा कोठेच अनुभवाला येत नाही. निष्फलता कधीच स्पर्श करीत नाही. जीवन रसमय बनते. शेवटी स्वाध्यायात बसल्यानंतर व्यवहारी वृत्ती, स्थिती, अधिकार, स्थान विसरून जायचे असते.
– सर्व एकाच पित्याची – प्रभूची – लेकरे आहोत असे समजून आध्यात्मिक अभ्यास करायचा असतो.
अशा सर्व गोष्टी वाचल्या किंवा ऐकल्या की मनात सहज विचार येतो की या सर्वांची अत्यंत आवश्यकता आहे. पूर्वकाळापासून गरज होती पण आजच्या यांत्रिक युगात जास्त गरज आहे. पण असे घडते का?
हो! जरूर घडते. पण शास्त्रीजींच्या कार्यांत या गोष्टी जाहीरपणे छापल्या जात नाहीत. त्यांच्या ‘तत्त्वज्ञान’ या मासिकामध्ये ‘भावप्रसंग’ या सदराखाली छापल्या जातात तर अशीच एक घडलेली गोष्ट…
तिथे पारधी जमातीतील लोक राहतात. पुरुष शिकार करतात किंवा चोर्‍या करतात. महिला गावात जाऊन भाजी विकतात. या महिला एवढ्या चतुर असतात की भाजी मोजताना आपल्या बोटांची अशी काही हालचाल करतात की त्या भाजीचे वजन ५० ते १०० ग्रॅम कमीच भरते. ही गोष्ट त्या अभिमानाने सांगतात की कितीही सुशिक्षित किंवा हुशार व्यक्तीने भाजी विकत घेतली तरी आम्ही फसवतोच.
ही झाली पूर्वीची गोष्ट. आता तिथे स्वाध्यायी विचार पोचले. जीवनविकासाची कल्पना आली. आता चित्र वेगळे आहे.
एक दिवस एका सुशिक्षित माणसाने म्हणे त्या भाजी विकणार्‍या बाईला म्हटले की वजन बरोबर करा. उगाच गिर्‍हाइकांना फसवू नका. तर ती बाई म्हणते – साहेब, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पिढ्यान्‌पिढ्या आम्ही गिर्‍हाइकांना फसवतच होतो. आमच्यावर संस्कार नव्हते. पण आता आम्हाला स्वाध्यायी आमच्या गावात येऊन सर्व गोष्टी समजावतात. त्यामुळे आता आम्ही कुणालाही फसवत नाही. आम्ही तर प्रामाणिक झालोच पण आमची नवीन पिढीसुद्धा तशीच वागते. ते संस्कारी झालेत.
हे ऐकून त्या माणसांना आनंद झाला. पण लगेच ती भाजीवाली म्हणाली, पण साहेब कदाचित आमची पिढी आमच्याकडून माल विकत घेणार्‍याला विचारील की साहेब, तुम्ही जो पैसा आम्हाला मूल्य म्हणून द्याल तो स्वकष्टाचा आहे ना?
खरेच, या गोष्टी ऐकतो, वाचतो तेव्हा विश्‍वासच बसत नाही. पण विश्‍वास ठेवा, असं घडतंय. सहज नाही. त्यासाठी शास्त्रशुद्ध स्वाध्याय करायला हवा.
ज्यांना वाटते की भगवंताचे विश्‍व चांगले व्हावे त्यांनी अशा मार्गावरून अवश्य जावे. (पू. पांडुरंगशास्त्री यांच्या प्रवचनांवर आधारित ‘‘एषः पन्था एतत्कर्म’’ या पुस्तकावरून काही भाग).