युवराज सिंग निवृत्त

टीम इंडियाचा अष्टपैलू युवराज सिंग याने काल आंतरराष्ट्रीय क्रिकेट व आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली. हा कटू निर्णय जाहीर करताना त्याचे डोळे पाणावले होते. नेटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात मिळवलेला विजय, लाहोरमध्ये ठोकलेले शतक, वर्ल्ड कपमध्ये केलेली कामगिरी या आयुष्यभर पुरणार्‍या आठवणी असल्याचे तो म्हणाला. स्वत:वर विश्वास असेल तर तुम्ही जे अशक्य आहे ते ही साध्य करू शकता असा मूलमंत्र युवीने तरूणांना दिला आहे. आपल्या कारकिर्दीत युवराजने टीम इंडियासाठी मोठे योगदान दिले आहे. एकाच षटकात सलग सहा षटकार ठोकणारा तो फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. टीम इंडियाला २०११ मधील वर्ल्डकप जिंकून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. या स्पर्धेत युवराज मालिकावीर ठरला होता तसेच तसेच चार सामन्यांमध्ये तो सामनावीर देखील ठरला होता. पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकलेल्या भारतीय संघातही युवराजचा सहभाग होता.

युवराज गेल्या दोन वर्षांपासून भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी झगडत होता. पण त्याला संधी मिळाली नाही. नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेतही त्याला फारशी चमक दाखवता आली नव्हती. आयसीसीची मान्यता असलेल्या परदेशातील टी-२० लीगमध्ये खेळण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणे अनिवार्य असल्यामुळे युवराजने निवृत्तीचे पाऊल उचलल्याचे मानले जाते. युवराजला कॅनडातील जीटी २० आणि आयर्लंड व हॉलंडमधील युरो टी-२० स्पर्धेत खेळण्याचे आमंत्रण मिळाले आहे. युवराजने ४० कसोटी सामन्यांत ३३.९२च्या सरासरीने १९०० धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये युवीच्या नावावर ३०४ सामन्यांत ३६.५५च्या सरासरीने ८७०१ धावांची नोंद आहे. आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटीमध्ये युवीने ११७७ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवीच्या नावावर १४८ बळींचीदेखील नोंद आहे.