युवकांसाठी ‘आय्‌टीआय्’ ः उत्तम पर्याय

  • विद्या म्हाडगूत
    (फोंडा)

१०वी, १२वीचे निकाल आता जाहीर होणार आहेत. जे विद्यार्थी जेमतेम पास होतात किंवा ज्यांना शिक्षणात रुची नाही त्यांना आयटीआय (इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) पर्याय असू शकतो. यात विविध प्रकारचे अभ्यासक्रम असतात. एक-दोन वर्षांचे कोर्स असतात. नंतर मुले पदवीचेही शिक्षण घेऊ शकतात.

आजकाल प्रत्येकाच्या तोंडात कोरोनाशिवाय दुसरा विषय नाही. प्रत्येकजण धास्तावलेला आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढतच आहेत. बघता बघता पूर्ण गोवा कोरोनाने वेढला आहे. घरात बसून कामे होत नाहीत. बाहेर जावंच लागतं. आपला संबंध कित्येक लोकांशी येत असतो. आपणही बाधीत नाही ना, हीच भीती मनात येत राहते.

अशातच परवा रस्त्यातच एक गंमत घडली. दोन माणसे तावातावाने बोलत होती. पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. म्हटले बघुया, काय ते, तर इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहणार्‍या एका सुशिक्षित गृहस्थाने वरून खाली पाणी टाकले होते. खाली दुकानदार आहे, लोक ये-जा करतात, याचेसुद्धा त्याला भान राहिले नाही. पाणी नेमके दुकानदाराच्या दारात पडले. शिंतोडे व्यापारावर उडाले. दोघांत बरी जुंपली. पोलीसही पोहोचले. पोलिसांनी त्याची चूक दाखवून दिली आणि परत तसे न करण्यास सांगितले, तर तो मान्य करायला तयार नाही. त्या बाजूने व्यापारीही त्याला शिव्यांची लाखोली वाहत होता- ‘घाटी कुठले, गोव्यात येऊन आमच्यावरच दादागिरी करतात’. खरे म्हणजे इमारतीतील फ्लॅटधारक आपल्या फ्लॅटचा ताबा घेताना बिल्डर गॅलरीत झाडे लावायला वगैरे परवानगी देत नाही. कारण झाडातील पाणी खाली लोकांवर पडून त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून. हा नियम सर्वत्र लागू असताना ह्या इसमाची दादागिरी वाखाणण्याजोगी आहे. आपण चुकतो आहोत हे माहीत असूनसुद्धा उलट पोलिसांना समजावण्याचा प्रयत्न करू लागला. पोलीस दाद देत नाहीत हे पाहून त्याने आपले शस्त्र बाहेर काढले नि मी कोण माहीत आहे तुम्हाला? पुढचे शब्द पोलिसांनी ऐकूनच घेतले नाहीत. तुझीच चूक आहे हे सांगून ते निघून गेले. पुढे काय झाले देव जाणे.
‘मी कोण माहीत आहे तुम्हाला? मी अमुक करीन, मी तमुक करीन. सीएमला फोन लावतो’ ही आणि असली भाषा सर्रास ऐकू येते. स्वतः चुका करायच्या आणि लोकांना धमकी द्यायची.

मी कोण? हे दादागिरी करून विचारण्यापेक्षा तुम्ही दिसताक्षणीच लोकांनीच तुम्हाला ओळखायला पाहिजे. प्रसिद्ध नाटककार, अभिनेते, डॉक्टर, लेखक असे कितीतरी नामवंत लोक असतात जे आपल्या कलाकौशल्याने प्रसिद्धीस पावतात.

कोरोना व्हायसरमुळे युवकांना संधी चालून आली आहे. मी कोण हे दादागिरी करून सांगण्यापेक्षा आपली स्वतःचीच नवीन ओळख करून देण्याची हीच संधी आहे. गोवा आत्मनिर्भर बनविण्याची. माझ्या माहितीप्रमाणे ३०-४० वर्षांआधी गोवा आत्मनिर्भरच होता. सुतारकाम, गवंडीकाम, रंगारी, शेती, बागायतीपासून सरकारी नोकर्‍याही गोवेकरच करायचे. प्रत्येकाच्या घरात गुरेढोरे असायची. परसदारी तर्‍हेतर्‍हेच्या भाज्या, फळभाज्या… कमतरता म्हणून कशाचीच नव्हती. तांदूळ, दूध, भाज्या सगळंच नैसर्गिक मिळत होते. मासेसुद्धा अगदी ताजे. हळूहळू सगळ्यांनी आपले पारंपरिक धंदे सोडून नोकर्‍यांच्या मागे धावू लागले. तेव्हा खरेच म्हणा, नोकर्‍याही लवकर मिळायच्या. दहावी झाले की बस, नोकरी हजर. मग ती कष्टाची कामे का करायची?
लोकसंख्या वाढतच गेली, तशी परिस्थितीही बदलू लागली. लोकांच्या गरजा वाढल्या. हळूहळू परराज्यातील लोकांनी आपल्या राज्यात शिरकाव करून सगळी क्षेत्रे काबीज केली. अशातच बेकारी वाढतच गेली. युवक व्यसनाधीन झाले. सगळा गोवा बाहेरच्या लोकांनी व्यापला गेला. आज मजूर आपापल्या गावी परतले. तेव्हा आमचे डोळे उघडले. आता ही संधी दवडून चालणार नाही.

१०वी, १२वीचे निकाल आता जाहीर होणार आहेत. जे विद्यार्थी जेमतेम पास होतात किंवा ज्यांना शिक्षणात रुची नाही त्यांना आयटीआय (इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) पर्याय असू शकतो. यात विविध प्रकारचे अभ्यासक्रम असतात. एक-दोन वर्षांचे कोर्स असतात. नंतर मुले पदवीचेही शिक्षण घेऊ शकतात. इकडे तिकडे नोकर्‍या शोधण्यापेक्षा स्वतःचे उद्योग सुरू करून उद्योगपती होऊ शकतात. येणारा काळ कसा असेल ते कोरोनाच्या हाती आहे. कोरोनाच्या विळख्यातून सुटायचं असेल तर मास्क आणि सामाजिक अंतराला पर्याय नाही. तेव्हा मुलांनी याचा विचार करायला हरकत नाही.