युरीनरी ट्रॅक्ट इंफेक्शन

डॉ. स्वाती अणवेकर (म्हापसा)

सरस्वती रेल्वेचा प्रवास करून सहकुटुंब गोव्याला सुट्टी घालवायला येत होती. पण झाले भलतेच तिला दुसर्‍या दिवशीच अगदी सणकुन ताप भरला आणि मग सगळ्यांच्याच आनंदावर विरजण पडले. कारण सरस्वतीच्या आजारामुळे तिच्या सोबत असलेल्या इतर मंडळींना देखील निसर्गरम्य गोव्याची मजा उपभोगता आली नाही. सरस्वतीला लघवीला देखील जळजळ होत होती, ताप काही केल्या उतरत नव्हता म्हणून शेवटी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि जेव्हा तपासण्या केल्या तेव्हा असे लक्षात आले की सरस्वतीला लघवीला इंफेक्शन (संसर्ग) झाले आहे. मग योग्य उपचार झाल्यावर ती पूर्ण बरी झाली.
आज आपण माहिती पाहणार आहोत स्त्रियांना होणार्‍या ‘युरीनरी ट्रॅक्ट इंफेक्शन’विषयी सविस्तर माहिती कारण जर एखाद्या बाईला क्वचित असे लघवीचे इंफेक्शन होत असेल तर ते सामान्य आहे. परंतु जर हा लघवीचा त्रास तिला वारंवार होत असेल तर मात्र हे तिच्या आरोग्याला हानीकारक ठरू शकते.
युरीनरी ट्रॅक्ट इंफेक्शनमध्ये त्या स्त्रीच्या मुुत्र मार्गात जीवाणू संक्रमण होते. त्यामुळे तिला लघवी करताना त्रास होतो – जसे लघवीच्या जागी जळजळ होणे, वेदना होणे, थेंब थेंब लघवी होणे इ. पुष्कळ वेळेस हे इंफेक्शन चार ते पाच दिवसात आपोआप कमी होते पण कधी कधी हा त्रास जर वाढला तर मात्र वैद्यकीय उपचार करून घेणे चांगले असते.
हे इंफेक्शन तीन प्रकारात मोडते. पहिल्या प्रकारात मुत्र साठवून ठेवणार्‍या पिशवीला इंफेक्शन होते ज्याला ‘सिस्टायटीस’ असे म्हणतात. जेव्हा हे इंफेक्शन मुत्र वाहून नेणार्‍या नलीकेला होते तेव्हा त्याला ‘युरेथ्रायटीस’ असे म्हणतात आणि जेव्हा असे इंफेक्शन थेट कीडनीला होते तेव्हा त्याला ‘पायलोनेफरायटीस’ असे म्हणतात.
स्त्रियांना मुत्रमार्गाने संक्रमण हे पुरुषांपेक्षा जास्त होते कारण स्त्रियांचा मुत्रमार्ग हा पुरुषांपेक्षा छोटा व गुदमार्ग जवळ असल्याने स्त्रियांना असे मुत्रमार्गाचे जीवाणू संक्रमण लगेच होते. कारण गुदभागातले जीवाणु हे मुत्रमार्गात सहज पसरू शकतात. आपल्या देशात साधारणपणे वीस ते तीस टक्के स्त्रियांना युरीनरी ट्रॅक्ट इंफेक्शनचा त्रास वारंवार होतो. पण हे असे मुत्रमार्गाचे जीवाणु संक्रमण जर एखाद्या गरोदर स्त्रीला झाले तर मात्र ते तिच्या किडनीपर्यंत सहज पोहोचु शकते. कारण गरोदरपणामुळे त्या स्त्रीच्या मुत्र मार्गाच्या शरीर रचनेत थोडा फरक पडतो.
पुष्कळ वेळेस हे मुुत्र मार्गाचे इंफेक्शन हे तसे धोकादायक असत नाही. पण जर मुत्र मार्गाच्या वरच्या भागात अथवा असे इंफेक्शन किडनीमध्ये झाल्यास ते थोडे धोक्याचे ठरते. तसेच खूप जुने इंफेक्शन, त्याचप्रमाणे अचानक उद्भवलेले इंफेक्शन जर किडनीपर्यंत पोहोचल्यास त्या स्त्रीच्या किडनीमध्ये कायम स्वरुपी व कधीच बरा न होणारा बिघाड होऊ शकतो आणि जर मग हे इंफेक्शन रक्तात पसरले तर त्याला ‘सेप्टीसीमिया’ असे म्हणतात आणि असे झाल्यास मात्र त्या स्त्रीच्या जीवावरदेखील बेतू शकते.

आता आपण मुत्रमार्गात इंफेक्शन होण्याची कारणे जाणून घेऊया ः-
* असुरक्षित शरीर संबंध ठेवणे.
* जर एखाद्या स्त्रीला डायबेटीस असेल तर.
* योनी व गुदभागाची अस्वच्छता.
* लघवी बराच वेळ मुत्राशयात तुंबून ठेवणे.
* कीडनीमध्ये स्टोन्स होणे.
* ऍटीबायोटीक्सचा भरमसाठ वापर.
* मेनोपॉज.
* गरोदरपण.
* टॅपोन्सचा अतिरेकी वापर.

चला आपण कारणे तर पाहिली पण त्याची लक्षणे कोणकोणती असतात ते देखील आपण जाणून घेणे गरजेचे आहे.
* वारंवार व त्वरीत लघवीला जावेसे वाटत रहाणे.
* सरक्त, गढुळ, दाट व उग्रगंधी लघवी होणे.
* लघवी करत असताना वेदना व जळजळ होणे.
* बरेचदा त्या स्त्रीला मळमळ अथवा उल्टी देखील होऊ शकते.
* अंग दुखणे अथवा ओटीपोटात दुखणे.
* इंफेक्शनची तीव्रता जास्त असेल तर कधी कधी यात ताप देखील येऊ शकतो.

लघवीचे इंफेक्शन झाले असता लघवीची तपासणी केल्यावर त्या पस सेल्स व लाल रक्तपेशी या प्राकृत प्रमाणापेक्षा जास्त सापडतात.

आता आपण आवश्यक तेवढी माहिती जाणून घेतली असली तरी देखील असे परत परत इंफेक्शन होेणे चांगले नव्हे कारण तसे झाल्यास त्या स्त्रीचे पूर्ण आरोग्य ढासळू शकते. म्हणून अस वारंवार होणार्‍या इंफेक्शनपासून स्वतःचा बचाव कसा करावा ते देखील आपण जाणून घेणे आवश्यक आहे.
* लघवी झाली आहे असे वाटताच लघवीला जाऊन येणे आवश्यक आहे.
* योग्य प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे.
* चहा, कॉफी, दारू असे पेय पदार्थ ज्यामुळे मुत्राशयाला इरीटेशन होईल त्यांचे सेवन न करणेच उत्तम.
* संभोग केल्यावर मुत्र विसर्जन करणे आवश्यक आहे.
* कायम गुद व योनी भागाची स्वच्छता ठेवावी.
* मासिक पाळीच्या वेळेस टॅपॉन्सचा वापर न करता कपडा अथवा कॉटनचे पॅड्‌स वापरावेत.
* योनीभागावर अत्तर अथवा परफ्युम लावू नये.
* नेहमी सुती अंतरवस्त्र वापरावेत.

आयुर्वेदामध्ये युरीनरीट्रॅक्ट इंफेक्शनवर अत्यंत प्रभावी उपचार केले जातात. यात औषधांमध्ये चंदनासव, उशिरासव, गोखरूकाढा, पुनर्नवासव, चंदन घन, गोखरू घन इ. औषधांचा वापर प्रभावी आहे. तसेच याच वनस्पतींचा काढा देखील करून घेणे फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे धणे, जीरे यांचा काढा देखील उपयोगी आहे. औदुंबराच्या झाडाचे पाणी देखील यात चांगले काम करते.
तसेच जर प्रत्येक स्त्रीने आपल्या आहाराची नीट काळजी घेतली व आपली शारीरिक स्वच्छतेची नीट काळजी घेतली पाहिजे. तसेच आपण वापरत असलेले मुत्रालय अथवा शौचालय देखील स्वच्छ असणे गरजेचे आहे जेणे करून अशा वारंवार होणार्‍या लघवीच्या इंफेक्शनपासून आपण स्वतःला लांब ठेऊ शकाल.