ब्रेकिंग न्यूज़

‘युनिक’ बुद्धिबळ स्पर्धेचे सतीश कुमारला जेतेपद

पहिल्या ‘युनिक’ अखिल भारतीय १५५० रेटिंगखालील बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद ४५वे मानांकन लाभलेल्या तमिळनाडूच्या २४वर्षीय सतीश कुमार जी. याने पटकावले. स्पर्धेच्या शेवटच्या फेरीत त्याने गोव्याच्या एएफएम शिवांक कुंकळ्येकर (१४४६) याचा पराभव करत मुसंडी मारली.

युनिक चेस अकादमीनेे केपे बुद्धिबळ संघटनेच्या साहाय्याने केपे सरकारी कॉलेजमध्ये ७ ते ९ मे या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन केले होते. गोवा बुद्धिबळ संघटनेच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या नियमांप्रमाणे सदर स्पर्धा झाली. अंतिमपूर्व फेरीपर्यंत संयुक्त आघाडीवर असलेला उपविजेता कर्नाटकचा प्रज्ज्वल केएम (१४०७) व तिसरे स्थान मिळविलेला केरळचा पॉलसन फ्रेंची (१४९८) यांच्यातील सामना बरोबरीत राहिल्याने सतीश कुमारला जेतेपद मिळविणे शक्य झाले.
कनिष्क बसू, कर्नाटक (१५०९), तुषार बॅनर्जी, बंगाल (१५४९), आर्यन रायकर, गोवा (१५२६), शिवांक कुंकळ्येकर, गोवा (१४४६), आयुष पेडणेकर, गोवा (१५०२) व जॉय काकोडकर, गोवा (१४२३) यांनी अनुक्रमे चौथा ते दहावा क्रमांक मिळविला. तीन दिवस चाललेली या स्पर्धेचे मुख्य लवाद म्हणून संजय कवळेकर यांनी काम पाहिले. उपलवाद स्वप्नील होबळे व गौतम तारी तसेच साहाय्यक लवाद नंदिनी सारिपल्ली यांची मदत त्यांना लाभली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी गोवा बुद्धिबळ संघटनेेचे सचिव व भारतीय बुद्धिबळ महासंघाचे खजिनदार किशोर बांदेकर, मुख्य लवाद संजय कवळेकर, युनिक चेस अकादमीच्या अध्यक्ष रसिका कवळेकर, केपे तालुका बुद्धिबळ संघटनेचे कार्यकारी सदस्य अमृत नाईक उपस्थित होते. श्रीमती कवळेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
अमृत नाईक यांनी आभार मानले तर शरेंद्र नाईक यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली.