ब्रेकिंग न्यूज़

युद्ध हवं की बुद्ध हवा?

  •  प्रा. रमेश सप्रे

अलिकडच्या काळात भारतानं सार्‍या जगाची नजर चुकवून जे दोन चाचणी-अणुस्फोट घडवले, त्यांच्या यशस्वितेचे सांकेतिक शब्द होते ‘बुद्ध हसला’ नि ‘बुद्ध पुन्हा हसला’. अणुस्फोट नि बुद्ध यांच्यातला हा विरोधाभास नव्हता तर संवाद होता. कारण आपल्या देशाचं आरंभापासूनचं ध्येयच आहे मुळी, ‘शांतीसाठी अणुशक्ती (ऍटम्स फॉर पीस).

ते तिघंजण एकमेकांचे घट्ट मित्र असले तरी त्यांची दृष्टी एकमेकापेक्षा भिन्न होती. सूर्याखालच्याच नव्हे तर सूर्य नि सूर्यापलीकडच्या विषयांवर तिघांच्या गप्पा चालत. म्हणजे गरमागरम वाद होत. जगातील सध्याची परिस्थिती, जीवनातले मुख्य प्रश्‍न, मानवतेची अवस्था- काल, आज आणि उद्या … अशा गंभीर विषयांवर तिघांच्या चर्चा होत. सुरुवात संवादातून झाली तरी अखेर अनेकदा वादातच होई. पण त्यांच्यातली मैत्री मात्र अभंग होती.

एकदा त्यांच्या बोलण्याचा विषय होता ‘सध्याची युद्धजन्य परिस्थिती’. साहजिकच तिघांचे तीन दृष्टिकोन होते. पण त्याच्या मुळाशी एक समान सूत्रही होतं, ते म्हणजे समाजाबद्दल त्यांना वाटत असलेली चिंता नि बांधिलकी. चाललंय ते काही खरं नाहीये. कोणती उपाययोजना केली पाहिजे? विशेषतः जीवनाच्या नि समाजाच्या विविध क्षेत्रातील नेतेमंडळींनी याची गंभीर दखल घेऊन, एकत्र बसून धोरण का ठरवू नये?
प्रश्‍न तसा मानवजातीच्या भवितव्याच्या दृष्टीनं जिव्हाळ्याचा होता.

तिघातला एक विज्ञानवादी होता. जगातील नि जीवनातील सर्व प्रश्‍नांना विज्ञानंच उत्तरं देईल अशी त्याची ठाम श्रद्धा होती. न्यूटन, आइन्स्टाईन ही त्याची दैवतं, नव्हे आदर्श होते. युद्ध करणं ही मानवाची उपजत वृत्ती किंवा स्वाभाविक प्रवृत्ती (नॅचरल इन्स्टिंक्ट) आहे. त्यामुळे युद्ध संपून चिरकाल टिकणारी शांती हे स्वप्न आहे हे त्याचं मत होतं. त्यानं एक प्रसंग सांगितला…
एकदा एका कार्यक्रमानंतर आइनस्टाईनला प्रश्‍न विचारला गेला, ‘तिसरं महायुद्ध कसं होईल?’ पहिल्यापेक्षा दुसर्‍या महायुद्धात अधिक घातक शस्त्रास्त्रं वापरली गेली होती. मोठ्या प्रमाणावर नरसंहार झाला होता. दुसर्‍या जागतिक युद्धाचा शेवटच जपानमधल्या हिरोशिमा नि नागासाकी या शहरांवर अणुबॉंब टाकूनच झाला होता. आता तर मानवाच्या हातात कल्पनाही करता येणार नाही अशी विनाशक शस्त्रास्त्रसामग्री आली आहे. अणुबॉंबपेक्षाही भयंकर अशी अस्त्रं नि ती आकाशातून, नव्हे अवकाशातून (स्पेस) कुठंही टाकण्याची क्षमता मानवानं साध्य केलीय. मुख्य म्हणजे अनेक राष्ट्रांकडे आज अशी अण्वस्त्रं आहेत. हे सारं आइन्स्टाईनच्या काळात वेगानं विकसित होत होतं. त्याला उद्देशून आइनस्टाईननं मार्मिक उत्तर दिलं- ‘तिसरं महायुद्ध कसं लढलं जाईल हे माहीत नाही. पण चौथं युद्ध मात्र दगड, काठ्या, धनुष्यबाण यांनी लढलं जाईल.’ त्याच्या उत्तराचा मथितार्थ हा होता – तिसरं महायुद्ध अवकाश, जमीन, पाणी सर्व ठिकाणी लढलं जाईल. ते एवढं महाभयंकर असेल की सारी पृथ्वी भाजून काढील. मानवजात व सृष्टीतील इतर जीव सारे नष्ट होतील. तरीही नंतर येणार्‍या मानवसमूहात युद्ध करण्याची वृत्ती असेलच असेल, फक्त साधनं निराळी असतील. एकप्रकारे हे उत्तर योग्य वाटलं तरी नकारात्मक होतं. भविष्यकाळाचं काळं चित्र रंगवणारं होतं.

आता पाळी दुसर्‍याची होती. तो होता देवभक्त नि संत वाङ्‌मयाचा अभ्यासक. त्यानं तुकारामाचं वचन सांगितलं- ‘रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग | अंतर्बाह्य जग आणि मन’. मनात नि जगात अखंड संघर्ष सुरू. एक प्रकारचं युद्धच सुरू आहे. त्यावर उपाय आहे मनं शांत, स्वच्छ नि स्थिर हवीत. तरच आतली नि बाहेरची युद्ध थांबतील. युद्धखोर प्रवृत्तीचं मन शांत कधी स्वतःही असणार नाही नि इतरांनाही बसू देणार नाही.

हे त्यानं इतक्या आत्मविश्‍वासानं सांगितलं की आइनस्टाईनवालाही विचारात पडला. सर्वजण काही क्षण विचार करू लागल्यानं काही क्षण अस्वस्थ शांततेत गेले. त्या शांतीचा भंग करत तिसरा म्हणाला- हा तिसरा मित्र व्यवहारवादी होता. स्वप्नरंजनात बुडणारा नव्हताच. पण संत नि शास्त्रज्ञ यांच्याबद्दल आदर बाळगणारा होता. त्याचा भर अर्थातच प्रत्यक्ष जीवनावर होता. तो संथपणे म्हणाला, ‘तुम्हाला खरोखरच युद्ध नको असेल तर बुद्धाचाच स्वीकार तुम्ही करायला हवा,’ ऐकायला ते शब्द एखाद्या संगीतमय घोषणेसारखे होते.

‘युद्ध नको तर बुद्ध हवा!’ पण म्हणजे नक्की काय? यासाठी काय करायला हवं? मानवाची जीवनशैली कशी हवी? – हे शक्य आहे की हेही स्वप्नच?
अशा प्रश्‍नांची उत्तरं देण्याची जबाबदारी या बुद्धवाद्याची होती, केवळ बुद्धिवाद्या नव्हे. तो म्हणाला- आपण बुद्धाच्या चरित्रकार्यावर थोडी दृष्टी टाकू या….
प्राचीन काळातील महामानवांच्या चरित्राबद्दल एकवाक्यता किंवा एकमत नसतं. त्यांच्या जन्माचं वर्ष, स्थान, सहकारी व्यक्तींची नावं, प्रत्यक्ष घटना या प्रत्येक गोष्टीत मतभिन्नता दिसून येते. तरीही जनमानसात त्या महापुरुषांच्या प्रतिमा तयार झालेल्या असतात. त्याही खूप प्रभावी असू शकतात. गौतम बुद्धाचं चरित्रही याला अपवाद नाही.
गौतमाचं मूळ नाव सिद्धार्थ. म्हणजे ज्याचे सारे – धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे पुरुषार्थ सिद्ध झाले आहेत असा. कारण लहानपणापासूनच त्याचा स्वभाव अतिशय शांत, वृत्ती पूर्ण अहिंसक आणि अंतःकरणात सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेम होतं. त्याबद्दलचे अतिशय हृदयस्पर्शी प्रसंग पाहण्यापूर्वी इतर तपशील पाहू या. त्याचं जन्मस्थळ कपिलवस्तू. ही नगरी नक्की कुठे होती याबद्दलही वाद आहेतच. असो.

शाक्य या क्षत्रिय राजकुलात त्याचा जन्म झाला. वडलांचं नाव शुद्धोदन. म्हणजे ज्यांचं अन्न (ओदन) म्हणजे सारी साधनसामग्री संपत्ती चांगल्या मार्गानं मिळवलेली होती. आईचं नाव मायावती. ती गर्भवती असताना प्रसूतीसाठी पालखीत बसून आपल्या माहेरी निघाली होती. वाटेत लुंबीनी नावाच्या उपवनात थोडी विसावली. त्याचवेळी एका झाडाखाली बसलेली असताना प्रसूतीवेदना असह्य झाल्यामुळे ती प्रसूत झाली. त्यानंतर त्या झाडाखालीच तिनं एका पुत्राला जन्म दिला. तिला परत कपिलवस्तूला आणण्यात आलं. पण दुर्दैवानं गौतमाच्या जन्मानंतर सातव्या दिवशी मायावतीनं प्राण सोडला. छोट्या सिद्धार्थाचं पालन-संगोपन सावत्र आई गौतमीनं केलं. म्हणून त्याला ‘गौतम’ हे नाव पडलं.

त्याकाळच्या पद्धतीप्रमाणे एका ज्ञानी मुनीनं त्याचं जातक (जन्मभरच्या घटनांचं भविष्य) वर्णन केलं. ते म्हणाले, ‘राजन् हा तुझा पुत्र एक चक्रवर्ती सम्राट तरी होईल नाहीतर विश्‍वाला मार्गदर्शन करणारा संन्यासी होईल.’ हे ऐकून राजानं आपला मुलगा सम्राट व्हावा या दृष्टीनं त्याच्या शिक्षणाची, मनोरंजनाची सारी व्यवस्था राजवाड्यातच केली. गौतमाला कोणत्याही परिस्थितीत बाहेरच्या दुःख, चिंता यांनी ग्रासलेल्या जीवनाचा परिचय होऊ नये या दृष्टीनं सारी आखणी केली. गौतमाचा स्वभाव क्षत्रियासारखा नसून एखाद्या संतसज्जनासारखा अहिंसक होता.

एकदा राजवाड्यातील उद्यानातून फिरत असताना एक शिकार्‍याचा बाण लागलेला हंस तडफडत गौतमाच्या समोरच पडला. शांतपणे गौतमानं त्याला जवळ घेतलं. पाणी पाजलं; शरीरात घुसलेला बाण बाहेर काढला. जखमेवर मलमपट्टी केली. इतक्यात चुलतभाऊ देवदत्त येऊन त्यानं शिकार केलेला तो हंस परत मागू लागला- गौतमानं शांतपणे त्याला प्रश्‍न केला – ‘जो मारतो त्याचा हंस की जो वाचवतो त्याचा?’- पुढे या वादाची फार हृद्य सांगता झाली. दरबारात गौतम व देवदत्त उभे राहिले. त्यांच्यापासून काही अंतरावर ठेवलेल्या जखमी हंसाला दोघांनी आपापल्या पद्धतीनं बोलावलं. एका क्षणात तो हंस लंगडत लंगडत गौतमाकडे गेला. गौतमानं त्याला जवळ घेऊन नंतर बरा करून आकाशात सोडून दिलं. भावी गौतमाची जडणघडण अशी होत होती.
गौतमाच्या जीवनातला क्रांतिकारी दिवस पुढे येणार होता. काळाच्या ओघात त्याचा विवाह यशोधरा नावाच्या राजकन्येशी झाला. त्यांना राहूल नावाचा एक गोड मुलगाही झाला. सारं कसं राजा शुद्धोदनाच्या मनासारखं चाललं होतं. आपला मुलगा लौकरच राज्याची सारी जबाबदारी सांभाळून भावी कालात चक्रवर्ती सम्राट होणार हे त्याला स्पष्ट दिसत होतं.

एक दिवस गौतमानं विश्‍वासातील सारथी चन्न याला बरोबर घेऊन राजधानीतून फेरफटका मारायचं ठरवलं. तसा तो प्रथमच बाहेरचं जग पाहात होता. कुतुहलानं चन्नला अनेक प्रश्‍न विचारत होता. त्यानं रस्त्यानं पाठीत पूर्णपणे वाकलेल्या, काठीचा आधार घेऊन चालत असलेल्या म्हातारीला पाहून विचारलं, ‘ही अशी का चालतेय?’ चन्न म्हणाला, ‘कारण ती म्हातारी झालीय’. ‘तू- मी आपण सारे असेच म्हातारे होणार?’ चन्न उद्गारला, ‘हो!’
जरा पुढे गेल्यावर खोकत खोकत थांबत थांबत जाणारा एक तरुण दिसला. ‘हा असा का चालतोय?’ या गौतमाच्या प्रश्‍नावर चन्नाचं उत्तर होतं – ‘हा रोगी आहे. सर्वांना काही ना काही रोग होऊन दुःख सहन करावं लागतंच.’ रथ पुढे जात होता. वाटेत एक प्रेतयात्रा दिसली. एका माणसाला तिरडीवर बांधून खांद्यावरून नेत होते. ते पाहून गौतम विचारतो, ‘हा असा का चाललाय?’ चन्न उद्गारला, ‘तो मृत पावलाय. सर्वांना शेवटी मृत्यू येतोच. सारं इथंच सोडून जावं लागतं.’ गौतमानं त्याला रथ वळवून दुसर्‍या मार्गानं राजवाड्याकडे न्यायला सांगितला. वाटेत एका झाडाखाली वृद्ध माणूस बसला होता. ‘दाढी पांढरी शुभ्र. ताठ बसून डोळे मिटून ध्यानस्थ बसलेल्या त्याला पाहून गौतमानं विचारलं, ‘हा कोण आहे? इतका वृद्ध होऊनही मृत्यूचं भय कसं वाटत नाही? इतका शांत, तेजस्वी कसा दिसतोय?’ या सार्‍या प्रश्‍नांवर चन्न म्हणाला, ‘महाराज, हा संन्यासी आहे. भय, चिंता, दुःख यांच्या पलीकडे पोचलाय तो.’
हे ऐकून गौतमाचं मन अस्वस्थ नि दोलायमान झालं. एकीकडे दुःखानं ग्रस्त नि त्रस्त झालेली बहुसंख्य माणसं, दुसरीकडे स्वतःच्या मुक्तीसाठी साधना करणारा तो संन्यासी! त्यानं विचारपूर्वक एक निश्चय केला की आपणही संन्यासी व्हायचं. पण फक्त स्वतःच्या मुक्तीचा ध्यास न घेता सार्‍या मानवजातीच्या दुःखाचं कारण शोधून त्यावर उपाय सर्वांना सांगायचा. त्याच मध्यरात्री पत्नी यशोधरा व पुत्र राहूल गाढ झोपेत असताना एका आंतरिक ओढीनं मानवजातीच्या आनंद-शांती-समाधानासाठी उपाय शोधायला तो बाहेर पडला.
सिद्धार्थ-गौतमाचा ‘बुद्ध’ (म्हणजे ज्ञानी, जीवनातील गहन रहस्याचं उत्तर सापडलेला) होण्याकडचा प्रवास सुरू झाला होता. ती आषाढी पौर्णिमेची (गुरूपौर्णिमेची) रात्र होती. चन्नला बरोबर घेतलं. राज्याच्या सीमेवरची अनोमा नदी पार केल्यावर आपली राजवस्त्रे काढून, सुंदर केस तलवारी कापून, साधे पीतवस्त्र परिधान करून चन्नचा निरोप घेतला नि एका दृढसंकल्पानं तो एकटाच वनात निघून गेला. अखंड आनंदाच्या, प्रकाशाच्या शोधात!
गौतमाचा हा गृहत्याग, सर्वसंगपरित्याग बौद्ध वाङ्‌मयात ‘महाभिनिष्क्रमण’ म्हणून प्रसिद्ध आहे. आता फक्त ज्ञान प्राप्तीसाठी ध्यान, चिंतन आणि आत्मानुसंधान एवढाच दिनक्रम गौतमाचा होता. या तपःश्चर्येनं अत्यंत कृश-क्षीण झाला. फक्त हाडं नि कातडंच उरलं. अशा अस्थिपंजर अवस्थेत हळुहळू ज्ञानाचा प्रकाश दिसू लागला होता. बोधाचा उषःकाल होऊ लागला होता. संपूर्ण बोध झाल्यावर तो ‘बुद्ध’ बनणार होता नि ज्या झाडाखाली त्यानं ही ज्ञानसाधना केली होती ते बनलं बोधिवृक्ष. गौतमाला ‘सम्यक्-संबोधी’ (परमज्ञान) प्राप्त झाली. आतलं ज्ञान बाहेर व्यक्त होऊ लागलं. ते ऐकण्यासाठी शिष्यही जमू लागले. गौतम बुद्धाचं पहिलं धर्मप्रवचन ‘साधूंनो, असे जवळ या. मला चार आर्य सत्यांची प्रचीती आलीय. ती तुम्ही सर्वांना सांगून त्यांना दुःखमुक्तीचा मार्ग दाखवा.’
ती चार आर्यसत्य अशी- दुःख, दुःखसमुदय, दुःखनिरोध आणि निरोध-गामिनी-प्रतिपद्. म्हणजे जीवनातील वास्तव दुःख, त्या दुःखाचा उगम, दुःखाचं निराकरण आणि प्रत्येक पावलाला, क्षणाला, प्रत्येक कृतीत त्यासाठी प्रयत्न. या आर्यसत्यांच्या माध्यमातून ‘सम्यक् संबोधी’ अंतिम ज्ञान प्राप्त होते. त्यासाठी जीवनात या आठ तत्त्वांचा व्यवहार केला पाहिजे. सम्यक् म्हणजे योग्य, कल्याणकारी (गीतेत यासाठी ‘युक्त’ हा शब्द वापरलाय.).
आठ तत्त्वं अशी – १. सम्यक् दृष्टी, २. सम्यक् संकल्प, ३. सम्यक् वाक् (वाणी), ४. सम्यक् कर्म, ५. सम्यक् आजीव, ६. सम्यक् व्यायाम, ७. सम्यक् स्मृती नि ८. सम्यक् समाधी.
ही तत्त्वं मिळून जो उदात्त अष्टांग मार्ग बनतो तो आजच्या मानवाला व जीवनशैलीला अत्यंत उपकारक आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे- कठोर व्रतं, तपं आणि विषयभोगांचं अतिरिक्त सेवन ही दोन्ही टोके टाळली पाहिजेत. हा मध्यम (सम्यक्) मार्गच दुःखनिवारणासाठी नि अंती निर्वाणप्राप्तीसाठी आवश्यक आहे.
बुद्धाचं महत्त्वाचं कार्य म्हणजे शिष्यांचं, भिक्षू-भिक्षूणींचं संघटन. त्या काळात तो मोठा प्रयोग होता. त्यांच्यासाठी मोठमोठे विहार बांधले गेले. तेथे ज्ञानार्जन नि तपोसाधना दोन्ही निष्ठेनं चालू होते. अनेक राजे म्हणून त्यांची प्रजा बुद्ध धर्मीय झाली.
शांती-करुणा-अहिंसा यावर आधारित सार्‍या मानवजातीचा उद्धार करू शकणारी नवी जीवनशैली तयार झाली. अनेक क्षेत्रातली महत्त्वाची माणसं बुद्धाच्या जीवनाकडे, शिकवणीकडे नि धीरोदात्त, शांत व्यक्तिमत्त्वाकडे आकर्षित झाल्याने बौद्ध धर्माचा पाया विस्तृत नि मजबूत होत गेला. आजही जगभर असंख्य लोक बुद्ध चरित्रानं प्रेरित होऊन त्याची विचारसरणी स्वीकारत आहेत.

अलिकडच्या काळात भारतानं सार्‍या जगाची नजर चुकवून जे दोन चाचणी-अणुस्फोट घडवले, त्यांच्या यशस्वितेचे सांकेतिक शब्द होते ‘बुद्ध हसला’ नि ‘बुद्ध पुन्हा हसला’. अणुस्फोट नि बुद्ध यांच्यातला हा विरोधाभास नव्हता तर संवाद होता. कारण आपल्या देशाचं आरंभापासूनचं ध्येयच आहे मुळी, ‘शांतीसाठी अणुशक्ती (ऍटम्स फॉर पीस). या स्फोटांचे प्रमुख सूत्रधार असलेल्या वैज्ञानिक-राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलामांनी लिहिलेल्या एका पुस्तकाचं नाव आहे ‘मानवतेचे दीपस्तंभ’. यात अनेक महामानवांचे विचार संकलित केलेयत.

या महामानवांच्या मालिकेत अग्रक्रमानं लखलखणारं रत्न जर कोणतं असेल तर गौतम बुद्धच! बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं गौतम बुद्धाला शतवार अभिवादन! मानवतेच्या सध्याच्या काळोख्या रात्री अंधाराचं जाळं फिटून आनंदाची पौर्णिमा प्रकाशो, हीच प्रार्थना!