ब्रेकिंग न्यूज़
म्हापशातील ‘आल्तिनो पठार’ आणि राजकारणी

म्हापशातील ‘आल्तिनो पठार’ आणि राजकारणी

म्हापसानगरीतील ‘काम्र म्युनिसिपाल-दे-बार्देस’ इमारतीच्या उतरंडीवरून खाली जाणार्‍या रस्त्याच्या समोर असलेल्या ‘फार्मासिअ जुआंव-दे-मिनेझिस’ या औषधालयाच्या चौकाजवळून तळीवाडा ते ‘जार्दीन म्युनिसिपाल’पर्यंत (डॉ. राममनोहर लोहिया उद्यानापर्यंत) जाणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा असलेली वस्ती आणि श्रीलक्ष्मीनारायण मंदिराच्या उत्तरेकडील वस्ती यांचा समावेश ‘फेअर बायश’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या वाड्यात होतो. पोर्तुगीज भाषेत ‘बायश’ म्हणजे ‘खालचा.’ सदर ‘फेअर बायश’वाडा खालच्या भागात असल्यामुळे त्या भागाला हे नाव देण्यात आले असावे.
‘काम्र म्युनिसिपाल-दे-बार्देस’ इमारतीकडून आपण उत्तर दिशेने त्रिबुनाल ज्युदिसिआल-दा-कॉमार्क-दे बार्देसच्या (दिवाणी व फौजदारी जिल्हा न्यायालय) इमारतीकडे जाणार्‍या रस्त्याची चढण काढून ‘आदमिस्त्रासां-दास-कोमुनिदादीस-दे-बार्देस’जवळील चौकात पोचलो की थोड्या उंचावरील पठारावर असलेल्या परिसराला ‘फेअर आल्त’ असं संबोधतात. पोर्तुगीज भाषेत ‘आल्त’ म्हणजे उंच. सदर परिसर थोड्याशा उंचीवरील पठारावर असल्यामुळे हे नाव या परिसराला दिले असावे. काही लोक या परिसराला ‘आल्तिनो’ म्हणतात.
मुक्तीपूर्व आणि मुक्तीनंतरच्या कालखंडात म्हापसानगरीच्या या आल्तिनो परिसराला शैक्षणिक व राजकीयदृष्ट्या बरेच महत्त्व प्राप्त झाले होते. या परिसरातील जिल्हा न्यायालय, पोर्तुगीज लष्कराचे वसतिस्थान, शैक्षणिक संस्था यामुळे हा परिसर गजबजलेला असायचा. ‘ऑलिम्पिक गार्डन’च्या दक्षिणेला ऍड. रमाकांत खलप यांच्या निवासस्थानाकडे जाणार्‍या गल्लीच्या डाव्या बाजूला ‘फिगरेदो’ कुटुंबीयांचं घर होतं. म्हापसा नगरपालिका बाजारपेठेसमोरील ‘रामचंद्र बिल्डिंग’मध्ये त्यांचे चहा-फराळ व शीतपेयांचे ‘बर्टसी’ नावाचे आस्थापन होते. आता ते बंद आहे. सदर घर मोडून आता त्या ठिकाणी तीनमजली ‘ज्युवेल हाईट्‌स’ ही इमारत उभी आहे.
म्हापसा जिल्हा न्यायालयासमोरील ऑलिम्पिक उद्यानाजवळून जिल्हा इस्पितळाकडे वळणार्‍या रस्त्याच्या उजव्या बाजूकडील गल्लीत आपण वळलो की गल्लीच्या शेवटच्या टोकाला एक ‘बोगनवलिया’ या नावाचा पिवळा रंग दिलेला विस्तृत बंगला आहे. कळंगुट-गौरावाडा येथील वकिली व्यवसाय करणार्‍या एका घराण्यातील तत्कालीन नामवंत वकील ख्रि. जुआंव ज्युलिओ साल्वादोर हे आंतोनिओ सौजा उपाख्य ऍड. साल्वितो यांच्या मालकीचा तो बंगला! इ.स. १९५० च्या दरम्यान व्यवसायानिमित्ताने म्हापशातील आल्तिनो भागात ते वास्तव्याला आले होते. पोर्तुगीज भाषा व पोर्तुगीज कायदे यांचे त्यांना सखोल ज्ञान असल्यामुळे संपूर्ण गोव्यातून अनेक वकील त्यांच्याकडे सल्ल्यासाठी यायचे. उत्तर गोमंतकातील अनेक हिंदू देवस्थानांचे ते वकील होते. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्याचे भाग्यविधाते आणि मुक्त गोमंतकाचे पहिले मुख्यमंत्री कै. भाऊसाहेब बांदोडकर हे त्यांचे एक अशील होते. ‘एल कापितान’ चित्रपटगृहाजवळील ‘नॅशनल बेकरी’जवळ असलेल्या एका इमारतीत त्यांच्या वकिली व्यवसायाचं ऑफिस होतं. विद्यार्थीदशेत असताना ते गोमंतकमुक्ती चळवळीत सहभागी झाले होते. याशिवाय ते औषधालय चालवण्यासही पात्र असल्याने ‘फार्मासिअ प्रेसिसांव’ आणि ‘फार्मासिअ पोपुलार’ या औषधालयांचे ते संचालकही होते. एक उत्कृष्ट फुटबॉलपटू आणि बॉक्सर म्हणूनही त्यांची नामना होती. त्यांचे वडील ऍड. आलेक्शाद्रिनो डि-सौझा ‘काम्र म्युनिसिपाल-दे-बार्देस’चे (बार्देस नगरपालिका) सचिव म्हणून कार्यरत होते. ऍड. साल्वितो यांना चार मुलगे व दोन मुली होत्या. दोन मुलींपैकी एलिना ही एक मुलगी!
कुठ्ठाळी मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार आणि गोवा पुनर्वसन महामंडळाच्या अध्यक्षा श्रीमती एलिना साल्ढाणा ही ऍड. साल्वितो डि-सौझा यांची मुलगी. तिचा जन्म म्हापसानगरीत झाला. त्यांचं सारं बालपण आल्तिनोवरील त्यांच्या निवासस्थानी गेलं. म्हापशातील सेंट मेरीज कॉन्व्हेंटमध्ये त्यांचं माध्यमिक शिक्षण झालं. पुढे त्यांनी पणजी येथील धेंपो महाविद्यालयातून पदवी मिळवली व बी.एड्. पदवी मुंबई विद्यापीठातून संपादन केली. सुरुवातीला मुंबई व नंतर गोव्यातील वेर्णा येथील ‘मरीना इंग्लिश हायस्कूल’मध्ये त्या बराच काळ कार्यरत होत्या. पुढे त्यांचा कुठ्ठाळी येथील ख्रि. माथानी साल्ढाणा यांच्याशी विवाह झाला. ख्रि. माथानी साल्ढाणा हे शिक्षकी पेशात तर होतेच, शिवाय राजकारण व पर्यावरणाबाबतही ते जागरूक होते. विवाहानंतर श्रीमती एलिना ही आपल्या पतीबरोबर शिक्षण, पर्यावरण व राजकारण आदी क्षेत्रांत ओढली गेली. ख्रि. माथानी साल्ढाणा हे ३० मे २००२ रोजी झालेल्या गोवा राज्याच्या चौथ्या विधानसभेच्या निवडणुकीत युनायटेड गोअन्स डेमोक्रेटिक पार्टीच्या उमेदवारीवर कुठ्ठाळी मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले होते. त्यानंतर ते दि. ३ मार्च २०१२ रोजी झालेल्या सहाव्या गोवा राज्य विधानसभेच्या निवडणुकीत कुठ्ठाळी मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आले होते. इ.स. २००२ ते २००५ मध्ये ते क्रीडा व युवा खात्याचे मंत्री म्हणून आणि त्यानंतर दि. ९ मार्च २०१२ ते २१ मार्च १०१२ पर्यंत अवघ्या काही दिवसांसाठी पर्यटन व पर्यावरणमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले होते. दि. २१ मार्च २०१२ रोजी त्यांचे निधन झाल्यामुळे त्यांचे मंत्रिपद अल्पजीवी ठरले होते. दरम्यान, इ.स. २००२ ते २००३ मध्ये ते दक्षिण गोव्याचे कुठ्ठाळीमधून निवडून गेलेले जिल्हा परिषद सदस्य होते. इ.स. १९७४ पासून ते पर्यावरण संरक्षण चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्ते म्हणूनही कार्यरत होते.
ख्रि. माथानी साल्ढाणा यांच्या आकस्मिक निधनानंतर सहाव्या गोवा राज्य विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांना भारतीय जनता पक्षाने कुठ्ठाळी मतदारसंघाची उमेदवारी दिल्याने त्या या मतदारसंघातून भाजपच्या पहिल्या महिला आमदार म्हणून निवडून आल्या आणि श्री. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारात वन व पर्यावरणमंत्री म्हणून कार्यभार सांभाळू लागल्या. त्यानंतर दि. ४ फेब्रुवारी २०१७ रोजी झालेल्या सातव्या गोवा राज्य विधानसभेची निवडणूक त्यांनी पुन्हा भाजपाच्या उमेदवारीवर लढवून त्या कुठ्ठाळी मतदारसंघातून दुसर्‍यांदा निवडून आल्या. परंतु भाजपाला या निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळू न शकल्यामुळे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व गोवा फॉरवर्ड पक्षाबरोबर संयुक्त सरकार स्थापन करावे लागले. परिणामी श्रीमती एलिना साल्ढाना यांना मंत्रिपदापासून वंचित व्हावे लागले व गोवा पुनर्वन महामंडळाच्या अध्यक्षपदावर समाधान मानावे लागले. सध्या एलिनाचे वास्तव्य म्हापशात आपल्या माहेरीच असते.