ब्रेकिंग न्यूज़
म्हादई बचाव आंदोलनातर्फे २५ पासून म्हादईवर जागृती

म्हादई बचाव आंदोलनातर्फे २५ पासून म्हादईवर जागृती

म्हादई बचाव आंदोलनातर्फे येत्या २५ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०१९ दरम्यान तालुका पातळीवर म्हादई जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे, असे म्हादई बचाव आंदोलनाचे समन्वयक सुभाष वेलिंगकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.
यावेळी म्हादई आंदोलनाचे संयोजक अरविंद भाटीकर, समन्वयक एल्वीस गोम्स यांची उपस्थिती होती. म्हादई आंदोलनाने रस्त्यावर उतरण्याची तयारी चालविली आहे.

तालुका पातळीवर निदर्शने, धरणे आंदोलन करून जनजागृती केली जात आहे. म्हादई बचाव आंदोलनाला विविध संस्थांकडून पाठिंबा लाभत आहे. पाठिंबा देणार्‍या विविध संस्थांचा आकडा १३७ वर पोहोचला आहे, असेही वेलिंगकर यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या कारवायांमुळे म्हादईचे अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे. त्यांची भेट घेऊन सुध्दा काहीच निष्पन्न होणार नसल्याने जावडेकर यांची भेट घेण्याचे टाळण्यात आले आहे, असेही वेलिंगकर यांनी सांगितले.

कर्नाटकला झुकते माप
गोवा सरकारच्या दुर्लक्षित कारभारामुळे केंद्र सरकारकडून कर्नाटकाला म्हादई प्रश्‍नी झुकते माप दिले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हादई प्रश्‍नी ऑगस्ट २०१७ मध्ये दिलेल्या आदेशाचे उल्लंघन कर्नाटकाकडून केले जात आहे. तरीही, गोवा सरकार गप्प आहे. कर्नाटकाच्या विरोधात कोणतीही कृती केली जात नाही, अशी टिका म्हादई आंदोलनाचे समन्वयक एल्वीस गोम्स यांनी केली.

म्हादई बचाव अभियानकडून
मिळवली माहिती
म्हादईच्या सर्ंवंधनासाठी गेली २५ वर्षे न्यायिक पद्धतीने लढा देणार्‍या म्हादई बचाव अभियानाला राज्य सरकारकडून योग्य पाठिंबा मिळालेला नाही. म्हादई बचाव आंदोलनाच्या पदाधिकार्‍यांनी म्हादई बचाव अभियानाच्या अध्यक्ष निर्मला सावंत यांची गुरुवारी भेट घेऊन म्हादईबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.