ब्रेकिंग न्यूज़

म्हणे लोकशाही!

कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी पुन्हा सोनिया गांधी यांचीच निवड करून पक्षाच्या कार्यसमितीने पुन्हा एकवार पक्षजनांची गांधी घराण्यापुढील लाचारीच जगजाहीर केली आहे. पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्याकडे नसेल तर आधीच बुडते जहाज बनलेला हा पक्ष एकसंध राहणे कठीण आहे हाच संदेश या नाट्यमय घडामोडींतून देशाला गेला आहे. खरे तर पक्षाध्यक्षपदाचा त्याग करताना राहुल गांधी यांनी आता पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्याबाहेर जावे यासाठी पदत्याग करीत असल्याचा उदात्त आव आणला होता. परवाच्या कार्यसमिती बैठकीमध्येही पक्षजनांनी कोणत्याही दडपणाविना पक्षाध्यक्ष निवडावा असे सांगत राहुल व सोनिया अर्ध्या बैठकीतून उठून निघूनही गेल्या होत्या, परंतु पुन्हा परत येत सोनियांनी पक्षाची कमान मुकाट स्वीकारण्यामागचा अर्थ काय? सोनिया व राहुल बैठक सोडून गेले तेव्हा सरचिटणीस प्रियांका मात्र बैठकीत उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीत गांधी घराण्यापलीकडील व्यक्तीला समर्थन देण्याची कोणाची प्राज्ञा झाली असती काय? त्यामुळे हा सारा प्रकार म्हणजे राहुल यांच्या दारुण अपयशानंतर कमकुवत झालेली गांधी घराण्याची पक्षावरील पकड पुन्हा घट्ट करण्याचाच डाव तर नव्हता ना असा प्रश्न निर्माण होतो. आपल्या पक्षामध्ये लोकशाही असल्याची बात कॉंग्रेस पक्ष सदैव करत असतो. भाजपमध्ये लोकशाही नाही म्हणत हिणवतही असतो. राहुल यांच्या पदत्यागानंतर नव्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडीसाठी ठिकठिकाणच्या कॉंग्रेसजनांशी व्यापक सल्लामसलत करण्यात आल्याचेही सांगण्यात येत होते. परंतु या सगळ्यांनी राहुल आणि सोनिया यांच्या पलीकडे न जाणे म्हणजेच गांधी घराण्यापलीकडे सर्वमान्य नेतृत्व पक्षात निर्माण होऊच शकलेले नाही वा आजवर होऊच दिले गेलेले नाही याचाच सज्जड पुरावा आहे. सोनियांनी पक्षाची कमान पुन्हा स्वीकारून एका परीने कॉंग्रेसवरील गांधी घराण्याची पकडच मजबूत केलेली आहे. सध्या त्यांना अंतरिम अध्यक्षपद दिलेले आहे, कारण पक्षाच्या घटनेनुसार कार्यसमिती केवळ अंतरिम अध्यक्षच निवडू शकतो. पूर्णकालीक अध्यक्षांची निवड ही अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीतील निवडणुकीतून होत असते. उद्या जेव्हा ही एआयसीसीची बैठक बोलावली जाईल, तेव्हा सोनियांच्या विरोधात ब्र काढण्याची कोणाची प्राज्ञा असेल काय? म्हणजेच सोनियांच्याच गळ्यात पुन्हा पक्षाध्यक्षपदाची माळ घालण्याची वेळ पक्षावर आलेली आहे. राहुल गांधी हे नेतृत्व करण्यास पात्र नाहीत याच्यावरच एका परीने हे शिक्कामोर्तब आहे. परवाच्या बैठकीत ठरावाद्वारे त्यांच्यावर भले स्तुतीसुमने उधळण्यात आली असतील, परंतु प्रत्यक्षामध्ये आपल्या पक्षाध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये ते पूर्ण अपयशीच नव्हे, तर स्वभावानुसार पोरकट ठरलेले आहेत हेच सत्य आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या धुळधाणीस राहुल आणि त्यांची विचित्र धोरणेच कारणीभूत आहेत. सर्जिकल स्ट्राइक, पुलवामा हल्ला, त्यानंतरची बालाकोटची कारवाई, अभिनंदन वर्धमान प्रकरण आदी विषयांमध्ये तमाम देशभावना काय आहे याची अजिबात पर्वा न करता मूठभर झोळीवाल्यांच्या प्रभावाखाली पक्षाला भलती दिशा देण्याचा जो काही प्रकार राहुल यांनी चालवला त्याचा दणका त्यांच्या पक्षाला गेल्या निवडणुकीत बसला. तरीही त्यापासून त्यांनी काही धडा घेतल्याचे दिसत नाही. उलट पक्ष कार्यसमिती बैठकीतून उठून गेल्यानंतर परत का आलात या पत्रकारांच्या प्रश्नावर जम्मू काश्मीरमध्ये प्रचंड हिंसाचार चालला आहे व सरकारने त्यावर स्पष्टीकरण द्यावे असे सांगून ते मोकळे झाले. वास्तविक, काश्मीर खोर्‍यातील जनजीवन काही अपवाद वगळता बहुतांशी सामान्य होते. जम्मू काश्मीर सरकारने विविध शहरांतील सुरळीत जनजीवनाचे व्हिडिओही जारी केले होते. मग राहुल यांना संपूर्ण खोर्‍यात हिंसाचार चालल्याचा साक्षात्कार कसा काय झाला? काश्मीरमध्ये प्रचंड हिंसाचार चालल्याचे त्यांनी सांगणे म्हणजे पाकिस्तानच्या दाव्याला भक्कम पुष्टी देणेच ठरले आहे आणि हे राष्ट्रहिताला धरून नक्कीच नाही. कॉंग्रेसचे नेतृत्व पुन्हा सोनियांकडे येणे याचा दुसरा अर्थ पक्षातील बुजुर्गांनी तरुण तुर्कांवर केलेली मात असाही काढता येतो. राहुल यांच्याभोवती निर्माण झालेल्या कोंडाळ्याने पक्षातील जुन्या धेंडांना दूर सारले होते. सोनियांना पुन्हा अध्यक्षपदी आणून त्यांनी आपले बस्तान पुन्हा ठीकठाक केलेले आहे. मुळात कॉंग्रेस हे आज एक फुटके जहाज आहे. गोव्यात दहा आमदार पक्ष सोडून गेले, कर्नाटकात चौदा जणांनी राजीनामे दिले, तेलंगणात आमदार टीआरएसच्या आसर्‍याला गेले, महाराष्ट्रात भाजप – सेनेकडे नेत्यांची रीघ लागली आहे, कलम ३७० संदर्भात पक्षात दुफळी पडली आहे. राज्यसभेतील पक्षाचे मुख्य प्रतोद व्हीप बजावण्याऐवजी स्वतःच राजीनामा देऊन गेले. हे सगळे पाहिले तर या बुडत्या जहाजाचे कप्तानपद स्वीकारण्यास कोणी नेता धजावेल का, आणि पुढे आला तरी त्याला पक्ष एकसंध ठेवता येईल का याचीच साशंकता होती. त्यामुळे सोनियांकडे पक्षाची कमान येणे म्हणजे पक्षांतर्गत लोकशाहीच्या बाता मारत प्रत्यक्षात नेहरू-इंदिरा-राजीव-सोनिया-राहुल आणि आता पुन्हा सोनिया अशा घराणेशाहीपुढे पक्षातील रथी महारथींनी निमूट घातलेला दंडवतच आहे!