मोसमी पावसाने रचला इतिहास

>> सरासरीपेक्षा ३३ टक्के जास्त; १५५.२६ इंचाची नोंद

राज्यात मागील चार वर्षे सलग तुटीचा मोसमी पाऊस पडल्यानंतर यावर्षी मोसमी पावसाची सरासरीपेक्षा ३३ टक्के जास्त नोंद झाला आहे. राज्यात यावर्षी पावसाने १५५.२६ इंच पावसाची नोंद करून नवीन इतिहास रचला आहे. यापूर्वी राज्यात वर्ष २०११ मध्ये १५०.८८ इंच पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात मागील चार वर्षाच्या तुटीच्या मोसमी पावसाची परंपरा यंदा खंडित झाली आहे. यापूर्वी वर्ष २०१४ मध्ये १२०.५८ इंच पावसाची नोंद झाली.
वर्ष २०१५ मध्ये २० टक्के कमी पावसाची (९४.०३ इंच) नोंद झाली. वर्ष २०१६ मध्ये मोसमी पाऊस सरासरी पावसाच्या जवळ जाऊन ठेपला होता. त्या वर्षी १ टक्के कमी पावसाची (११६.४४ इंच) नोंद झाली. वर्ष २०१७ मध्ये मोसमी पावसाने इंचाचे केवळ शतक (१००.५९ इंच) पूर्ण केले होते. तर, वर्षे २०१८ मध्ये मोसमी पाऊस इंचाच्या शतकाच्या जवळसुध्दा पोहोचू शकला नाही. मोसमी पावसाचे प्रमाण १९ टक्के कमी होते. केवळ ९४.९० इंच पावसाची नोंद झाली होती. राज्यात यंदाही मोसमी पावसाचे उशिराने आगमन झाले. त्यामुळे पावसाच्या सरासरी प्रमाणाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण केले जात होते. यंदाही तुटीचा मोसमी पावसाची शक्यता वर्तविली जात होती. तथापि, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याच्या कोसळलेल्या जोरदोर पावसामुळे पावसाचे सरासरी प्रमाण वाढले आहे.

राज्यात जोरदार पावसामुळे विविध भागात पूरस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पुरामुळे केवळ शेती, बागायतीचे साधारण ९ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पुरामुळे घरांची पडझड, वीज खात्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी राज्यातील सर्वच भागात जोरदार पावसाची नोंद झालेली आहे. सहा ठिकाणी पावसाने इंचाचे दीड शतक ओलांडले आहे. फोंड्यातील पावसाची माहिती उपलब्ध झालेली नाही.